ग्रंथ : मानवाच्या भावभावना, कल्पना, विचार, अनुभव व ज्ञान अक्षरबद्ध करून ज्यात ग्रथित केलेले असते, त्याला स्थूल मानाने ग्रंथ असे संबोधिले जाते. आधुनिक कल्पनेनुसार ग्रंथ म्हणजे कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह होय हलक्या पण टिकाऊ वस्तूवर लिहिलेला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुलभतेने नेता येण्याजोगा व ज्यातील लेखन समाजासाठी असते, अशा सुसंगत अर्थाच्या वाक्यांचा ‘रचनाविशिष्ट समुदाय’ अशी ग्रंथाची व्याख्या केली जाते. जुन्या संस्कृत भाषेत आणि जुन्या मराठीत बत्तीस वर्ण असलेला अनुष्टुभ् छंदातील श्लोक, समग्र वर्णसमूह, गद्यातील अथवा पद्यातील पोथी, पुस्तक, शास्त्र या अर्थीही ग्रंथ ह्या शब्दाचा वापर झालेला दिसतो. संस्कृत भाषेत ग्रंथाला ‘पुस्त’ असे पर्यायी नाव आहे. त्याचा अर्थ ‘घडण’ किंवा आकार देणे असा आहे. भाजलेल्या विटा, शिला व धातूंचे तुकडे यांवरील लेखन लक्षात घेता ‘पुस्तक’ या शब्दाची व्युत्पत्ती ध्यानात येते. मानवी संस्कृतीच्या ज्या अवस्थेत आपले विचार स्वतःसाठी व भावी पिढीसाठी जतन करून ठेवावेत ही कल्पना माणसाच्या मनात रुजली, त्या मानवी संस्कृतीच्या अतिप्राचीन अवस्थेपासून कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात ग्रंथाचे अस्तित्व आढळते. ग्रंथपूर्व काळातही विचार संक्रमणाचे कार्य अनेक शतके ‘श्रुतिस्मृति’ द्वारा व्यक्तिगत रीत्या घडत असे. भारतात ज्ञानाची व्याख्याच मुळी ‘श्रुतिस्मृति’ अशी होती. गुरुमुख हे त्या काळात ज्ञानप्रसाराचे एकमेव साधन होते. प्राचीन ऋषीमुनी आपले ज्ञान व अनुभव स्वमुखाने आपल्या शिष्यांना कथन करीत असत. संस्कृतातील वेदवाङ्मय हे शेकडो वर्षे याच पद्धतीने जतन केले गेले. प्रत्यक्ष लिपिसंशोधनानंतर मानवाने ग्रंथलेखनास नेमकी सुरुवात केंव्हा केली, हे त्या काळातील अनेक प्रकारचे लेखनसाहित्य काळाच्या ओघात नष्ट झालेले असल्यामुळे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. आज उपलब्ध असलेल्या ग्रंथांत इ.स.पू.सु. ३००० वर्षांपूर्वीचे मेसोपोटेमिया येथील इष्टिकाग्रंथ व ईजिप्तमधील पपायरसच्या गुंडाळ्या हे जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ गणले जातात.
आपले विचार ग्रथित करावयास मानवाला जी जी साधने उपलब्ध झाली व सोयीची वाटली, ती ती वापरून त्याने लेखनास प्रारंभ केला. साधनांच्या प्रकारानुसार ग्रंथाच्या बाह्यस्वरूपात प्रागितिहासकाळापासून बदल झालेला आढळतो. ही साधने म्हणजे पाषाण, मातीच्या विटा किंवा इष्टिका, बांबूच्या चिरफळ्या, झाडांच्या साली (ताडपत्रे), पाने (भूर्जपत्रे), पपायरसाचे पापुद्रे, धातूंचे पत्रे व कमावलेले कातडे इ. होत वरील साधनांत उत्क्रांती होत होत अखेरीस ग्रंथासाठी कागदाचा वापर होऊ लागला. या विविध वस्तूंवर लिहिण्यासाठी वेगवेगळी साधने असत. छिन्नी, दाभण, पक्ष्यांची पिसे, बोरू, टाक ही लेखनाची साधने होती. काजळ वा अन्य पदार्थांपासून तयार केलेली शाई लेखनासाठी वापरली जाई. लेखनकला व लिपी यांचा जसजसा विकास होत गेला, तसतसा ग्रंथाच्या स्वरूपात बदल घडत गेला. तसेच ज्ञान, विज्ञान व एकूण वाङ्मयाची जसजशी अभिवृद्धी होत गेली, तसतशी ग्रंथसंख्येतही भर पडत गेली. ग्रंथांचा इतिहास हा एकप्रकारे मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास होय. कोणत्याही राष्ट्राच्या वैभवात ग्रंथनिर्मितीला फार मानाचे स्थान आहे. अगदी आरंभीचे लेखन हे धार्मिक आदेश, मंत्र, तंत्र, राजाज्ञा व न्यायनिवाडे या स्वरूपाचे होते. ग्रंथांची निर्मिती व वाढ झाली. ती धर्माच्याच अनुषंगाने. राजा हा परमेश्वराचा अंश मानला गेल्यामुळे राजाज्ञेला धर्माचे पावित्र्य लाभले. त्यामुळे देवालये, मठ इ. धार्मिक स्थानांबरोबर राजप्रासादातही ग्रंथसंग्रह वाढीस लागले. त्याचबरोबर जेत्यांनी जित लोकांचे ग्रंथसंग्रह नष्ट करावयाचे किंवा पळवून न्यावयाचे अशा घटनाही इतिहासकाळात घडलेल्या आहेत.
