ग्रंथसंरक्षण : ग्रंथालयातील ग्रंथांचा जास्तीत जास्त वाचकांना जास्तीत जास्त काळपर्यंत उपयोग व्हावा, ह्या हेतूने ग्रंथांचे संरक्षण करणे आवश्यक असते. तथापि ग्रंथालयातील विपुल ग्रंथसंग्रहांची काळजी घेणे हे फार गुंतागुंतीचे असते. त्यासाठी खास उपाययोजना करावी लागते. 

प्राचीन काळी शिलाखंड, चिकणमातीच्या विटा, लाकडाचे तुकडे, मेणाचे शिक्के, पपायरस, प्राण्यांची कातडी, धातूखंड इ. साधनांचा उपयोग करून लेखन केले जात असे. ही साधने मुबलक नसल्यामुळे व त्यांवर लेखन करणारे लोक अत्यल्प असल्यामुळे ग्रंथनिर्मितीचे कार्य दुष्कर होते. पाठशाळा, धर्ममठ व राजप्रासाद इ. ठिकाणी लेखनाचे हे कार्य चाले व अशा प्रत्येक ग्रंथाची फक्त एकच प्रत तयार होई. त्यामुळे या ग्रंथांचे संरक्षण करणे अपरिहार्य होते. हे ग्रंथ एखाद्याला संदर्भासाठी वा उपयोगासाठी दिले जात नसत आणि अपवादात्मक रीत्या अशी सवलत एखाद्या विश्वासार्ह छात्राला, पंडिताला किंवा अधिकाऱ्याला दिली गेली, तर त्या ग्रंथांचा उपयोग ग्रंथालयामध्येच जबाबदार अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली करण्याची सक्ती असे. कालांतराने लेखनासाठी कागदाचा व रेशमी कापडाचा उपयोग करण्यात आला. तरीसुद्धा ग्रंथनिर्मितीच्या सुकर तंत्राच्या अभावामुळे ग्रंथरक्षणाचे कार्य महत्त्वाचेच होते.

मुद्रणकलेच्या शोधानंतर जेव्हा ग्रंथांच्या अनेक प्रती एकाच वेळी उपलब्ध होऊ लागल्या, तेव्हा ग्रंथसंरक्षणाचे कार्य पूर्वीपेक्षा सुलभ झाले, तरी ते सोपे नाही. तथापि मुद्रणयुगातही ग्रंथांचे जतन करण्याची गरज आहेच. काही लोकप्रिय ग्रंथ मोठ्या संख्येने मुद्रित केले जातात, तर काहींची मर्यादित आवृत्तीच प्रसिद्ध केली जाते. ग्रंथालयात ग्रंथ आणताना त्यांची अवस्था, त्यांचा कागद, मुद्रण व बांधणी यांचे कटाक्षाने निरीक्षण केल्यास त्यांच्या टिकाऊपणाबद्दल आगाऊ अंदाज येऊ शकतो. पुष्कळदा स्वस्त म्हणून निवडलेले ग्रंथ कागद, मुद्रण व बांधणी यांच्या निकृष्टतेमुळे लवकर निरुपयोगी होतात म्हणून महाग वाटले, तरी ग्रंथांच्या वापराच्या दृष्टीने टिकाऊ आणि पक्क्या बांधणीचे ग्रंथ निवडणे अधिक श्रेयस्कर ठरते. तांत्रिक संस्कार करताना, देवघेवीच्या व्यवहारांत आणि कपाटात ग्रंथ ठेवण्या-काढण्याच्या वेळी ग्रंथालयातील सेवकांनी ग्रंथ काळजीपूर्वक हाताळले, तर ते अधिक काळ सुरक्षित राहू शकतात. ग्रंथ वापरात असताना त्यांतील पाने सुटली, तर ती तात्काळ चिकटवून घ्यावी लागतात. तसेच ग्रंथांची बांधणी विस्कळीत झाली असल्यास एखाद्या कसबी, तज्ञ आणि विश्वासार्ह बांधणीकारास योग्य सूचना देऊन त्यांची पक्की पुनर्बांधणी शक्य तो लवकर करून घ्यावी लागते.

