गोवा, दमण, दीव : पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ मध्ये मुक्त झालेले भारताचे भाग. लोकसंख्या ८,५७,७७१ (१९७१). पैकी गोवा ७,९५,१२०; दमण ३८,७३९; दीव २३,९१२. क्षेत्रफळ ३,८१३ चौ. किमी. पैकी गोवा ३,७०१ चौ.किमी., दमण ७२ चौ. किमी., दीव ४० चौ. किमी. आता हे भाग उपराज्यपालांद्वारा केंद्रशासित आहेत. यांपैकी गोवा प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या दरम्यान १४° ५३’ उ. ते १५° ४८’ उ. व ७३° ४५’ पू. ते ७४° २४’ पू. यांमध्ये आहे. त्याच किनाऱ्यावर गुजरातच्या दक्षिणेस दमण २०° २५’ उ. व ७२° ५३’ पू. वर आणि दीव बेट सौराष्ट्र द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला २०° ४३’ उ. व ७१° २’ पू .वर आहे. गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. दमणच्या पश्चिमेस खंबायतचे आखात व बाकी तीन दिशांना गुजरात राज्याचा प्रदेश आहे. दीव बेट पूर्व, दक्षिण व पश्चिम दिशांना अरबी समुद्राने वेढलेले असून त्याच्या उत्तरेस एका मोठ्या दलदलीतून जाणाऱ्या अरुंद खाडीपलीकडे दीवमध्येच समाविष्ट असलेला गोगोला हा थोडा भूभाग व सिंबोर उपसागरातील पाणीकोटा बेट आहे. त्याच्याभोवती गुजरातचा जुनागढ जिल्हा आहे. गोव्याचा १०५ किमी. समुद्रकिनारा मच्छिमारी नौकांस आसरा म्हणून उपयोगी पडणाऱ्या अनेक खाड्या व पांढऱ्याशुभ्र वाळूच्या अनेक सुंदर पुळणी यांनी युक्त आहे.
भूरचना : दक्षिणोत्तर सु. १०५ किमी. व पूर्वपश्चिम सु. ६० किमी. लांबीरुंदीचा गोव्याचा भूप्रदेश कोकणपट्टीचा दक्षिण भाग होय. सह्याद्री आणि समुद्र यांच्या दरम्यानची ही डोंगराळ भूमी पश्चिमेकडे उतरत गेली आहे. ईशान्येपासून आग्नेयीपर्यंतच्या सीमेवरील सह्याद्रीचे अनेक फाटे पश्चिमेकडे आले आहेत. उत्तरेकडील सत्तरीच्या पर्वतभागात सोंसोगड (१,१८६ मी.), क्षत्रियांची माउली किंवा कातलांची माउली (१,१२६ मी.), वाघेरी (१,०८५ मी.) व मोरलेगड (१,०५४ मी.) ही शिखरे उल्लेखनीय आहेत. त्यांखेरीज सिद्धनाथ, चंद्रनाथ, दूधसागर, मोरपिर्ल या डोंगरांवरील सृष्टिसौंदर्य आकर्षक आहे. सह्याद्रीत उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक लहानलहान नद्यांपैकी उत्तर सीमेची आरोंदा अथवा तेरेखोल, चापोरा अथवा कोळवली, बाग, मांडवी, जुवारी किंवा अघशी (अघनाशिनी), साळ, तळपण व गालजीबाग या प्रमुख आहेत. त्यांतल्या सर्वांत लांब सु. ६२ किमी. मांडवी व जुवारी आहेत. बाग नदी तर अवघी १·५ किमी. आहे. मांडवी व जुवारी आणि त्यांच्या उपनद्या यांमुळे गोव्याच्या उत्तर भागात सर्वत्र अनेक बेटे बनलेली आहेत, जलमार्ग उपलब्ध झाले आहेत आणि उत्कृष्ट बंदरे निर्माण झाली आहेत. दमणाच्या उत्तर सीमेला भगवान नदी, दक्षिण सीमेला काळू नदी व मध्य भागाला दमणगंगा असून तिच्या मुखाशी दोन्ही तीरांवर वसलेले दमण समोरच्या समुद्रात वाळूचा बांध पडल्यामुळे एक सामान्य बंदर झाले आहे. हा प्रदेश सपाट आहे. दीव बेट पूर्वपश्चिम सु. ११ किमी. व दक्षिणोत्तर सरासरी ३ किमी. रुंदीचे असून त्याच्यावर मधूनमधून सु. ३१ मी. उंचीच्या टेकड्या आहेत. याच्या दक्षिण किनाऱ्याला सिकताश्म खडकाचा एक कडा असून त्याच्या पायथ्याशी समुद्राचे पाणी खोल आहे. गोवा प्रदेशातील मृदा बव्हंशी जांभ्या खडकापासून झालेली आहे. पूर्वभागात केवळ त्याच जातीची माती असली तरी नद्यांच्या काठी नदीगाळ, किनाऱ्याच्या आत रेतीमिश्रित गाळ आणि किनाऱ्याला रेताड व खार जमिनी किंवा दलदली आहेत. दमण भागातील ओलसर रेतीमिश्रित गाळजमीन सुपीक आहे. दीव बेटावर मात्र निकृष्ट मृदा आहेत. खनिजांचे बाबतीत गोवा संपन्न आहे. येथे लोहधातुक मँगॅनीज आणि चुनखडी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दमण व दीवमध्ये खनिजे उपलब्ध नाहीत. गोवा प्रदेशात ८ नद्यांखेरीज ९ उपनद्या, ७ तळी व ४ कालवे असून मडकईची नदी कुंभारजुव्याचा कालवा; मांडवी व जुवारी नद्यांना जोडून गोवा तालुक्याला तिसवाडी किंवा इलहास बेट बनवतो. हा खरोखर ११ बेटांचा द्वीपसमूहच आहे. शिवाय गोव्यातील नद्यांत २१ बेटे असून ४ बेटे समुद्रात आहेत. अंजदीव हे बेट कारवारच्या (उ. कानडा) जवळ आहे.