विविध ग्रंथप्रकार : शिळाग्रंथ : अशोकाचे शिलालेख व बाराव्या शतकातील हरिकेली आणिललितविग्रहराज या संस्कृत नाटकांचे शिलांवर केलेले खोदकाम यांना ग्रंथ म्हणावे की काय, याबद्दल दुमत असण्याची शक्यता आहे; परंतु शिळाग्रंथांचा प्राचीन नमुना म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.
इष्टिकाग्रंथ : पाश्चात्त्य संशोधकांनी एकोणिसाव्या शतकात आशियामायनरमध्ये जे उत्खनन केले, त्यात त्यांना इ.स.पू. सातव्या शतकातील ॲसिरियन राजा असुरबनिपाल याच्या ग्रंथालयांतील विटांवरील ग्रंथ उपलब्ध झाले. याच प्रकारचे ग्रंथ ॲलेक्झांड्रियाच्या टॉलेमी राजाच्या ग्रंथालयांत व जिनीव्हा येथेही उपलब्ध झाले. त्यांचा काळ सु. ३,००० वर्षांपूर्वीचा मानला जातो. पाच इंच लांबीच्या, अर्धवट ओल्या असलेल्या विटांवर दाभणासारख्या कोरणीने कोरून लिहिले जाई व ह्या विटा भट्टीत किंवा उन्हात वाळवून कठीण केल्या जात. एका विटेवरच्या सहाही पृष्ठभागांवर लेखन पूर्ण झाले नाही, तर ग्रंथासाठी अनेक विटा वापरल्या जात व विटांवर पृष्ठांक घातले जात. जगातील प्राचीनतम ग्रंथांत या इष्टिकाग्रंथांची गणना केली जाते.
बांबूच्या चिरफळ्यांवरील ग्रंथ : इ.स.पू.१३०० मध्ये लाकूड अथवा बांबूच्या चिरफळ्या करून त्यांवर लिहिलेले ग्रंथ चीनमध्ये होते, असे मानले जाते. शिर व्हांग ती याने इ.स.पू. २१३ मध्ये अशा अनेक ग्रंथांचा नाश केला. त्यातून वाचलेल्या ग्रंथांची वैद्यक, तत्त्वज्ञान, काव्य, ज्योतिष या विषयवारीने तयार केलेली एक यादी उपलब्ध आहे. दमट हवेमुळे हेही ग्रंथ नष्ट पावले असावेत.
