गौहाती विद्यापीठ : आसाममधील एक प्रसिद्ध विद्यापीठ. १९४७ च्या गौहाती विद्यापीठीय अधिनियमानुसार हे विद्यापीठ गौहाती या ठिकाणी १९४८ मध्ये अस्तित्वात आले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्म, संलग्नक व निवासी असून विद्यापीठाच्या कक्षेत शिवसागर व लखिमपूर जिल्ह्यांव्यतिरिक्त आसाम राज्यातील सर्व महाविद्यालये समाविष्ट होतात. यांशिवाय मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल या प्रदेशांतील महाविद्यालयेही त्यात अंतर्भूत होतात. १९७२ मध्ये १०७ महाविद्यालये विद्यापीठास संलग्न केलेली असून फक्त विधी महाविद्यालय हे एकच घटक महाविद्यालय होते. गौहातीच्या पश्चिमेस जवळच जालुकबारी येथे अध्यापकीय विभाग ठेवलेले आहेत. विद्यापीठाच्या एकूण अधिकृत अशा चार कार्यकारी संस्था आहेत : (१) कोर्ट, (२)कार्यकारीमंडळ, (३) विद्वत्सभा आणि (४) विद्याविभाग. कुलगुरू हा पूर्ण वेळ काम करणारा सवेतन उच्चपदाधिकारी आहे.

विद्यापीठात एकूण २२ विषयांच्या पदव्युत्तर परीक्षांची सोय आहे. याशिवाय भिन्न विषयांच्या शाखोपशाखा आहेत. १९६२-६३ मध्ये या विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम स्वीकारला. पदवी पत्रिकाही येथे मिळतात. शैक्षणिक वर्ष जुलै ते मे असून त्याची तीन सत्रे असतात. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांतून १९७०-७१ मध्ये सु. ५९,८६६ विद्यार्थी शिकत होते.

विद्यार्थ्यांची १४ वसतिगृहे आहेत. अध्यापकांची निवासालये ५६ आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थि-सल्लागार-मंडळ भारतात व भारताबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्य करते आणि माजी विद्यार्थांना व्यवसायांसंबंधी माहिती पुरविते. संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थि-संघांच्या जोडीस पदवीपूर्व आणि पदव्युत्तर असेही दोन विद्यार्थी-संघ आहेत.

विद्यापीठाचे प्रतित्रिवर्षीय इतिवृत्त, वार्षिक अंक, पाठ्यपुस्तके, विद्यापीठस्थ विद्यार्थ्यांची वार्षिक नियतकालिके प्रकाशित होतात.

मानवशास्त्र, वनस्पतिविज्ञान, वाणिज्य, शिक्षण व भूविज्ञान यांची विद्यापीठात वस्तुसंग्रहालये आहेत. बहिःशाल व्याख्याने विद्यापीठात व महाविद्यालयांत होतात. ग्रंथालयात १९७० मध्ये १,०७,११६ ग्रंथ होते. 

विद्यापीठाचा १९७१-७२ चा वार्षिक अर्थसंकल्प सु. १७८·९४ लाख रुपयांचा होता.

घाणेकर, मु. मा.