ग्रंथांचा उपयोग करीत असताना अज्ञानामुळे, अनवधानामुळे वा निष्काळजीपणामुळे वाचक ग्रंथ वेडेवाकडे आणि कसेतरी हाताळतात. ह्यासाठी ग्रंथ कसा काळजीपूर्वक वापरावा, त्यावर कुठे खुणा करू नयेत, तेलातूपाचे आणि शाईचे डाग पाडू नयेत, पाने दुमडू नयेत वा तो वेडावाकडा धरून त्याची बांधणी सैल करू नये इ. मार्गदर्शक सूचनांची चिठ्ठी प्रत्येक ग्रंथावर चिकटविण्याची पद्धत प्रचलित आहे. तसेच ग्रंथ काढताना तो कपाटातून अलगद कसा काढावा व नको असल्यास योग्य जागी पुन्हा तो नीट कसा ठेवावा, ह्याबद्दल दिग्दर्शन करणारे सचित्र फलक ग्रंथालयात सहज दृष्टोत्पत्तीस येतील, असे लावण्यात येतात. काही वाचकांच्या अनिष्ट प्रवृत्तीमुळे ग्रंथालयांतील ग्रंथसंग्रहाचे नुकसान होऊ शकते. ग्रंथांची पाने, चित्रे व नकाशे फाडणे आणि संग्रहालयातील ग्रंथ युक्तिप्रयुक्तीने पळविणे या सामान्यतः सर्व ग्रंथालयातील संग्रहावर येणाऱ्यात आपत्ती होत. ग्रंथालयातून वाचावयास दिल्या जाणाऱ्या ग्रंथांची वाचकासमोर वारंवार तपासणी करून चित्रे-पाने फाडणाऱ्या वाचकांचा शोध घेता येतो.  ग्रंथालयातील दुर्मिळ, मूल्यवान असे संदर्भग्रंथ ग्रंथालयाबाहेर दिले जाऊ नयेत. ग्रंथालयातील वाचकांना ग्रंथसंग्रह-कक्षेत मुक्त प्रवेश देण्याची सवलत ग्रंथालयात असेल, तर दरवाजाजवळ सेवक ठेवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाचकांवर लक्ष ठेवले जाते. ग्रंथालयातील सेवकांद्वारेही अनेकदा ग्रंथ न नोंदता बाहेर जातात. ग्रंथसंरक्षणाच्या हेतूने याला आळा घालणे आवश्यक असते. 


ग्रंथ केवळ वापराने वापराने खराब होतात असे नाही. उलटपक्षी वारंवार वापरात न येणारे ग्रंथही अनेक कारणांनी खराब होऊ शकतात. आग, प्रखर प्रकाश, तीव्र उष्णता, दमट हवा, दूषित वातावरण, धूळ, केरकचरा, पाणी तसेच उंदीरघुशी, झुरळे, मुंग्या, बुरशी, कसर, वाळवी इत्यादिकांपासून ग्रंथांना इजा पोहोचून ते नष्ट होण्याचा संभव असतो. तेव्हा या सर्व ग्रंथशत्रूंचा प्रतिकार करणे आवश्यक असते.

ग्रंथालयात सामान्यतः धूम्रपानास तसेच मेणबत्ती, पणती, कंदील, गॅसचा दिवा इ. खुल्या आणि हालत्या वातीच्या प्रकाशदीपांना बंदी केलेली असते. तथापि एखाद्या अपघाती गोष्टीमुळे ग्रंथसंग्रह अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा संभव असतो. यासाठी ग्रंथालयात अग्निशामक वायूंची नळकांडी आणि वाळूने व पाण्याने भरलेल्या बादल्या नेहमी सुसज्ज ठेवाव्या लागतात. यशिवाय पुष्कळदा ग्रंथसंग्रहाचा विमाही उतरण्यात यतो.

ग्रंथालयांच्या खिडक्यादारांतून कपाटातील ग्रंथांवर प्रखर प्रकाश सतत पडू लागला, की कपाटात उष्णता वाढते व ग्रंथ गरम होऊन त्यांच्या बांधणीवर परिणाम होतो. तसेच ते वेडेवाकडे होतात, त्यांच्या पृष्ठांचा रंग फिक्का होता व उष्णतेमुळे ग्रंथांचा कागद शुष्क होऊन लवकर ठिसूळ बनतो. यासाठी ग्रंथ-कपाटांची रचना करताना कपाटांवर प्रत्यक्ष प्रखर प्रकाश पडणार नाही, अशी काळजी घेणे इष्ट असते.