पपायरसावरील ग्रंथ : ईजिप्तमधील नाईलच्या परिसरात ⇨पपायरस नावाची लव्हाळ्याच्या जातीची वनस्पती विपुल प्रमाणात उपलब्ध होत असे. तिच्या खोडाचे १३—१५ सेंमी. रुंदीचे पातळ तुकडे एकास एक जोडून पापुद्रे तयार करण्यात येते व त्यांवर हायरोग्लिफिक चित्रलिपीत एका बाजूने लिहिण्यात येई. या ग्रंथांच्या गुंडाळ्या मातीच्या रांजणात ठेवीत. इ.स.पू. २५०० या काळातील पपायरसावरील अनेक ग्रंथ ईजिप्तमधील पिरॅमिडमध्ये सुरक्षित स्थितीत उपलब्ध झाले आहेत. कारण हे ग्रंथ एक तर अनेक शतके जमिनीखाली रांजणांत होते व या प्रदेशात पाऊस अजिबात नसल्यामुळे या रांजणांत पाणी शिरले नाही व त्यामुळे ते सुरक्षित राहिले. दुसरे कारण म्हणजे हे ग्रंथ शवपेटीत ठेवलेले होते. पपायरसावर धर्माज्ञा, मंत्र, तंत्र इ. लिहून ते परलोकी उपयोगी ठरावे या दृष्टीने राजघराण्यातील मृत व्यक्तीभोवती ते गुंडाळून ठेवीत व बंदिस्त शवपेटी पिरॅमिडच्या मधल्या दालनात ठेवण्यात येई. त्यामुळे हे ग्रंथ सु.पाच हजार वर्षे सुरक्षित राहिले. या ग्रंथांना मृतांचे ग्रंथ असे म्हणतात. ईजिप्तमध्ये अन्य ठिकाणी पपायरसावरील जे ग्रंथ उपलब्ध झाले, त्यांतून लोककथा व तत्कालीन शास्त्रीय ज्ञान यांची माहिती मिळते.
ग्रीक कवी होमर, तत्त्वज्ञ प्लेटो व ॲरिस्टॉटल यांच्या काळी पपायरसाचा उपयोग ग्रंथलेखनासाठी केला जाई. प्राचीन ग्रीक भाषेत ग्रंथ ह्या अर्थी ‘बिबलिओ’ (Biblion) हा शब्द प्रचलित होता व तो पपायरस या शब्दावरून आला आहे. यावरून पपायरसावरील ग्रंथांचे अस्तित्व सिद्ध होते. ग्रीसमध्ये विद्या व कला यांची वाढ झाल्यानंतर ॲलेक्झांड्रिया व पर्गामम ही दोन शहरे विद्येची माहेरघर म्हणून प्रसिद्ध पावली. या शहरांतील ग्रंथालयांत पपायरसावरील अनेक ग्रंथ अस्तित्वात होते.
चर्मग्रंथ : टिकाऊपणाच्या दृष्टीने जनावरांची कमावलेली कातडी लेखनासाठी वापरण्यात येऊ लागली. ईजिप्तमध्ये इ.स.पू. चोविसाव्या शतकातील कातड्यावरील लेखनाचा नमुना उपलब्ध झाला आहे. १९४७ मध्ये मृत समुद्राच्या परिसरात उत्खनन झाले, त्यात हिब्रू लोकांनी मातीच्या भांड्यांतून ठेवलेले कातड्यावरील ग्रंथ उपलब्ध झाले आहेत.
ॲलेक्झांड्रिया व पर्गामम या शहरांतील नागरिकांच्या विद्या व कला या क्षेत्रांतील स्पर्धेमुळे ॲलेक्झांड्रियाच्या पाचव्या टॉलेमीने पपायरसाची निर्यात बंद करून टाकली. त्यामुळे इसवी सनाच्या पहिल्याशतकात पर्गाममचा राजा दुसरा यूमीनीझ याने ग्रंथलेखनासाठी व्हेलम पार्चमेंट या जातीची कमावलेली कातडी वापरण्यास सुरुवात केली. मध्ययुगात अशा प्रकारच्या ग्रंथांचा फार मोठा प्रसार यूरोपमध्ये झाला. धर्मग्रंथांबरोबर इतर ग्रंथांसाठीही यानंतरच्या काळात कातड्याचा वापर होऊ लागला. बाराव्या शतकात जेथे जेथे विद्यापीठे स्थापन झाली, तेथे तेथे ग्रीक व लॅटिन भाषांतील ग्रंथांच्या नकला करण्यासाठीही कातड्याचा वापर करण्यात येई. चौदाव्या शतकात यूरोपात देशी भाषांचा उदय झाला. त्यांमधून स्वतंत्रपणे रचना तर झालीच, परंतु त्याचबरोबर दान्ते, पित्रार्क, चॉसर आदि लेखकांच्या ग्रंथांच्या नकला तयार करण्यात येऊ लागल्या. बायबलच्या तर अनेक नकला केवळ व्हेलमवरच केल्या गेल्याचे आढळते.
