ड्यूई, मेलव्हिल : (१० डिसेंबर १८५१–२६ डिसेंबर १९३१). अमेरिकेतील ग्रंथालय चळवळीचा जनक आणि दशांश वर्गीकरणपद्धतीचा निर्माता. जन्म ॲडम्स सेंटर येथे. ॲम्हर्स्ट विद्यालयाचा पदवीधर (१८७४). तेथेच दोन वर्षेपर्यंत कार्यकारी ग्रंथपाल. या काळात त्याने एक ग्रंथविषयक वर्गीकरणपद्धती तयार करून ती ४२ पानी पुस्तिकेच्या स्वरूपात १८७६ मध्ये प्रकाशित केली. हीच पद्धती ‘दशांश वर्गीकरणपद्धती’या नावाने जगभर मान्यता पावली. एप्रिल १८७६ मध्ये ड्यूईने बॉस्टन येथे स्थलांतर करून तेथील वास्तव्यात अनेक शैक्षणिक सुधारणा तसेच ग्रंथालयांच्या कार्यपद्धतीत प्रगती घडवून आणण्याचे प्रयत्न केले. याच काळात तो लायब्ररी जर्नल  या मासिकाचा संपादकही होता. त्याच्याच प्रयत्नाने स्थापन झालेल्या अमेरिकन लायब्ररी असोसिएशनचा तो कार्यवाह (१८७६ ते १८९०) व अध्यक्षही (१८९० ते १८९३) होता. स्पेलिंग रिफॉर्म असोसिएशनचा तो आद्य सभासद आणि संस्थेच्या स्थापनेपासून कार्यवाहदेखील होता. दशांश पद्धतीच्या वजनमापांचा उपयोग केला जावा या हेतूने स्थापन झालेल्या अमेरिकन ‘मेट्रिक ब्यूरो’च्या कामातही त्याने आस्थापूर्वक भाग घेतला.

कोलंबिया विद्यालयाच्या ग्रंथालयाचा प्रमुख म्हणून त्याची १८८३ मध्ये नेमणूक झाली आणि विरोध असतानाही त्याने तेथील ग्रंथसंग्रहाचे पुनर्वर्गीकरण व पुनर्तालिकीकरण केले. स्त्रियांना ग्रंथपालनवर्गात प्रवेश देण्याच्या त्याच्या कल्पनेलाही विश्वस्तांचा विरोध झाला होता. त्यामुळेच त्याने तेथील जागेचा राजीनामा दिला. जगातील पहिला ग्रंथपालन शिक्षणक्रम १८८७ मध्ये सुरू करण्याचा मान त्यानेच मिळविला. १८८८ अखेर त्याची ऑल्बनी येथील न्यूयॉर्क स्टेट लायब्ररीचा संचालक आणि युनिव्हर्सिटी ऑफ द स्टेट ऑफ न्यूयॉर्कचा कार्यवाह व खजिनदार म्हणून नेमणूक झाली. याच काळात फिरत्या ग्रंथालयांचा त्याने प्रचार करून ऑल्बनी येथेही ग्रंथपालनाचा शिक्षणक्रम सुरू केला. लेक प्लॅसिड येथे सहकारी वास्तव्य संस्था स्थापन करण्याचे श्रेयही त्याने मिळविले होते. याच संस्थेने पुढे त्याच्या ‘वर्गीकरणपद्धती’च्या पुढील प्रती प्रसिद्ध केल्या. १९०२ मध्ये सीराक्यूज व ॲल्फ्रेड विद्यापीठांकडून त्याला बहुमानदर्शक पदव्या मिळाल्या. त्याने निर्माण केलेल्या ‘दशांश वर्गीकरणपद्धती’च्या १९६५ पर्यंत सतरा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. लेक प्लॅसिड येथे त्याचे देहावसान झाले.

हिंगवे, कृ. शं.