ग्रंथसंग्रह छंद : व्यक्तिगत हौस किंवा आवड आणि सामाजिक उपयुक्तता यांचा सुंदर मेळ या छंदप्रकारात आढळून येतो. दुर्मिळ पोथ्या, पुस्तके, प्राचीन हस्तलिखिते, ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे वा जुन्या काळचे दस्तऐवज यांचा संग्रह करण्याचे वेड समाजासही उपयुक्त ठरते. त्या त्या ग्रंथाचे वा कागदपत्राचे ऐतिहासिक महत्त्व, त्या त्या ग्रंथाची विशिष्ट प्रत, त्यात ग्रथित केलेला विषय आणि संग्राहकाची वैयक्तिक आवडनिवड यांसारख्या अनेक तत्त्वांना अनुसरून ग्रंथसंग्रह करण्यात येतो. मुद्रणकलेमुळे अलीकडे मुद्रित ग्रंथांच्या वाढीबरोबर या संग्रहाचे स्वरूप बरेच व्यापक व विविध झाले आहे. ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे बहारदार वर्णन चिनी तत्त्ववेत्ता लिन युटांग व चिनी कवयित्री ली चिंगचाओ यांनी केले आहे.

छंद म्हणून जमविलेला व वाढविलेला व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आणि ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हे दोन्हीही संग्रहच. परंतु त्यातील हेतूंमागे मूलभूत फरक आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हा शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा व्यावसायिक उपयुक्ततेच्या दृष्टीने केलेला असतो व तो त्याच हेतूने वाढविला जातो. वाचनाच्या गोडीमुळे आणि ज्ञानप्राप्तीच्या उर्मीतूनही ग्रंथसंग्रहाच्या छंदाची जोपासना होत असली, तरी केवळ संग्रहाक वृत्तीने हौस म्हणून जमविलेल्या ग्रंथसंग्रहासच छंदाचे स्वरूप प्राप्त होते.

ग्रंथसंग्रह सामान्यतः दोन प्रकारे केला जातो : (१) ग्रंथाच्या बाह्यस्वरूपानुसार केलेला ग्रंथसंग्रह व (२) ग्रंथाच्या विषयनुसार केलेला संग्रह. पहिल्या प्रकारात ग्रंथाचे वैशिष्ट्यपूर्ण बाह्यरूप, त्याचे मुद्रण, बांधणी, आकार इ. बाबींचा विचार करण्यात येतो, तर दुसऱ्या प्रकारात ग्रंथाचा विशिष्ट वर्ण्य विषय, विशिष्ट प्रकार व विशिष्ट लेखक इत्यादींचा समावेश होतो. यांशिवाय एखाद्या व्यक्तीला एकाच लेखकाची अथवा एकाच विषयावरील सर्व पुस्तके जमविण्याचा छंद असतो, तर काही छांदिष्टांना प्रत्येक प्रकाशित ग्रंथाची पहिली प्रत संगृहीत करण्याचा व कित्येकांना लेखकांनी स्वाक्षरी केलेली पुस्तके जमविण्याचा छंद असतो. या छंदापायी हस्तलिखिते मिळविण्यास कोणी गावोगावी हिंडतो, तर दुर्मिळ पुस्तके मिळविण्याच्या वृत्तीपायी कित्येकजण जुन्या पुस्तकांच्या दुकानांचे उंबरठे झिजवीत असतात. कित्येकांना दुर्मिळ ग्रंथ, पोथ्यापुस्तकांचा संग्रह करून तो जास्त किंमतीने विकण्याचा छंदही असल्याचे दिसून येते. पण अशी व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टी छंदाच्या मूळ कल्पनेशी विसंगत असते. वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक चित्रांची व विशिष्ट बांधणीची विशिष्ट काळातील पुस्तके आपल्या संग्रहात असलीच पाहिजेत, या भावनेतून राजेलोकांनी तसेच धनिकांनी खूप पैसे खर्च करून आपला ग्रंथसंग्रहाचा छंद पूर्ण केला आहे. तंजावरचे राजे सरफोजी भोसले यांचा सरस्वतीमहाल हा ग्रंथसंग्रह या दृष्टीने उल्लेखनीय आहे. दुर्मिळ ग्रंथ आपल्या हातचा जाऊ नये, म्हणून आपल्या गळ्यातील रत्नजडित कंठे काढून देणारेही राजे होऊन गेले. धार्मिक ग्रंथ जमवून त्यांची ठराविक दिवशी पूजा करण्याची प्रथाही आढळते. आपण ग्रंथप्रेमी आहोत, सुसंस्कृत आहोत, आपणास नाट्य, काव्य, कला यांमध्ये रस आहे, याचे प्रदर्शन करण्यासाठी आपली कपाटे पुस्तकांनी सजविण्याचाही कित्येकांना छंद असतो, तर काही आपल्या ग्रंथसंग्रहावर जिवापाड प्रेम करणारेही आढळतात. गरीब-श्रीमंत असा भेद या छंदाच्या बाबतीत आढळत नाही. 