कागदावरील ग्रंथ : इ. स. १०५ च्या सुमारास चीनमध्ये कागदाचा शोध लागला. सुती चिंध्यांचा लगदा तयार करून त्याचा थर चाळणीवर घालत व तो वाळवून कागद बनविण्यात येई. अरब व्यापाऱ्यांच्या मार्फत हा शोध यूरोप व भारतात पोहोचला. कागदाप्रमाणे मुद्रणकलाही चीनमध्ये पाश्चिमात्यांच्या कितीतरी आधी माहीत झालेली होती. १९०७ मध्ये बौद्ध ग्रंथ शोधण्यासाठी एक बंदिस्त गुहा उघडण्यात आली. त्या गुहेत तीन हजार सुरळ्यांचे मुद्रित ग्रंथ उपलब्ध झाले. त्यांपैकी हीरकसूत्र या ग्रंथावर ११ मे ८६८ हा मुद्रणकाल छापण्यात आला असून त्यावर ‘वांग चिएह’ याने तो छापला असाही उल्लेख आहे. जगातील सर्वांत जुना ज्ञात असा हा मुद्रित ग्रंथ असून ब्रिटिश म्यूझीयममध्ये तो आज उपलब्ध आहे.
चीनमधील या कागदाच्या अथवा छपाईच्या शोधाचा परिणाम पंधराव्या शतकापर्यंत यूरोपात झालेला नव्हता. १४३९ मध्ये जर्मनीमधील माइन्त्स या गावी योहान गृटेनबेर्क याने खिळ्यांच्या छपाईचा शोध लावला व
त्यामुळे मुद्रणकलेत क्रांतिकारक बदल घडून आला. हॉलंडमधील लॉरेन्स यान्सन कॉस्टर याने १४४१ मध्ये छापलेले Spieghel Onzer Behoudenisse (इं. शी. मिरर ऑफ अवर सॅल्व्हेशन) हे जगातील पहिले मुद्रित पुस्तक होय, असे काहींचे मत आहे. १४५६ ते १५०० या कालावधीत मुद्रणालयांचा यूरोपात झपाट्याने प्रसार झाला. जवळजवळ प्रत्येक प्रमुख शहरी मुद्रणालय निघाले व केवळ ४०—५० वर्षांत विविध ग्रंथांच्या सु. ४० हजार प्रती छापल्या गेल्या. ही संख्या तोपर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व हस्तलिखित ग्रंथांच्या संख्येहून अधिक होती.
आद्यमुद्रिते : मुद्रणकलेच्या प्रारंभकाळात म्हणजे पंधराव्या शतकात मुद्रित केलेल्या ग्रंथांना ‘आद्यमुद्रिते’ किंवा ‘दोलामुद्रिते’ म्हणतात. ही आद्यमुद्रिते हुबेहूब हस्तलिखितांसारखी होती. हस्तलिखितांत नसलेली प्रकाशक, मुद्रक इ. माहिती या आद्यमुद्रितांत दिलेली असे. प्रारंभीच्या काळात मुखपृष्ठ ग्रंथाच्या अखेरीस दिले जाई. परंतु कालांतराने आजच्या ग्रंथांप्रमाणे ग्रंथकर्ता, ग्रंथनाम, प्रकाशक, प्रकाशनवर्ष इ. माहिती असलेले मुखपृष्ठ ग्रंथाच्या सुरुवातीला देण्याची प्रथा सुरू झाली. या आद्यमुद्रितांतील बहुसंख्य ग्रंथ बायबल आणि त्यावरील टीका या स्वरूपाचे होते. त्यांपैकी फारच थोडे ग्रंथ आज उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या खरेदी-विक्रीस फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सूक्ष्मपत्रे (मायक्रोकार्ड) व सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म) : विसाव्या शतकात मुद्रणकला व छायाचित्रण यांमध्ये क्रांतिकारक प्रगती झाल्याने ज्ञान जतन करण्यासाठी सूक्ष्मपत्रे व सूक्ष्मपट ही साधने वापरात आली. ग्रंथातील अनेक पृष्ठे एका लहानशा सूक्ष्मपत्रावर अथवा सूक्ष्मपटावर छापण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, अनेक पृष्ठांचा मोठा ग्रंथ अथवा अनेक वर्षांचे मासिकांचे खंड एका लहानशा खोक्यात मावतील, एवढ्या आकारात बाळगणे सुलभ झाले आहे. या सुधारणेमुळे ग्रंथसंरक्षण व ग्रंथप्रसार यांत आमूलाग्र बदल झाला असून ग्रंथालयांना भेडसावणारा जागेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. अर्थात सूक्ष्मपत्रे व सूक्ष्मपट यांवरील ग्रंथ तयार करण्यास व ते वाचण्यास लागणारी यंत्रसामग्री मिळविणे खर्चाचे असल्याने या साधनांचा वापर सार्वत्रिक झालेला नाही.