हवामान : गोव्याचे हवामान सामान्यतः उष्ण व आर्द्र आहे. जून ते सप्टेंबर नैर्ऋत्य मॉन्सूनचा पाऊस जोरदार पडतो. तो पश्चिम भागातील १०० मी. पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात २८० ते ३५० सेंमी. असतो, तर पूर्वेच्या डोंगराळ प्रदेशात ५०० ते ७५० सेंमी.पर्यंतही जातो. तपमान पश्चिम भागात सामान्यतः २२° ते ३२° से. असते. पूर्व भागात मात्र किमान व कमाल तपमानांतील अंतर बरेच जास्त असते. पर्जन्योत्तर काळात गोव्याची हवा सुखद असते. पणजी येथील फेब्रुवारी, मे, जुलै व नोव्हेंबर महिन्यांचे सरासरी तपमान अनुक्रमे २४·३° से., २९·८° से., २६·४° से. व २७·६° से. असते. याच महिन्यांतील सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे ० सेंमी., १·७६ सेंमी., ८९·२१ सेंमी. व २·०४ सेंमी. आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान २३१·४ सेंमी. असते. दमणचे हवामान समशीतोष्ण असून पाऊस १५० ते २०० सेंमी. पडतो. दीव बेटावर हवा पावसाळ्यात दमट व एरवी कोरडी असते. पाऊस सु. १०० सेंमी.पर्यंत पडतो. गोव्यात २८·४% भूमी वनाच्छादित आहे. या १,०५१ चौ. किमी. क्षेत्रात सु. चतुर्थांश भाग पूर्वेच्या बाजूस खोल दऱ्यांत व उभ्या डोंगर उतारांवर विखुरलेला आर्द्र, सदाहरित वृक्षांचा असून बाकीचा पानझडी वृक्षांचा आहे. शिसव, चंदन, देवदार, खैर, बाभूळ, वेळू आणि अनेक खाद्य व औषधी वन्य वनस्पती गोव्याच्या जंगलांत आहेत. लागवडीची झाडे नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजू, कोकम, जांभूळ, ओटंब अशी असून पपनस, अननस व इतर फळझाडांची जोपासनाही बऱ्याच प्रमाणात होते. वन्य पशूंत वाघ, चित्ते, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, चितळ, माकड, मुंगुस व ससा यांचा समावेश होतो.
ओक, शा. नि.
इतिहास : महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’त (अध्याय ९) आणि स्कंदपुराणात (सह्याद्री खंड) गोमंत, तर सुतसंहितेत गोवापुरी ही नावे आढळतात. पुरातनकाळी येथे गोधनाची विपुलता असल्यामुळे हे नाव पडले, ही एक व्युत्पत्ती. या प्रदेशात आर्य संस्कृती आणणाऱ्या परशुरामाने गौ (= बाण) सोडला, तो येथपर्यंत पोहोचला. त्या बाणाचा अंत जिथे झाला, तो प्रदेश गौमान्त – गोमन्त ही दुसरी व्युत्पत्ती. राज्यकर्त्या कदंबांची राजधानी गोपकपट्टण (थोरले गोवे) होती.
इ. स. पू. तिसऱ्या व दुसऱ्या शतकांत या प्रदेशात मौर्यांचा अंमल होता. त्यानंतर तो सातवाहनांनी जिंकला होता की नाही, हे अनिश्चित आहे. अर्बेली (साखळी महाल) येथील गुहेत सापडलेल्या शिलालेखांवरून इ. स. पहिल्या शतकात येथे एक मोठे शहर व व्यापारी केंद्र असावे, असे दिसते. अंत्रूज (फोंडा) महालातील दोन ताम्रपटांप्रमाणे चंद्रपूर (चांदर) येथे चौथ्या शतकात देवराज राज्य करीत होता असे ठरते; परंतु हा कोणत्या घराण्यातील होता याचा बोध होत नाही. त्या शतकातच गोव्यात बनवासी येथे कदंबांची सत्ता सुरू झाली. पाचव्या शतकात कदंब बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक बनले, तरी त्यामुळे त्यांची गोमंतकावरील सत्ता नष्ट झाली नाही; पण गोव्याच्या प्रदेशात बादामी चालुक्यांची कित्येक ताम्रशासने मिळाली आहेत. आठव्या शतकाच्या मध्यात राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार केंपें महालातील बाळ्ळीहून या प्रदेशात काही भागावर राज्य करीत होते. चालुक्यांशी विवाहसंबंध जोडून जयकेशी कदंबाने आपली सत्ता वाढवली. कदंबांच्या सत्तेचा काळ हा गोव्यातील भरभराटीचा काळ. या घराण्यातील पहिला व दुसरा गूहल्लदेव, पहिला आणि दुसरा जयकेशी, विजयादित्य हे विशेष पराक्रमी होते. सबंध कोकणपट्टीवर त्यांचा दबदबा होता. कदंब राजांनी आपली राजधानी चांदरहून गोपकपट्टण येथे हलवली. याच बंदरातून परदेशांशी व्यापार चाले. दरबारात उच्च स्थानी नेमलेल्या सदन या अरबाच्या साहाय्याने दुसऱ्या जयकेशीने गोपकपट्टणात अनेक सुधारणा केल्या. पश्चिम किनाऱ्यावर प्रबळ आरमार स्थापन केले; तथापि अरबांनी धर्मवेडापायी हिंदू संस्कृतीचा नाशही पुष्कळ केला. बाराव्या शतकात आपले प्रभुत्व टिकविण्यासाठी कदंबांना होयसळांशी संघर्ष करावा लागला. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी कदंबाना मांडलिक बनवून गोमंतक आपल्या सत्तेखाली आणला. सिंघण यादवाच्या पदरी असलेल्या गोव्यातील भतग्रामच्या मायिदेवाने मोडकळीस आलेली कदंबांची सत्ता सावरण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. गोव्यात यादवांची सत्ता १०१ वर्षे होती. त्यांनी गोव्याच्या वैभवात मोलाची भर घातली.
चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणेवर स्वारी करणाऱ्या मलिक काफूरने गोव्यावरही हल्ला केला, गोपकपट्टणचा नाश करून मंदिरे पाडली. १३२५ मध्ये महंमद तुघलकाने त्याचीच पुनरावृत्ती केली. कदंबांची सत्ता खिळखिळी झालीच होती, त्याचा फायदा घेऊन होन्नावरच्या नबाब जमालुद्दीनने गोवा पादाक्रांत केला; परंतु याच काळात दक्षिणेस स्थापन झालेल्या विजयानगरच्या सम्राटांनी गोव्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यांनी गोव्याची भरभराट केली. यानंतर गोव्यावरील सत्तेसाठी विजयानगर व बहमनी सुलतान यांत संघर्ष सुरू झाला. १४६९ साली बहमनी राज्याचा मुख्य प्रधान महमूद गावान याने गोव्यावर स्वारी करून त्यावरील विजयानगरची सत्ता नष्ट केली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून विजापूर येथे स्वतंत्र राज्य स्थापणाऱ्या युसूफ आदिलशाहाने गोवा आपल्या राज्याला जोडला. युसूफने जुन्या गोव्यात आपले राजवाडे बांधले. स्थानिक देसाई, प्रभुदेसाई, सरदेसाई यांच्यामार्फत गोव्याचा कारभार केला.
हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने गोवा हस्तगत केले (१६ फेब्रुवारी १५१०). त्यात त्याला विजयानगरचा नौदल प्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी १५७० पर्यंत गोव्याखेरीज सासष्टी, बारदेश आणि तिसवाडी एवढा प्रदेश बळकावला. त्याचप्रमाणे मोगलांविरुद्ध मदत करण्याच्या मिषाने चौल व वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानांकडून मिळविले आणि दीव-दमणचे किल्ले बांधले (१५३५ व १५५९). १५४२ पासून खिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. या वेळेपासूनच हिंदु-मुसलमानांवर सर्व तऱ्हेची बंधने लादण्यात आली. कॅथलिक ख्रिस्त्यांचे गोवा हे पूर्वेकडील सर्वांत मोठे केंद्र होते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस गोव्याचे ख्रिस्ती वैभव कळसाला पोहोचले होते. तेथील चैनी जीवनाचे अनेक प्रवाशांनी वर्णन केले आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला यूरोपातील युद्धांच्या परिणामी १६०३ व १६३९ मध्ये डचांनी गोव्याची नाकेबंदी केली होती.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिवाजी महाराजांनी कोकणपट्टीत नवे किल्ले बांधून आरमार वाढवल्यावर पोर्तुगीजांना दहशत निर्माण झाली. कोकणातील बंडखोर देसायांना आश्रय, जंजिऱ्याच्या सिद्दीला गुप्त मदत, अशा कारणांनी शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली व फोंडा किल्ला जिंकला (१६७५). दमणाच्या चौथाईच्या प्रश्नावरून दोघांत वाद होऊ घातलेले युद्ध महाराजांच्या मृत्यूमुळे टळले; पण ते तात्पुरते. दक्षिणेत उतरलेल्या मोगल सैन्याला जाण्यासाठी वाट दिली, म्हणून युद्धाला तोंड लागले. पोर्तुगीजांनी फोंड्याला दिलेला वेढा संभाजी महाराजांनी उठवला आणि सासष्टी-बारदेशवर चढाई केली (१६८३). मराठे गोवे घेण्याच्या बेतात होते; पण तेवढ्यात औरंगजेबाचा मुलगा शाह आलम हा कोकणच्या स्वारीवर आल्यामुळे मराठ्यांना पोर्तुगीज प्रदेशातून माघार घ्यावी लागली. १७३७ पासून मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली वसईवर मोहीम चालू केली. परिणामी उत्तरेकडे दीव, दमण एवढेच किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले; परंतु १७४२ मध्ये ब्राझीलहून ११,००० नवी फौज आल्याने पोर्तुगीजांनी तो पुन्हा हस्तगत केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठे सरदारांच्या अंतस्थ कलहांचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी घेऊन राज्यविस्तार केला व सावंतवाडीच्या भोसल्यांकडून पेडणे, साखळी, सत्तरी हा मुलूख मिळविला (१७८८). अर्थात तो टिकवून धरण्यासाठी पोर्तुगीजांना लढाया कराव्या लागल्या. त्याचप्रमाणे हैदर-मराठे लढायांचा फायदा घेऊन सोंधेकरांकडून त्यांनी सांगे, केंपें, फोंडे आणि काणकोण हा प्रदेश मिळवला. याच काळात राजधानी जुन्या गोव्याहून पणजीला हलविली (१७५९). अठराव्या शतकातील इंग्रज-फ्रेंच युद्धात फ्रान्सविरुद्ध मदत करण्याच्या मिषाने १७९९ ते १८१५ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणींनी गोव्यात तळ दिला. यूरोपातील युद्ध संपल्यावरच त्या परत गेल्या. आग्वादचा किल्ला १८१५ पर्यंत इंग्रजांच्या ताब्यात होता. १८३९ मध्ये फरारी ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोवेकर आश्रय देतात, पोर्तुगीज सरकारकडे ब्रिटिशांचे बरेच येणेही आहे, या सबबींवर ब्रिटिश सरकारने गोव्याचा मुलूख देण्याविषयी बोलणे लावले; पाच लाख पौडांना तो बिकत घेण्याची तयारीही दाखविली; पण पोर्तुगालने मागणी फेटाळून लावली.
पोर्तुगीज सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले. पैकी काही स्थानिक स्वरूपाचे होते. गोवा आदिलशाहीला जोडण्यासाठी कास्त्रू या पाद्र्याने (१६५४) किंवा पिंटो मंडळींनी केलेले कट (१७७८) यशस्वी झाले नाहीत. सत्तरी महाल पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यापासून तेथील राणे मंडळींनी पोर्तुगीजांविरुद्ध अनेक वेळा उठाव केले. यांतील दिपू राणे (१८५२-५५) व दादा राणे (१८९५-९६) यांची बंडे प्रसिद्ध आहेत. पहिले शेतजमिनीवर लावलेल्या करामुळे उद्भवले. दुसरे गोवेकर शिपायांना आफ्रिकेत पाठवण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी होते. या उठावांमुळे राणे मंडळींना कडक शिक्षा भोगाव्या लागल्या. १८७० मध्ये गोव्यात लष्करी बंडही झाले; १९१२ मध्ये बाळ्ळी महालातील झील सावंत व सत्तरी महालातील हिरबा राणे यांचा पुंडावा मोडण्यासाठी आफ्रिकेतून सैन्य आणले होते.