ग्रंथसंग्रह-छंद ज्यांच्या सहकार्यामुळे टिकविला जातो, त्यांमध्ये ग्रंथविक्रेत्यांचा वाटा फार मोठा असतो. जेम्स डे रोटशिल्ट यांचा ग्रंथसंग्रहाचा छंद मॉर्गंड आणि राहीर या फ्रेंच ग्रंथविक्रेत्यांनी पुरविला, तर जॉन पेन या इंग्लिश ग्रंथविक्रेत्याने टॉमस ग्रेन्‌‌व्हिल यांच्या छंदाला साद दिली. हैदराबादचे तिसरे सालारजंग यांच्या ग्रंथसंग्रह छंदाला जगातील अनेक नामवंत ग्रंथविक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

प्राचीन व मध्ययुगीन काळांत ग्रंथसंग्रहाचा छंद राजेरजवाडे, समाजातील गर्भश्रीमंत आणि विद्वान यांच्यापुरताच मर्यादित होता. या दृष्टीने ईजिप्तच्या टॉलेमी राजघराण्यातील राजे, रोमचा सुप्रसिद्ध मुत्सद्दी सिसेरो यांचे ग्रंथसंग्रह प्रसिद्धच आहेत. मुद्रणकलेच्या शोधानंतर मात्र या छंदाला अधिक वाव मिळाला. सामान्य व्यक्तीला या छंदाचे माहात्म्य कळले. विविध प्रकारच्या ग्रंथांची उपलब्धता सहजसुलभ झाल्याने वैयक्तिक ग्रंथसंग्रह करण्याची वृत्ती वाढीला लागली. फ्लॉरेन्सचा मेदीची, नेपल्सचे अर्गोनीझ राजघराणे, हंगेरीमधील कॉरव्हायनस मथायस यांना या छंदाचे मनस्वी वेड होते. ग्रंथसंग्रह करण्याच्या छंदामुळेच सोळाव्या शतकातील तंजावरच्या तेलुगू नायक राजांनी आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. त्या काळी ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वा पोथ्यांच्या बाह्यस्वरूपावर आकर्षित होऊन ग्रंथसंग्रह करण्याचा छंद अनेकांना होता. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत त्यास निराळे वळण लागले. पुस्तकांच्या बाह्यस्वरूपाऐवजी त्यांतील विषय, भाषेचे सौंदर्य, शैली यांमुळे विशिष्ट लेखकांची अथवा विशिष्ट विषयावरची पुस्तके जमविण्यात अनेकजण रस घेऊ लागले. इंग्लंडमधील डेव्ह्‌नशर अणि नॉर्थम्‌बरलँडचे ड्यूक, लँचेस्टर आणि क्रॉम्फर्डचे अर्ल, सर हान्स स्लोन, सर रॉबर्ट कॉटन, रॉबर्ट हार्ली आणि एडवर्ड हार्ली इत्यादींच्या वैयक्तिक संग्रहांत विविध विषयांवरची पुस्तके होती. छंद म्हणून अनेकांमध्ये एलिझाबेदन व जॅकोबिअन काळातील नाटकांचा संग्रह करण्याची चढाओढ लागली होती.  फ्रान्समध्ये शौर्याची कथाविषयक पुस्तके जमविण्याचा छंद अनेकांना होता. दुर्मिळ हस्तलिखिते, चित्रे वा पुस्तके  जमविण्यात अमेरिकेतील जॉन पीअरपॉट मॉर्गन याने लाखो रुपये खर्चिले. अलवारच्या महाराणा वणीसिंगाने शेख सादीचा गुलिस्तान  हा दुर्मिळ ग्रंथ पन्नास हजार रुपयांस विकत घेतला होता, तर अयोध्येस शहाजहानामाचे हस्तलिखित बारा हजार रुपयांना विकले गेले होते. १४७१ मध्ये छापलेल्या इटालियन लेखक बोकाचीओच्या डिकॅमेरॉन  या कथासंग्रहाची दुर्मिळ प्रत मिळविण्यासाठी ब्लँडफोर्ड या श्रीमान्‌ गृहस्थाने बावीसशे पौंड खर्ची घातल्याचे उदाहरण सापडते. लॉर्ड मेकॉलेच्या संग्रहात वरील दृष्टींनी जमविलेली पाच हजार पुस्तके होती.

