गोविंददास कर्मकार : (पंधरावे-सोळावे शतक). चैतन्यकालीन बंगाली कवी. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या जीवनचरित्रावर बरीच काव्ये लिहीली गेली. त्यांखेरीज गोविंददासेर कडचा (‘कडचा’ म्हणजे टिपण) या शीर्षकाचे आणखीही एक निराळेच बंगाली काव्य चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर लिहिले गेले होते. गोविंददासेर कडचा  या काव्यग्रंथात कवीने स्वतःचा परिचय दिला आहे. तो असा : बरद्वान जिल्ह्यातील कांचनपूर गावी राहणाऱ्या व श्यामदास कर्मकार (लोहार) याचे गोविंददास पुत्र. मातेचे नाव माधवी. पत्नी शशीमुखी हिच्या कजाग व तोंडाळपणाला कंटाळून त्यांनी घर सोडले (१५०८) व ते काटव येथे गेले. तेथे चैतन्यांची महती ऐकून नवद्वीपला गेले व चैतन्यांचे चाकर होऊन राहिले. चैतन्य नीलाचलावर गेले, त्या वेळी गोविंददास त्यांच्याबरोबर होते. गोविंददासेर कडचामध्ये चैतन्यांच्या दक्षिणेकडील पर्यटनाचे वर्णन आहे.

पुष्कळांच्या मते गोविंददासेर कडचा  हे चैतन्यांच्या चरित्रावरील अधिकृत व आधारभूत काव्य होय. गोविंददासांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभविलेल्या घटना या ग्रंथात ग्रथित केल्या आहेत तथापि नानाविध  कारणांनी या ग्रंथाच्या अधिकृतपणाविषयी संदेह व्यक्त करण्यात येतो. 

कमतनूरकर, सरोजिनी