१८४५ पासून गोव्याला पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये मर्यादित मताधिकार मिळाला. १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये राजसत्ता नष्ट होऊन प्रजासत्ताक अस्तित्वात आले. त्यामुळे गोमंतकाला प्रांतिक स्वायत्ततेचा फायदा मिळाला (१९१७); परंतु १९२६ मध्ये पोर्तुगालमध्ये पुन्हा राज्यक्रांती होऊन नंतर सालाझारची हुकूमशाही सुरू झाली. त्यामुळे ही स्वायत्तता संपुष्टात आली. विसाव्या शतकात पोर्तुगीज सत्ता झुगारून देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. १९२८ मध्ये मुंबई येथे गोवा काँग्रेस कमिटी स्थापन झाली. १९४६ मध्ये राम मनोहर लोहियांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. भारत स्वातंत्र झाल्यावर गोवा विमोचनाच्या प्रयत्नांना अधिक जोर आला. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रे या जागतिक संस्थेकडे सोपवण्याचे पोर्तुगालने नाकारले (फेब्रु. १९५०). १९५४ मध्ये दाद्रा-नगरहवेली हा भाग मुक्त करण्यात आला. तेथे आपल्या फौजांना जाण्यासाठी मोकळीक असावी, म्हणून पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुदरलेल्या अर्जाचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेला (१२ एप्रिल १९६०) आणि ऑगस्ट १९६१ मध्ये तो भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला. १९५५ मध्ये मोठ्या प्रमाणावर सत्याग्रहींनी गोमंतक प्रवेशाचा प्रयत्न केला; भारत-पोर्तुगाल राजनैतिक संबंध तुटले आणि भारताने गोव्याची नाकेबंदी करण्याचे धोरण अंमलात आणले. आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन-समिती अशा अनेक संघटनांनी गोव्याचे स्वातंत्र्य जवळ आणले. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली. पुढच्या वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. नंतर निवडणुका होऊन लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले (२० डिसें. १९६३). गोवा विधिमंडळाचे हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता (२२ जाने. १९६५); परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी या प्रश्नावर घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित असावे असे ठरले. गोव्यात त्यानंतर बांदोडकरांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता निवडणुकीनंतर आली. बांदोडकरांच्या मृत्यूनंतर शशिकलाबाई काकोडकर त्याच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री झाल्या (१९७३).
राज्यव्यवस्था : भारतीय संघराज्यातील हा केंद्रशासित घटक प्रदेश आहे. राष्ट्रपतींनी नेमलेल्या नायब राज्यपालांच्या संमतीनुसार विधानसभेला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ कारभार पाहते. दमणसाठी दोन जिल्हाधिकारी व दीवसाठी एक प्रशासक काम करतो. विधानसभेचे ३० सदस्य आहेत. लोकसभेसाठी दोन प्रतिनिधी निवडून जातात.सध्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अधिकारारूढ असून त्याचे विधानसभेत १६ सदस्य आहेत. युनायटेड गोवन्स हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. ३ डिसेंबर १९६६ पासून सहा महिने राष्ट्रपतींची राजवट जारी होती. शासनाच्या सोयीसाठी उत्तर व दक्षिण असे विभाग पाडलेले आहेत. उत्तर विभागात गोवा (तिसवाडी), बारदेश, पेडणे, डिचोली, सत्तरी आणि दक्षिण विभागात फोंडे, सांगे, केंपें, मुरगाव, सासष्टी व काणकोण या तालुक्यांचा समावेश केलेला आहे. दीव व दमण येथील कारभार प्रशासक पाहतो. पणजी ही राजधानी असून भारतीय संघराज्यात समाविष्ट झाल्यापासून पोर्तुगीज कायदेकानू रद्द होऊन भारतीय कायद्यांची अंमलबजावणी चालू आहे. दिवाणी व फौजदारी खटल्यांच्या बाबतींत न्याय आयुक्त हेच सर्वोच्च न्यायालय आहे. प्राचीन काळातील स्वायत्त ग्रामसंस्थांना (कोमुनदादी) पोर्तुगीज अंमलात कृषिसंस्थांचे स्वरूप आले होते. आता ग्रामपंचायतींची स्थापना झाली असून नंतर जिल्हा परिषद स्थापण्याचा शासनाचा विचार आहे. राज्यात एकूण १९० ग्रामपंचायती आहेत. दीव बेट व दमण या दूरच्या प्रदेशांखेरीज गोव्याचे तालुके पेडणे, बारदेश, साखळी, सत्तरी, तिसवाडी, फोंडे, सांगे, मुरगाव, सासष्टी, केंपें व काणकोण असे आहेत. भारताच्या लोकसभेत गोव्याचे दोन प्रतिनिधी निवडून जातात. या प्रदेशासाठी उच्च न्यायालय मुंबईचेच आहे.