ग्रंथांचे बाह्यांग : पपायरसावरील ग्रंथ एकाच बाजूस लिहिलेला, लांबरुंद व गुंडाळलेल्या स्वरूपात असे, परंतु कातड्यावर दोन्ही बाजूंनी लिहिता येई, शिवाय त्याचा आकार मोठा असे व त्याच्या घड्याही घालता येत. त्यामुळे ग्रंथाला लहान व सुटसुटीत आकार प्राप्त झाला. पुढे दुपत्री (फोलिओ), चतुष्पत्रि (क्वार्टो) व अष्टपत्री (ऑक्टेव्हो) अशी पृष्ठे वापरून ग्रंथ लिहिला जाऊ लागला. डाव्या अथवा वरच्या बाजूने ही सर्व पृष्ठे एकत्रित चिकटवून व वर जाड पुठ्ठा चिकटवून आज आपण ज्या स्वरूपात ग्रंथ पाहतो, त्या प्रकारचा ग्रंथ तयार होऊ लागला. बायबल लिहिण्यासाठी वासराचे कातडे वापरल्यामुळे अशा ग्रंथाला ‘कोडेक्स’ म्हटले जाऊ लागले. पंधराव्या शतकातील असे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत.
ईजिप्तच्या टॉलेमी राजांनी ग्रंथांच्या प्रती तयार करण्यासाठी अनेक नकलनवीस नेमले होते. परंतु त्यांच्याकडून एका वेळी एकच प्रत तयार होई. सिसेरोच्या काळात रोमन साम्राज्यात सरदारांच्या पदरी असलेल्या गुलामांकडून, एकाने सांगून इतरांनी लिहावयाचे या पद्धतीने, एकाच वेळी तीस-तीस प्रती तयार होत असत. त्यामुळे जे ग्रंथ पूर्वी केवळ राजांना व श्रीमंतांनाच घेणे शक्य होते, ते मध्यम वर्गीयांना विकत घेता येऊ लागले. मुद्रणकलेच्या शोधानंतर एकाच वेळी ग्रंथाच्या अनेक प्रती तयार करता येऊ लागल्या, किंमती कमी झाल्या, देशी भाषांतील ग्रंथांना उत्तेजन मिळाले व ते सर्वसामान्य माणसांना घेता येऊ लागले. सोळाव्या शतकात सु. ५ लाख २० हजार, सतराव्या शतकात सु. १२ लाख ५० हजार, अठराव्या शतकात सु. २० लाख तर एकोणिसाव्या शतकात सु. ८० लाख ग्रंथ पाश्चिमात्त्य देशांत छापले गेले. विसाव्या शतकात ही संख्या कोटीच्या घरात गेलेली आहे.
भारतातील ग्रंथ : ऋग्वेदातील लेखनकलेच्या उल्लेखावरून त्या काळात लेखनकला ज्ञात होती, असे अनुमान करता येईल. परंतु वेदवाङ्मय अनेक शतके मुखनिविष्ट होते. वेदानंतर उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके इ. वेदांगे यज्ञप्रसंगी जमलेल्या विद्वान श्रोतृसमुदायापुढे म्हणून दाखवीत व त्यांवर चर्चा होई. वेदवाङ्मय निर्माण होऊनही ते ग्रंथबद्ध केव्हा झाले, याविषयी निश्चित अनुमान करणे कठीण आहे. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननांत सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आढळले, त्यांत त्या काळचे कोरीव लेख उपलब्ध झाले आहेत. इ.स.पू.सु. ६०० मध्ये लिहिलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीत ‘लिपी’, ‘लिपिकार’ असे स्पष्ट उल्लेख केलेले आहेत. अलेक्झांडरच्या स्वारीत नीआर्कस नावाचा गृहस्थ भारतात आला होता. भारतात लेखनासाठी त्या काळी कागद वापरला जात होता, असा त्याने उल्लेख केला आहे. या उल्लेखावरून भारतात इ.स.पू. चौथ्या शतकात काही प्रमाणात कागद वापरला जात असावा, असे दिसते परंतु हा कागद यूरोपातून न येता चीनमधून आलेला असावा. त्या काळातील ग्रंथ मात्र आज उपलब्ध नाहीत.