पावसाळ्यात खिडक्यांतून कपाटांवर पाण्याचा शिडकावा होऊ लागला म्हणजे ग्रंथ भिजतात व त्यामुळे बांधणी खराब होते. कापडाचा कच्चा रंग आतील पानांवर उतरतो व कागद लिबलिबित होऊन पाने एकमेकांस चिकटतात म्हणून पावसापासून रक्षण होण्यासाठी खिडक्यांपासून कपाटे दूर ठेवली जातात. पावसाळ्यात भिंती ओल्या होतात व वातावरणही दमट होऊन ग्रंथांवर बुरशी चढू लागते. ग्रंथ-कपाटे भिंतींपासून अलग ठेवून खिडक्या बंद केल्या तर किंवा फारच कुंद हवा असेल, तर त्याचा वाईट परिणाम टाळण्यासाठी निदान दुर्मिळ ग्रंथांच्या कपाटांत तरी उष्णता देणारे विजेचे दिवे लावून दमटपणा घालविता येतो.

ग्रंथालयांच्या परिसरात गिरण्या व रासायनिक कारखाने असल्यास एकंदर वातावरण दूषित होत असते. या वातावरणाचा परिणाम लोकवस्तीवर जसा होता, तसा तो ग्रंथालयातील ग्रंथ व इतर सामग्री यांवरही होतो.  ग्रंथालयाची वास्तू समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात असली, तर खारट हवेमुळे ग्रंथांची बांधणी व कागद हळूहळू खराब होऊ लागतो. गिरण्या-कारखान्यांच्या धुरात असलेले कोळशाचे किंवा रसायनांचे कण ग्रंथांवर व सामानावर जमू लागतात. या दूषित कणांचा व काजळीचा परिणाम टाळण्यासाठी ग्रंथ वारंवार पुसून स्वच्छ ठेवावे लागतात. ग्रंथालयाची दारे व खिडक्या पक्क्या बंद करून ऐपतीप्रमाणे निष्कासन पंखे किंवा वातानुकूलनाची योजना केल्यास ग्रंथांची खराबी टाळता यते.

ग्रंथालय रहदारीच्या रस्त्यावर अथवा कच्च्या रस्त्यानजीक असल्यास बाहेरची  धूळ वाऱ्याने सतत ग्रंथालयात येत असते. विशेषतः ग्रंथालय तळमजल्यावर असल्यास हा उपद्रव अधिक होतो. ग्रंथालयातील ग्रंथ उघड्या कपाटांत अगर घडवंच्यांत ठेवले असले, तर ग्रंथांवर ही धूळ वारंवार साचते. ह्यासाठी कपाटांतील ग्रंथ आणि कपाटांचे कानेकोपरे वारंवार फडक्याने पुसून काढावे लागतात. ग्रंथ फडक्याने झटकण्यामुळे धूळ उडते व ती इतरत्र पसरते. म्हणून शक्य असल्यास धूलिका निष्कासन यंत्र वापरून धूळ स्वच्छ करण्याचे काम अधिक सुलभतेने व कार्यक्षमतेने करावे लागते.

दमट व कुंद हवेमुळे विशेषतः पावसाळ्यात ग्रंथांवर बुरशी चढू लागते. ह्या बुरशीमुळे ग्रंथांना कुबट वासही येऊ लागतो. ह्यासाठी ग्रंथांची कपाटे साबणाच्या पाण्यात भिजवलेल्या कपड्याने आणि नंतर स्वच्छ गरम पाण्याने भिजवलेल्या दुसऱ्या फडक्याने, तसेच वाळल्यावर शेवटी कोऱ्या फडक्याने ती पुसून घेणे आवश्यक असते. दिवसभर कपाटांची दारे खुली ठेवून आत हवा खेळू द्यावी लागते. अळशीच्या तेलाचे काही थेंब कपड्यावर टाकून कपाटे पुन्हा एकदा पुसून काढावी लागतात. कपाटांत ग्रंथ लावताना ते सुटे राहतील असे ठेवावे लागतात. कपाटांत ग्रंथ ठासून भरण्यामुळे ग्रंथांचा आकार व बांधणी तर खराब होतेच शिवाय बुरशी, वाळवी, कसर इ. कीटकांची त्वरित लागण होते. कपाटांत नॅपथॅलीनच्या किंवा पॅराडायक्लोरोबेन्झीनच्या गोळ्या अथवा वड्या ठेवल्यास ग्रंथकीटकांचा उपद्रव कमी होतो. शिवाय कुबट वासही नाहीसा होतो.