गोखले, कमल
आर्थिक व सामाजिक स्थिती : गोव्यातील ३१·६७% लोक कामकरी असून त्यांपैकी २३·९७% शेतकरी व १५·०१% शेतमजूर आहेत. एकूण प्रादेशिक उत्पन्नाचा पंचमांश वाटा शेतीतून मिळतो. १९५५ सालची भारत सरकारची गोव्याशी व्यापारबंदी, पिकांवरील कीड, नारळी-सुपारी-फळबागांचे नुकसान, खनिज धातुकांची वाहतूक करणाऱ्या पडावांनी ताली फोडल्यामुळे सखल भागातील भातजमिनी बुडून झालेली ११,००० हे. दलदल, नाले व लहान नद्यांत गाळ साचून पेरजमिनींचे नुकसान, तळ्यांतल्या गाळामुळे झालेली पाणीटंचाई, आधीच कमी व नाजुक प्रकृतीच्या गुराढोरांची लष्करासाठी कत्तल, पूर्वीच्या सरकारी नियंत्रणामुळे मच्छीमारीतील घट, खाणींवर जास्त रोजगार मिळत असल्यामुळे शेतमजुरांचा तुटवडा, शेतकामे पडून राहणे, मालाला किंमती कमी अशा अनेकविध कारणांनी गोव्याच्या कृषिव्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे, पण आता परिस्थिती चांगली सुधारत आहे. गोव्याच्या ३,८१,००० हे. भौगोलिक क्षेत्रापैकी उपयोजन-भूमिक्षेत्र ३,७०,००० हे.; जंगलक्षेत्र १,०५,००० हे.; उजाड व निरुपयोगी क्षेत्र १६,००० हे.; बिगरशेती क्षेत्र २१,००० हे.; कायम गवती कुरणे १,००० हे.; संकीर्ण वृक्षपिके वगैरे १,००० हे.; पडीक क्षेत्र ९३,००० हे.; लागवडीखालील क्षेत्र १,३३,००० हे.; एकूण पिकांखालील क्षेत्र १,३९,००० हे.; दुबार किंवा जास्त पिकांखालचे व ओलीताखालील क्षेत्र ६,००० हे. आहे. पेरणीखाली जमीन १९७३ मध्ये गोवा १,२८,४२९ हे.; दमण ४,३५३ हे. व दीव ७९३ हे. इतकी होती. यांपैकी ६·४ % ओलीताखाली आहे. मार्च १९७२ पर्यंत ४०० हे. जमिनीस पाणी देणाऱ्या १२ लिफ्ट योजना झाल्या. २० तलावांनी ३२६ हे. जमीन भिजते. ३१ मार्च १९७३ अखेर २६६ पंप व नलिकाकूप यांस वीज मिळाली. गोव्यातील १३% जमिनीवर भातशेती होते. शिवाय डाळी, कडधान्ये, वरी व नाचणी, मका, शक्य तेथे भाज्या ही पिके; नारळ, सुपारी, काजू, आंबा, फणस, पपनस, अननस, पपई, केळी, बटाटा, शेंगदाणा, ऊस या मालांचे उत्पादन कमीअधिक प्रमाणात होते. गोव्याचे भातपीक १९७२-७३ मध्ये ५१,६०० हे. क्षेत्रात ७८,५८१ मे. टन आले; पण गरज त्यापेक्षा अधिक असल्यामुळे वायंगण किंवा रब्बी पिकांना तायचुंग जातीचे बियाणे वापरून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. १९७२-७३ मध्ये ६,३०० हे. क्षेत्रात ६,३०० टन रागी व एकूण ५७,९०० हे. क्षेत्रात ८२,३०० टन अन्नधान्य उत्पादन झाले. ८०० हे. क्षेत्रात ५०,००० टन ऊस होऊन ४,००० टन गूळ झाला. १९७१-७२ मध्ये १,४०० हे. क्षेत्रात १,५०० टन सुपारी झाली. काथ्या केंद्रे ६८५ असून त्याचे तंतू वेगळे करण्याची केंद्रे तीन आहेत. दमण भागात सु. २०० हे. वर भात व गहू आणि दीव बेटावर सु. ४०० हे. जमिनीवर बाजरी होते. गोव्याला नारळीच्या बागांत टापिओकाचे दुय्यम पीक काढण्याचे प्रयोग चालू आहेत. शासकीय कुक्कुटपालन केंद्रात १९७१-७२ मध्ये ७,१९,२०१ अंड्यांचे उत्पादन झाले व शासकीय दुग्धप्रकल्पातून १४,३७,५६३ लि. दूध; १९,०६२ किलो लोणी आणि ३,९३९ किलो तूप यांचे उत्पादन झाले. १९७१ मध्ये ४०,००० टन; १९७२ मध्ये ३०,००० टन व १९७३ मध्ये २३,११० टन मासे पकडण्यात आले. ६,२५० कोळी आहेत. १९६७-६८ मध्ये मासेमारीवर ३५·४३ कोटी रु. शासकीय खर्च आला. गोवा प्रदेशात पूर्वीपासून खेड्यांच्या सामायिक मालकीच्या लागवडीयोग्य जमिनींची कोम्यूनिदाद नावाची सहकारी पद्धत बिनशेतकरी भागधारक घुसल्यामुळे सदोष झाली असून तिची सुधारणा भूसुधार आयोगाच्या विचाराधीन आहे. गोव्याच्या ११ तालुक्यांत एकूण २२५ कोम्यूनिदाद आहेत.
उद्योगधंदे : एकूण उद्योगधंद्यांपैकी फक्त ६·५% कामकरी उद्योगधंद्यांत आहेत. मुख्यतः खाद्य पदार्थांवर प्रक्रिया; तांदूळ सडणे, तेलघाण्या, काजू सोलणे, काजू; मच्छी व फळे डबाबंद करणे, फोंडा येथील काड्याच्या पेट्यांचा कारखाना, डिचोलीचे काजूगरांचे कारखाने असे लहान प्रमाणातील धंदे आहेत. स्वस्त विजेचा तुटवडा, तंत्रज्ञांचा अभाव, मर्यादित बाजारपेठ, पारतंत्र्याच्या काळात दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी गोव्यात औद्योगिक विकास झाला नव्हता. काजू, मासळीखत, डबाबंद मासे व फळे यांची व पडावांनी मातीची भांडी, कौले, विटा, मेणबत्या अशा हलक्या मालाची अल्प प्रमाणात निर्यात होत असे. मुक्तीनंतरचे गोव्यातील औद्योगिक धोरण उत्तेजक आहे. ३१ मार्च १९७३ पर्यंत १,०४२ लघुउद्योगांची उद्योग खात्याकडे नोंद झाली असून ग्राहकोपयोगी वस्तू बनविण्यासाठी शासनाकडून व्यवस्थापकीय अनुदान, औद्योगिक सहकारी संस्थांना समान भाग-भांडवल, सोयीच्या अटीवर कर्ज इ. प्रलोभने देण्यात येत आहेत.