कालिदासाच्या ग्रंथात उल्लेख केलेली तालपत्रे व भूर्जपत्रे हीच भारतातील खरी प्राचीन ग्रंथसाधने होत. क्षेमेंद्राने आपल्या लोकप्रकाश ग्रंथात झाडांची पाने कापण्याच्या कात्र्या, लेखण्या व शाईच्या दौती यांचा उल्लेख केला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात लेखनासाठी कोणती साधने वापरावी याचे उल्लेख आहेत. तालपत्रे व भूर्जपत्रे एका बाजूला भोक पाडून बांधलेली, ओवलेली असत व त्यांवर पुठ्ठ्याच्या अथवा धातूच्या रंगीत पट्ट्या बांधत.
बौद्धकाळात भारतातील ग्रंथलेखनास बहर आला. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला इ. विद्यापीठांतून भूर्जपत्रांवरील व तालपत्रांवरील लक्षावधी ग्रंथ संग्रहित करण्यात आले होते. चिनी पंडीत फाहियान याने ४०० मध्ये, इत्सिंग याने ६७१ मध्ये धार्मिक ग्रंथांच्या नकला करून नेल्याचा उल्लेख आहे. मुसलमानी आक्रमकांनी ज्यावेळी या विद्यापीठांचा विध्वंस केला, त्यावेळी हजारो पोथ्या घेऊन बौद्ध भिक्षू नेपाळात पळून गेले. हे प्राचीन ग्रंथ आजही तेथे पहावयास मिळतात. भारतात मात्र काश्मीर येथे १०८९ मध्ये लिहिलेले शतपथ ब्राह्मण हेच उपलब्ध प्रचीनतम हस्तलिखित होय.
जैन राजांनीही ग्रंथनिर्मितीस उत्तेजन दिले. पंडित हेमचंद्र व राजा कुमारपाल यांच्या प्रोत्साहनाने गुजरातेत ताडपत्रावर हजारो ग्रंथ लिहिले गेले व जैन मंदिरे आणि राजवाडे यांमधून त्यांचा संग्रह करण्यात येऊ लागला. या काळात नकलनविसांना भरपूर मानधन मिळत असून विद्वान पंडितांचा तो एक प्रतिष्ठित व्यवसाय होता. भगवद्गीता, रामायण, महाभारत यांसारख्या मोठ्या ग्रंथांच्या नकला करण्यास वर्षानुवर्षे लागत. या ग्रंथांत चित्रे व आकृत्या ते सजविले जात. भारत व इराण या देशांत ग्रंथचित्रणाची कला भरभराटीस आली
होती. बिकानेर,जोधपूर येथील ग्रंथालयांत आज जे हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांतील, विशेषतः जैन ग्रंथांत, अनेक जैन आचार्यांच्या जीवनातील प्रसंगांची सुंदर चित्रे आढळतात.रामायण-महाभारताच्या हस्तलिखितांतही आरंभी सुंदर चित्रे व नक्षीकाम केलेले आढळते. एकनाथांचे समकालीन असणारे आंबेजोगाईचे संतकवी दासोपंत ह्यांनी पंचीकरण हा ग्रंथ पासोडीवर लिहिलेला आहे. सु. एक मी. रुंद व सु. दहा मी. लांब असलेल्या या पासोडीवर काळ्या शाईने दासोपंथांनी प्रस्तुत ग्रंथ स्वतः लिहिला. त्यात जागोजागी चित्रेही आहेत.
भारतातील ग्रंथांचा आणखी एक विशेष म्हणजे त्याचे करण्यात आलेले विषयानुसारी विभाग. या विभागांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ऋग्वेदातील अष्टके व मंडले, भागवतातील स्कंध, रामायणाची कांडे, याप्रमाणे लहरी, उच्छ्वास, पाद, पर्व, स्तबक अशी विभाग नावे संस्कृत ग्रंथांत दिलेली आढळतात. यांपैकी काही नावे लेखन साहित्यावरून दिलेली आहेत, हे उघड आहे.
