बेल्लारी शामण्णा केशवन्

केशवन्, बेल्लारी शामण्णा : (१० मे १९०९–   ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय ग्रंथालयशास्त्रज्ञ. जन्म मद्रास येथे. प्रारंभीचे शिक्षण म्हैसूर येथे. पुढे लंडन विद्यापीठातून एम्.ए. आणि ग्रंथालयशास्त्राची पदविका. जर्मनीमध्ये संस्कृत आणि जर्मन भाषेचा उच्च अभ्यास. नंतर म्हैसूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात सात वर्षे अध्यापन केले. त्यानंतर विज्ञान-उद्योग अनुसंधान परिषदेत साहाय्यक सचिव म्हणून काही काळ काम केल्यानंतर मध्यवर्ती शासनाने त्यांना शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त केले. काही काळपर्यंत त्यांनी त्यांनी केंद्रीय शिक्षण विभागात अभिरक्षक म्हणूनही काम केले. त्यानंतर कलकत्ता येथे असलेल्या भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून पंधरा वर्षे काम पाहिले. ह्या काळात संदर्भग्रंथसूची, प्रलेखपोषण व परिभाषा ह्या विषयांसाठी नेमलेल्या युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य होते. तसेच ऑक्सफर्ड येथील पर्गमन् प्रेस ह्या विख्यात प्रकाशनसंस्थेच्या ग्रंथालय आणि तांत्रिक माहिती विभागाच्या संपादक मंडळाचेही ते सभासद होते. १९६३ साली दिल्लीच्या भारतीय राष्ट्रीय वैज्ञानिक प्रलेखपोषण केंद्राचे (इन्सडॉक) संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ह्या संस्थेचा बंगलोर येथे एक विभाग सुरू केला. १९६३ साली भारतीय ग्रंथालय परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. सध्या ते ह्या संघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत. केशवन् ह्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथालय समित्यांवर काम केले आहे. त्यांपैकी उल्लेखनीय समित्या म्हणजे ग्रंथालय सल्लागार समिती (सिन्हा समिती), चतुर्थ पंचवार्षिक योजनेसाठी नेमलेली ग्रंथालयविकास समिती, विद्यापीठ अनुदान आयोगाची ग्रंथपाल समिती या होत. तसेच युनेस्कोची पूर्वपश्चिम प्रमुख प्रकल्प समिती, प्रलेखपोषण ग्रंथालय संरचना-पुनर्रचना सल्लागार समिती यांचेही ते सदस्य होते. १९६४ साली मानिला येथे भरलेल्या युनेस्कोच्या आशिया आणि पॅसिफिक विभागांच्या राष्ट्रीय ग्रंथालयांच्या विकासाचा विचार करण्यासाठी भरलेल्या परिसंवादाचे ते संचालक होते. केशवन् हे भारतातील अनेक विद्यापीठांच्या ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य आहेत. केशवन् यांचे विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची. या सूचीचा पहिला खंड १९५८ साली प्रसिद्ध झाला. तदनंतर त्रैमासिक आणि एकत्रित वार्षिक अशा त्याच्या पुरवण्या प्रतिवर्षी प्रकाशित होत आहेत. भारतासारख्या बहुभाषिक देशात असली सूची करणे अत्यंत किचकट काम असूनही ते काम केशवन् ह्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने यशस्वी झालेले आहे. या ग्रंथसूचीचे बारा प्रांतिक भाषांत त्या त्या भाषांतील ग्रंथांची वार्षिक सूची असणारे खंड प्रकाशित करण्याचेही श्रेय प्रामुख्याने त्यांनाच आहे. केशवन् हे बहुभाषिक आहेत. इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत,तमिळ, मराठी, गुजराती व हिंदी भाषांत ते अस्खलित बोलू-लिहू शकतात. केशवन् यांना १९६० साली पद्मश्री हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. संयुक्त राष्ट्रांतर्फेही त्यांनी इतर देशांत सल्लागार म्हणून काम केले आहे. केशवन् हे भारतीय ग्रंथालयचळवळीचे लोकप्रिय अध्वर्यू आहेत.

 

रेगे, शां. शं.