१९७३ मध्ये लघुउद्योगांत १२ डबाबंदीचे, १४३ दुरुस्ती कर्मशाळा, ९ काजूप्रक्रियेचे, ६० छापखाने, माती व चिनीमाती १७, रबर व रबरी वस्तू १८ असे कारखाने होते. त्यांना मडगाव येथे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, लघुउद्योग सेवा संस्था, महाराष्ट्र स्टेट फायनान्शिअल कार्पोरेशन, पणजी, मडगाव, दमण व गोवा-दमण-दीव औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून साहाय्य आणि मार्गदर्शन मिळते. १९७३ मध्ये लघुउद्योगधंद्यांत ९,३७० कामगार होते. १९६६ साली स्थापन झालेल्या औद्योगिक विकास महामंडळातर्फे कोरली येथे औद्योगिक वसाहतीत ३० छपऱ्या आणि मडगाव येथे जमिनीचे १५ गाळे विकसित करून देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावरील धंद्यांत पालेउसगाव येथे १९६७ मध्ये निघालेला लोखंडाच्या गोळ्या करण्याचा कारखाना, झाल्डे येथील कापड गिरणी (१९७१), आर्लेम येथे बीर (१९६७), चिखली येथे पीठगिरणी (१९६७), बिचोली येथे पोलादी पत्रे वगैरेंचा (१९६६), कुर्ती येथील पोटॅशियम परमँगनेटचा (१९६९), कोर्टालिम येथील असिटिलीन ऑक्सिजनचा (१९६६) आणि आसवन्या व ऊर्ध्वपातन भट्ट्या (१९७०), बेतोरा येथे परदेशी मद्यांचा (१९७०), जुने गोवे येथे इंडियन ह्यूम पाइपचा (१९७०), कोर्टालिमचा ‘सिबा’ औषधांचा, चौगुले यांचा बोटी बांधण्याचा व पडाव दुरुस्तीचा, सिरीगाव (१९६७), टायर दुरुस्तीचा (१९६९), मडगाव येथील पादत्राणांचा १९७१, १९७३ मधील जुवारी ॲग्रो केमिकल्सचा, हे कारखाने लक्षणीय आहेत. सर्व प्रकल्पांत मिळून ८७·५२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. १९७३ मध्ये ५,७३६ कामगार व त्यांच्या ४२ संघटना होत्या. खाणधंद्यांत लोहधातुक व मँगॅनीज या धातुकांच्या निर्यातीने परकीय चलन मिळविण्यास मदत होत आहे.
डिचोली, कुडणे, पाली, पैलीगाव, सिरीगाव केंद्रे मिळून ४२१ खाणींतून मँगॅनीज, फेरोमँगॅनीज आणि ३२६ खाणींतून लोहधातुक काढण्यात येते. गोव्याच्या लोहधातुकात ५५ ते ६५% पर्यंत लोहांश असतो. सांगे व केंपें तालुक्यांच्याही दक्षिणेस मँगॅनीज सापडले आहे. १९६७ मध्ये लोहासाठी ७८ व फेरोमँगॅनीजसाठी ११३ ठिकाणी पाहणी करण्यात आली. १९६९ मध्ये खनिज-उत्पादन ७६ लाख मे. टन लोहधातुक; १,४७,३५८ मे. टनांवर फेरोमँगॅनीज; २५,८०० टन बॉक्साइट व ५८,४६० मे. टन मँगॅनीज असे होते. १९७३ मधील एकूण खनिज उत्पादन ११,४९,८७,००० रुपयांचे होते आणि १९७२ मधील लोहधातुक उत्पादन १·१४ कोटी टन होते. १९७२-७३ मधील एकूण खनिज उत्पादन सु. १,०४,५६,५९८ टन होते व धातुकांच्या निर्यातीने सु. ७५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. गोव्यात विद्युत्शक्ती उत्पादनाची बरीच वाढ होणे आवश्यक आहे. सध्या गोव्यातील आठ आणि दमण व दीवमधील प्रत्येकी एक अशा डीझेलवर चालणाऱ्या वीजनिर्मिती केंद्रांकडून होणारा पुरवठा तुटपुंजा व महाग आहे. औद्योगिकीकरणासाठी स्वस्त विजेची गोव्यात निकडीची गरज आहे. १९६५-६६ मध्ये गोव्यास महाराष्ट्र व कर्नाटक यांच्याकडून व दीव-दमण यांना गुजरातकडून वीज मिळत असे. तेंव्हाच्या २·४ मे. वॉ. पासून १९७१-७२ मध्ये २०·२ मेवॉ.पर्यंत मागणी वाढली. विजेचा खप ५२ लक्ष किवॉ. ता. पासून ८ कोटी किवॉ.ता.पर्यंत वाढला आहे. चौथ्या योजनेत विजेसाठी ७·२ कोटी रु. मंजूर झाले. सर्व १३ छोटी शहरे व १५५ गावे वीजयुक्त आहेत. व्यापार मुख्यतः अन्न व पेये, ग्राहकोपयोगी पदार्थ, यंत्रसामग्री, कच्चा माल या वस्तूंची आयात आणि खनिजे, काजू, सुपारी, नारळ, मीठ, डबाबंद फळे व मासे या मालाची निर्यात या स्वरूपाचा आहे. पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या विकासावर भर देण्यात येत आहे.
