गौळी : (गवळी हिं. कुकरबिचा गु. गोवाली लॅ. ग्रेविया पॉलिगॅमा कुल-टिलिएसी). खूप फांद्या असणाऱ्या या लहान वृक्षाचा प्रसार पश्चिम घाट, कोकण, दख्खन, उपहिमालयात १,३९५ मी. उंचीपर्यंत, सिंधूच्या पूर्वेस, बिहार, ओरीसा, उत्तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पेगू इ. प्रदेशांत आहे. याच्या कोवळ्या भागांवर मखमली लव असून बारीक फांद्यावंर साधी पानं दोन रांगांत येतात ती लांबट, टोकदार, काहीशी दातेरी, तीन मुख्य शिरांची, वरून थोडी केसाळ पण खालून मखमली लवदार असतात. उसपर्णे लांब आणि केसाळ. फुले लहान, पांढरी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), एकलिंगी (नर) आणि द्विलिंगी असून चवरीसारख्या वल्लरीत सप्टेंबर–नोव्हेंबरात येतात. अश्वगर्भी (आठळीयुक्त) फळ लहान, तपकिरी, केसाळ आणि चतुष्खंडी (चार भागांचे) असून ते गोड व खाद्य असते.
फळ व मूळ अतिसारात आणि पानांचा काढा आमांशावर गुणकारी असतो. मूळ पाण्यात उगाळून लवकर पुवाळण्यास लावतात आणि जखमांवर बाहेरून बांधतात.
पहा : टिलिएसी.
जमदाडे, ज. वि.