दमट वातावरणामुळे, बुरशी व धूळ यांच्या अस्तित्वामुळे किंवा कपाटांत ग्रंथ गच्च भरण्यामुळे तसेच नवी बांधणी केलेल्या ओलसर ग्रंथांमुळे कसर व तत्सम ग्रंथकीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून कपाटातील ग्रंथ तपासताना ग्रंथांत कीटकांची छिद्रे आढळताच ते ग्रंथ तात्काळ बाहेर काढणे आवश्यक असते. असे छिद्रमय ग्रंथ प्रथम उन्हात तीव्र झळ लागणार नाही अशा तऱ्हेने वाळवावे लागतात. नंतर त्यांच्या बांधणीच्या पुठ्ठ्यावर व इतरत्र कीटकांनी केलेली छिद्रे सुईने पोखरून त्यांत डी. डी. टी. ची. पावडर भरावी लागते व ग्रंथांतही अधूनमधून ती पावडर टाकावी लागते. तंबाखूची पानेही ग्रंथांत ठेवून ग्रंथकीटकांचे आक्रमण थांबविता येते. हे दूषित ग्रंथ शक्य तर वेगळ्या कपाटात ठेवून वारंवार त्यांची तपासणी करावी लागते. ग्रंथालयातील ग्रंथांना कसर लागू नये, म्हणून रासायनिक प्रक्रिया करण्याची पद्धतही उपयुक्त आहे. तीन बाजूंना काचा आणि मध्ये ग्रंथ उभे ठेवण्यासाठी तारांची जाळी असलेल्या फळ्या असणारे बैठे कपाट या प्रक्रियेसाठी मुद्दाम तयार करून घेतात. या कपाटाच्या तळाच्या फळीवर काचेच्या पारदर्शक अशा बशा व त्यांखाली त्या तापवता येतील अशी दिव्यांची योजना केलेला असते. हे कपाट संपूर्णपणे हवाबंद असावे, अशीच त्याची रचना केलेली असते. ग्रंथालयातील चांगले वा दूषित ग्रंथ पंधरावीसच्या गटाने या कपाटातील जाळ्यांवर मोकळे पसरून उभ्या स्थितीत राहतील असे ठेवतात. तळाच्या काचपात्रात थायमॉल, फॉर्मालिन किंवा पॅराडायक्लोरोबेन्झीन अशा जंतुघ्न औषधांचे द्रव अथवा भुकटी टाकून कपाट गच्च बंद करतात व बशीखालचा दिवा पेटवितात. बशीतील औषधाला योग्य उष्णता लागताच औषधाचा धूर होऊ लागतो व तो वरच्या जाळ्यांतून सर्व ग्रंथांतून पसरतो. धूर झाल्यावर दिवा बंद करतात. हे कपाट चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांपर्यंत बंद ठेवले जाते. या वेळात ग्रंथांच्या सर्व बाजूंवर या जंतुघ्न धुराची इष्ट ती प्रक्रिया होते. या प्रक्रियेचा परिणाम साधारणतः वर्षभर टिकू शकतो.


वाळवीने खराब केलेल्या ग्रंथातील पानाचा नमुना

वाळवी हा ग्रंथांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. ही मुख्यतः जमिनीतून वर येते व कितीही उंचावर जाऊ शकते. पुष्कळदा पक्क्या जमिनीतील भेगांतून वा दगडी भिंतीतील छिद्रांतून ती प्रवेश करते आणि लाकडी सामानसुमान किंवा तिच्या संपर्कात येणाऱ्या ग्रंथसंग्रहाचा अल्पावधीत फडशा पाडू शकते. वाळवीबाबत तज्ञांचा सल्ला घेणे इष्ट असते. काही कंपन्या हे काम स्वीकारतात. धुळीचा पाण्याशी संपर्क आल्यास ओलसरपणामुळे वाळवीला वाव मिळतो. कचरा काढताना कोपऱ्यात भिंतीवर अगर इतरत्र मातीची वारूळे दिसली, तर ती तात्काळ नष्ट करणे आवश्यक असते. तसेच प्रथमोचार म्हणून अशा संशयित स्थानी डी. डी. टी. अथवा गॅमेक्झीनचा धूर सोडल्यास वाळवी नष्ट होते परंतु हा धूर ग्रंथांना अपायकारक असल्यामुळे ग्रंथालयात धुराऐवजी त्याची पावडर वापरावी. इमारतीत वाळवी असेल, तर ग्रंथसंग्रहासाठी लोखंडी व पोलादी कपाटांचा वापर करणे इष्ट ठरते. लाकडी कपाटे असल्यास त्यांच्या खुरांखाली डांबर किंवा क्रिओसोलचे द्रव असलेल्या छोट्या वाट्या ठेवाव्यात. तसेच जुन्या लाकडी कपाटांचे खूर, तळ आणि पाठीची बाजू डांबर वा क्रिओसोलच्या द्रवाने रंगवावी, म्हणजे वाळवी कपाटाजवळ येत नाही.