दळणवळण : गोव्यातून देशावर म्हणजे पठारावर जाण्यास केळावडे, चौर्ले किंवा रामघाट, ठाणेघाट, बोर किंवा पोव्होरघाट, केळघाट, तिनईघाट, ब्रागांसघाट, दिघाघाट, कुंडलघाट आणि दोंकरपेघाट असे घाट आहेत. गोव्यात ३१ मार्च १९७० अखेर २,५३०·१५ किमी., दमणमध्ये ८०·६४ किमी. व दीवमध्ये २१·१८२ किमी. मोटाररस्ते होते. १९,४४० मोटारवाहने आणि ७८९ राज्यपरिवहन बसगाड्या होत्या. नद्यांच्या मुखातून ४ ते ८० किमी.पर्यंत वाहतूक होऊ शकते व एकूण अंतर्गत जलमार्ग २४६ किमी. आहेत. नद्यांवरील बंदराबंदरांपर्यंत नियमित फेरी वाहतूक चालू असते. अरुंदमापी लोहमार्ग ७९ किमी. असून त्याने मार्मागोवा बंदर दक्षिण रेल्वेला जोडले आहे. मुंबई-कन्याकुमारी पश्चिम राजमार्गातला गोव्यातला १४० किमी. भाग तयार होत आला आहे. आता या राजमार्गावर मांडवी नदीवरील नवीन पुलाने पणजी शहर उत्तरेच्या कोकण प्रदेशाशी वाहतुकीसाठी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे, हुबळी, बेळगाव इ. शहरांपासून पणजीला नियमित बसवाहतूक होते. अद्यापि इतर नद्यांवरील पुलांच्या अभावी उत्तर-दक्षिण वाहतुकीचा विकास व्हावा तसा होत नाही. शिवाय रस्तेदुरुस्ती एक येथे निकडीची समस्या आहे. किनाऱ्याला मार्मागोवा हे पहिल्या प्रतीचे सर्वकालीन बंदर असून इतर ७ दुय्यम बंदरे आहेत. दमण व दीव ही दोन्ही सामान्य बंदरे आहेत. मार्मागोवा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे सोयीस्कर बंदर असून येथे जपान, अमेरिका व यूरोप येथील सागरी नौका धक्क्यास लागतात. पणजी व मार्मागोवा येथून मुंबईस किनारी नौका वाहतूक चालते. दाभोळीच्या विमानतळामुळे मुंबईशी आकाशमार्गे संपर्क ठेवणे सोपे व लोकप्रिय झाले आहे. या प्रदेशात १९७२-७३ मध्ये १५२ डाकघरे, ५६ तारघरे, १७ दूरध्वनी केंद्रे, ५२ सार्वजनिक दूरध्वनी, तसेच ७ दैनिके, ७ साप्ताहिके व ८ इतर नियतकालिके आहेत.
लोक व समाजजीवन :१९७१ मध्ये गोवा, दमण, दीव यांमधील एकूण ८,५७,७७१ लोकसंख्येपैकी ५,५०,४९२ किंवा ६४·१८ % हिंदू; २,७२,५०९ किंवा ३१·७६ % ख्रिस्ती; ३२,२५० किंवा ३·७६% मुस्लिम; ८८५ शीख, ५५६ जैन, २६० बौद्ध व ८२९ इतर होते. १९६१ ते १९७१ च्या दशकात लोकसंख्येची वाढ ३६·८८% झाली.
लोकवस्तीची सरासरी घनता २२५ चौ.किमी. असून १,००० पुरुषांस स्त्रियांचे प्रमाण ९८९ आहे. ७३·५६% लोक नागरी असून १६,५१४ वर्गीकृत जमातीचे होते. मराठी, गुजराती व पोर्तुगीज या राज्यातील प्रमुख भाषा असून कोकणी ही प्रमुख बोली आहे. हिंदूंत स्मार्त व वैष्णव पंथीय आणि अप्रगत वर्गात अल्प प्रमाणात नाथपंथी वारकरी सांप्रदायिकही होते. पुढारलेल्या वर्गाच्या कुलदेवता मंगेश, शांतादुर्गा, नागेश, रामनाथ, महालक्ष्मी, म्हाळसा, सप्तकोटीश्वर आणि दामोदर यांच्यापैकी असून मागासवर्गाची पूजास्थाने दुर्गा ही ग्रामदेवता व स्थानिक भूमिदेवता आहेत. त्यांखेरीज रवळनाथ, भैरव, वेताळ अशी दैवतेही ठिकठिकाणी मान्य आहेत. पंढरीचा विठ्ठल गोव्यातदेखील फार पूर्वीपासून माहीत आहे. दत्तपूजा फार वर्षांपूर्वी सुरू झाली. ख्रिस्ती लोक रोमन कॅथलिक पंथाचे असून पोर्तुगीजांच्या कारकीर्दीत गोवा हे आशिया खंडातील त्या पंथाचे आद्यपीठ होते. कॅथलिकांची छाप त्यांनी बाटवलेल्या प्रजेखेरीज अनेक भव्य जुन्या वास्तूंच्या रूपाने शिल्लक आहे. सेंट फ्रांन्सिस झेव्हियरचे शव जतन करणारे बाँ जेझूस कॅथीड्रल, पत्रिआर्काल ही भव्य प्रार्थनामंदिरे, सान्त फ्रान्सिस ऑफ असिसीच्या मठाचे अवशेष, सान्त कैतानचे कॉन्व्हेंट अशा प्रकारची ती धार्मिक स्थाने आहेत. हिंदूंतील ब्राह्मण, दैवज्ञ, वैश्य, मराठा, क्षत्रिय, भंडारी, कुणबी, मराठा गायक, नाभिक आदिकरून जातिभेद आता भारतातील इतर राज्यांप्रमाणेच कमी तीव्र होत आहेत. ख्रिस्ती लोकांतही जो पोर्तुगीज धार्जिणेपणा व उच्चनीच भावना या वर्गात होती, ती कमी होणे अपरिहार्य आहे; तथापि आता गोव्यात धर्मापेक्षा कोकणी भाषा हा प्रादेशिक ऐक्याला एक धागा मिळाला आहे आणि रोमन लिपीत वा देवनागरीत कोकणी लिहिणारे-वाचणारे एका पृथगात्म संस्कृतीचा दावा करू लागले आहेत. १९७५ मध्ये साहित्य अकादमीने कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली आहे. गोव्यातील हिंदूंची घरे स्वच्छ, टुमदार व टापटिपीची असून ती बहुधा एकचौकी असतात. ख्रिस्ती लोकांची घरे दर्शनी रेखीव, भपकेदार व स्वच्छ असतात; पण बऱ्याच ठिकाणी मालक परप्रांती असल्याने त्यांच्या घरात ये-जा दिसून येत नाही. हिंदूंच्या खाद्यपदार्थांत डाळभात, भाजीपाला, ताजे व सुके मासे आणि नारळ असतात, तर ख्रिस्ती लोकांच्या अन्नात मांसाहारावर भर असतो. गोव्यातील ४२९ खेडी १० ते १५ वाड्यांतून पसरलेली असून ती एकमेकांपासून २ ते ३ किमी. अंतरावर असतात व कधी-कधी त्यांची वस्ती ५,००० पर्यंतही असते.