ग्रंथसंग्रहाच्या छंदापायी माणसे आपला वेळ, पैसा, शक्ती वेचतात परंतु त्यामुळे समाजाचा फायदा होतो. जगातील विख्यात ग्रंथालयांची निर्मिती या छंदातूनच झाली. टॉमस जेफर्सन यांच्या ग्रंथसंग्रहवृत्तीमुळेच वॉशिंग्टनच्या जगप्रसिद्ध ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’चा पाया घातला गेला. ‘न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी ’ची स्थापना जेम्स लेन्‌क्स आणि जॉन ॲस्टर यांच्या ग्रंथसंग्रहाच्या देणगीतूनच झाली. पाटण्याचे डॉ. सच्चिदानंद सिंहा यांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळेच ‘सिंहा लायब्ररी’ उदयास आली. कलकत्त्याचे सर आशुतोष मुखर्जी यांनी आपला अमोल ग्रंथसंग्रह भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाला दिला, त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाची शान वाढली. सुप्रसिद्ध घटना पंडित डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपला ग्रंथसंग्रह मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजला दिला. तर म. म. दत्तो वामन पोतदार यांनी आपला अनेक दुर्मिळ ग्रंथ असलेला संग्रह पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वाधीन केला. हैदराबादचे राजे शामराज रायराजन् (एम्. एस्.भालेराव) यांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळेच मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात मौलिक भर पडली. हैदराबादचे नबाब मीर युसफ अलिखान, तिसरे सालारजंग यांच्या ग्रंथसंग्रह-छंदाची परिणती अत्युत्कृष्ट ग्रंथसंग्रह-निर्मितीत झाली. पुण्याचे सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी संगीतावरील दुर्मिळ असे शेकडो ग्रंथ, हस्तलिखिते जमा केली होती आणि देणगी म्हणून ती सर्व समाजालाच परत दिली. यांखेरीज नागपूरचे गो. ग. जोशी यांचा शिल्पशास्त्रावरील ग्रंथसंग्रह, पुण्याचे डॉ. जी. डी. आपटे यांचा वैद्यकशास्त्रावरील ग्रंथसंग्रह, सोलापूरचे इराबत्ती आणि पुण्याचे ना. दा. अभ्यंकर यांचे वृत्तपत्र-कात्रणांचे संग्रह, तसेच सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, बॅ. तेजबहादुर सप्रू, बॅ. मु. रा. जयकर, डॉ. डी. आर्‌. भांडारकर, सूचिकार शं. ग. दाते, अ. का. प्रियोळकर इत्यादींच्या ग्रंथसंग्रह-छंदामुळेच भारतामधील अनेक ख्यातनाम ग्रंथालये समृद्ध झाली आहेत. 

हिंगवे, कृ. शं.