भारतात १५५६ मध्ये मुद्रणकलेचा प्रारंभ झाला. गोव्यात ६ सप्टेंबर १५५६ रोजी जुआँ द दुस्तामांती हा गृहस्थ पोर्तुगालहून छापखाना घेऊन आला आणि त्याने १५५७ मध्ये दौत्रीन ख्रिस्तां हे पुस्तक छापले. आज मात्र त्याची एकही प्रत उपलब्ध नाही. फादर स्टिफन्स याने १६१६ मध्ये रोमन लिपीतील मराठी भाषेत क्रिस्तपुराण छापले. यानंतरच्या काळात मुद्रणाचे आणखी काही प्रयत्न झाले. १८०५ मध्ये श्रीरामपूर येथे छापलेले कॅरीचे मराठी भाषेचे व्याकरण हा मराठी ग्रंथमुद्रणातील महत्त्वाचा टप्पा होय. १८०५ पूर्वी मराठीत छापलेल्या ग्रंथांना ‘आद्यमुद्रिते’ मानावे, असा संकेत मान्य झाला आहे. त्यांची यादी शं. ग. दाते यांच्या मराठी ग्रंथसूचीत दिलेली आहे.
ग्रंथांचे शत्रू : ग्रंथांच्या शत्रूंमध्ये हवेतील दमटपणा, अतिकोरडेपणा, पाणी, आग, कीड यांबरोबर निष्काळजीपणे ग्रंथांचा वापर करणारा सेवक किंवा वाचक यांचाही उल्लेख केला पाहिजे. ग्रंथांचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे युद्धे होत. आतापर्यंत जगात झालेल्या लढायांतून हजारो ग्रंथांचा संपूर्ण नाश झालेला आहे. या विविध प्रकारच्या शत्रूंपासून ग्रंथांचा बचाव करण्याचे महत्त्व आता पटू लागले आहे. [→ ग्रंथसंरक्षण].
विसाव्या शतकात मुद्रणकलेत झालेल्या यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे ग्रंथाच्या उत्पादनावर व स्वरूपावर क्रांतिकारक परिणाम झाला आहे. दर ताशी पन्नास हजार प्रती निघतील, इतक्या प्रचंड वेगाने ग्रंथनिर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्तपत्रे, चित्रपट, रेडिओ व दूरचित्रवाणी या सुलभ व लोकप्रिय साधनांचा वाढत्या प्रसारामुळे ग्रंथांचे महत्त्व कमी होते की काय, अशी रास्त भीती विचारवंतांना भेडसावीत आहे परंतु अमेरिकेचे उदाहरण पाहता त्यात विशेष तथ्य नाही, असे म्हटले पाहिजे. अमेरिकेत ६० टक्के जनता साक्षर आहे व रेडिओ, दूरचित्रवाणीचा उपयोग करणाऱ्यांची संख्याही सर्वांत जास्त आहे. असे असूनही त्या देशात ग्रंथवाचकांचे प्रमाण ६०% आहे. हा अनुभव जमेस धरता ग्रंथांची जागा अन्य ज्ञानसाधने घेऊ शकतील, असे वाटत नाही. जगातील अविकसित राष्ट्रांमधील असंख्य निरक्षर जनतेत ज्ञानप्रसाराच्या दृष्टीने रेडिओ, दूरचित्रवाणी यांसह ग्रंथांचा उपयोग करणे आवश्यक आहे. तसेच भारतातील ८० टक्क्यांहून अधिक जनता अद्यापि निरक्षर आहे. ती जसजशी साक्षर होईल, तसतशी ग्रंथांची जरूरी अधिकच वाटणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात देशी भाषांचा होत असलेला प्रसार, शिक्षणाची प्रगती व वैज्ञानिक संशोधन यांमुळे ग्रंथांची मागणी अधिकच वाढत आहे. ग्रंथांची ने-आण व देवघेव करण्यातील सुलभता. त्यांची ज्ञान जतन करण्याची क्षमता व व्यक्तिगत उपयोगिता या गोष्टी लक्षात घेता ज्ञान जतन करणाऱ्या साधनांत कितीही बदल झाला, तरी ग्रंथांचे महत्त्व चिरंतर टिकून राहील, असे म्हणावयास हरकत नाही.
पहा : ग्रंथप्रकाशन ग्रंथविक्री-व्यवसाय ग्रंथसंग्रह छंद ग्रंथालय हस्तलिखिते.
संदर्भ : 1. McMurtrie, D. C.The Book, The Printing and Bookmaking, London, 1957.
2. Priolkar, A. K. The Printing Press in India, Bombay, 1958.
पेठे, म. प.