शिक्षण :१९७१ मध्ये गोव्यात साक्षरतेचे प्रमाण पुरुषांत ५४·४५%, स्त्रियांत ३४·४८% आणि एकूण ४४·५३% असे होते. कोकणी ही गोव्याची प्रादेशिक बोली भाषा, पण प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण माध्यम मात्र बहुसंख्य शाळांतून मराठी आहे. गुजराती भाषिक दमण व दीव भागांत आहेत. गोवामुक्तीनंतर प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असून आठवीपर्यंतचे निःशुल्क आहे. १९७२-७३ मध्ये १,०६९ प्राथमिक शाळांत १,१२,८३५ विद्यार्थी होते. ३६५ मिडलस्कूलमध्ये ४४,३९७ विद्यार्थी व २०३ माध्यमिक शाळांत ३२,६९८ विद्यार्थी होते. विश्वविद्यालयीन श्रेणीला सु. ६,५३० छात्रवर्ग होता. मानव्य, विज्ञान, व्यापार, वैद्यक, फार्मसी विद्याप्रशिक्षण, तंत्रशास्त्र इ. शाखांची एकूण दहा महाविद्यालये गोव्यात असून दमणला एक मानव्य व विज्ञान महाविद्यालय आणि एक विविधतंत्रशाळा आहे.
आरोग्य :१९७२-७३ मध्ये रुग्णालये आणि शुश्रूषागृहे खाजगी ३९ आणि शासकीय २६ होती. त्यांत अनुक्रमे ५८५ व २,०७६ खाटा होत्या. ६१९ डॉक्टर, ५५९ परिचारिका, ५५ वैद्य असून औषधांचा खर्च १९७१-७२ मध्ये १६,०९,३५२ रु. झाला. क्षयरोग रुग्णालये ३, आरोग्य केंद्रे २ व १५ प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रे होती.
गोवा प्रदेश कलांचे माहेरघर म्हणून भारतात विख्यात आहे. पाश्चात्त्य संगीत व चित्रकला गोव्याच्या ख्रिस्ती अभ्यासकांनी आत्मसात केल्या, तशाच हिंदुस्थानी संगीत व मराठी नाट्यकला गोमंतकीय हिंदू सांघिकांनी व हौशी नटांनी समृद्ध केल्या. काला, गवळणकाला व गोपाळकाला हे गोवा प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण गीत-वाद्य-नृत्यात्मक नाट्यप्रयोग अनुक्रमे रात्री, पहाटे व दुपारी करण्यात येतात आणि ते शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर आधारलेले असतात. जागर हे लोकनाट्य, घाला हा पौष महिन्यातील स्त्री-नृत्योत्सव आणि विविध उत्सवांतील पंचवाद्यप्रकार गोव्याच्या संगीताचे आणखी आविष्कार आहेत. चित्रकला व कलाकुसरीचे नक्षीकाम यांतही गोमंतकीय कारागिरांचे प्रावीण्य सर्वश्रुत आहे. शिसवी मूर्ती व सागवानी फर्निचर बनविण्याचे गोव्यातील विशेषज्ञांचे कसब, डिचोलीचे कुंभारकाम इ. हस्तकला गोमंतकाशी संपर्क असलेल्या मुंबईकरांना परिचित आहेत. क्रिडाक्षेत्रात पाश्चात्त्यांच्या हॉकी व फुटबॉलसारख्या मैदानी व मुष्टियुद्धासारख्या मर्दानी खेळांत गोव्याच्या ख्रिस्ती युवकांनी मुंबईत व भारतातही आपले कौशल्य दाखविले आहे.
प्रेक्षणीय स्थळे : सह्याद्री व अरबी समुद्र यांच्या दरम्यान वसलेला गोवा प्रदेश तांबडी माती, हिरवी वनश्री, अनेक जलप्रवाह व त्यांतून होणारी वाहतूक, नयनमनोहर धबधबे, सुंदर पुळणी, टुमदार गावे व घरे यांमुळे प्रवाशांस आकर्षक वाटतो. तेथील आंबे, फणस, अननस, मासळी व खास गोमंतकीय चवीचे पदार्थ यांची चव त्यांच्या जिभेवर राहते. दूधसागर, हरवळे व पिर्ण येथील धबधबे; मंगेश, शांतादुर्गा, म्हाळसा, रामनाथ इ. हिंदू देवस्थाने; भव्य ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे; आग्वादचा किल्ला; मार्मागोवा बंदर (वास्को द गामा), म्हापसे, मडगाव, साखळी, डिचोली, सांगे, कोंडे इ. लहानमोठी गावे; नवीनच निघालेले मोठे कारखाने, अत्याधुनिक स्वरूपाची राजधानी पणजी ही प्रवाशांची आकर्षणे आहेत.
संदर्भ : 1. Esteves Sarto, Goa and Its Future, Bombay, 1966.
2. Moraes, G. M. The Kadamba Kula, Bombay, 1931.
3. Rao, R. P. Portuguese Rule in Goa, Bombay, 1963.
४. पिसुर्लेकर, पां. स. मराठे-पोर्तुगीज संबंध, पुणे, १९६७.
५. भोबे, गोपालकृष्ण, असा आहे माझा गोमंतक, मडगांव, १९६४.
६. सांवर्डेकर, बा. वा. गोमंतक परिचय, सांवर्डे-गोवा, १९३०.
ओक, शा. नि.
सेंट झेव्हिअर चर्च, जुने गोवे | शांतादुर्गा मंदिर, कवळे | मंगेशी मंदिर, प्रियोळ |
मांडवी नदीवरील पंडित जवाहरलाल नेहरू पूल | मार्मागोवा बंदर | पणजी : एक दृश्य |
मँगेनीज खाणीचे दृश्य. | गोव्यातील रापण : एक दृश्य | मांडवी नदीच्या मुखावरील आग्वाद किल्ला |