ग्रंथालयाच्या आसपास उपाहारगृह, खानावळ इ. असल्यास उंदीरघुशींचा उपद्रव होऊ शकतो. कित्येकदा ग्रंथालयात सेवक खाण्याचे पदार्थ आणतात व मधल्या सुट्टीत ते ग्रंथालयातच खातात. ह्यामुळे अनवधानाने खाद्यपदार्थांचे कण टेबलावर व जमिनीवर पडतात. त्यासाठी वापरलेले स्निग्ध कागद कचऱ्याच्या टोपलीत जमा होतात. ह्या पदार्थांच्या वासाने ग्रंथालयाकडे उंदीरघुशी आकर्षित होतात व त्यांपासून ग्रंथांची नासधूस होते. हा उपद्रव योग्य ते नियंत्रण करून टाळता येतो. 

ग्रंथालयात पुष्कळदा झुरळांचा प्रादुर्भाव होतो. ग्रंथालयालगतच मोरी, मुतारी अगर शौचकूप असल्यास

झुरळांनी खराब केलेली ग्रंथाची बांधणी

तेथूनच ती ग्रंथालयात शिरतात. हे टाळण्यासाठी मोऱ्या, मुताऱ्या व शौचकूप ग्रंथालयापासून दूर असणे आवश्यक आहे. झुरळे कपाटात शिरली, तर ती ग्रंथांची बांधणी कुरतडतात. ग्रंथांना देवघेवीत कधी तेलातुपाचा स्पर्श झाला असला, तर झुरळे ग्रंथांची पानेही खातात. झुरळांचा उपद्रव टाळण्यासाठी ग्रंथकपाटे स्वच्छ ठेवावी. त्यांत नॅपथॅलीनच्या गोळ्या टाकाव्या व अधूनमधून सर्व ग्रंथालयात आणि कपाटांतही फ्लिट, शेलटॉक्ससारख्या जंतुघ्न द्रवांचे फवारे मारावे. त्यामुळे झुरळे, किडे व मुंग्याही नष्ट होतात.

ग्रंथालयातील हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ हा ग्रंथालयाचा अभिमानास्पद व अमोल ठेवा असतो. त्याचे जतन व रक्षण करणे, हे ग्रंथालयाधिकाऱ्यांचे प्रमुख कर्तव्य ठरते. प्रत्येक हस्तलिखिताच्या खालीवर योग्य आकाराचे पुठ्ठे किंवा पातळ फळ्या ठेवून व त्यांमध्ये हळुवारपणे हस्तलिखित रचून, ते लाल अलवाणाच्या कपड्यात वेखंडाच्या तुकड्यांसह गुंडाळून लोखंडी कपाटात ठेवल्यास हस्तलिखित सुरक्षित राखता येते. ह्या कपाटांत नॅपथॅलीनच्या गोळ्याही टाकतात. वारंवार हस्तलिखिते कपाटांतून काढून खुल्या हवेत ठेवणे इष्ट असते. दुर्मिळ ग्रंथांची व हस्तलिखितांची छायाचित्रे अथवा सूक्ष्मपट तयार करून घेता येतात. झेरॉक्स यंत्राच्या साहाय्याने ग्रंथातील विशिष्ट पानाच्या प्रती वाचकांना सहज उपलब्ध करून देता येतात.

ग्रंथांचे सर्वसाधारणपणे रक्षण करण्यासाठी ग्रंथालयात आवश्यक तो उजेड आणि खेळती हवा असावी. ग्रंथालयाची जमीन सुगंधी फिनाईलच्या पाण्याने वारंवार धुवून काढणे आवश्यक असते. ग्रंथसंरक्षणाचे महत्त्व जाणून त्यासाठी वाचक, ग्रंथपाल, ग्रंथालयीन सेवक या सर्वांनीच प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. 

पहा : कलावस्तु व अवशेष-संरक्षण.

संदर्भ: 1. Lydenburg, H. M. Archer, J. Care and Repair of books, New York, 1960.

          2. Plumbe, W. J. The Preservation of Books, London, 1964.

रेगे, शां. शं.