गौतम : गौतम हे एक कुलमान आहे. ऋग्वेदात गोतम व गौतम अशा दोन्ही कुलसंज्ञा म्हणून वा व्यक्तिवाचक संज्ञा म्हणून येतात. हे नाम एकवचनी किंवा बहुवचनीही वापरलेले दिसते. ऋग्वेदातील सूक्तद्रष्टा दीर्घतमस् हा ऋषीच पहिला गौतम होय, असे अनेक पुराणांतील दीर्घतमस्च्या कथेवरून सिद्ध होते. पुराणांत सप्तर्षींमध्येही गौतम या ऋषीची गणना केलेली आहे. श्रौतसूत्रांमधील गोत्रप्रवर-गणनेमध्ये अनेक गोत्रांचा समावेश करणारा एक एक गोत्रगण सांगितला आहे. त्यात मूळ पुरुष अंगिरस् हा सांगून त्याच्या वंशात गौतमाची गणना केली आहे. अंगिरस्चे तीन गण आहेत त्यांतील गौतमाचा गण हा एक असून या गणात अंगिरस्, दीर्घतमस्, अयास्य, उतथ्य, उशिज, कक्षीवत्, वामदेव, बृहदुक्थ, राहूगण, सोमराज, कारेणुपाल, उशनस्, शरद्वत्, कौमंड या चौदा व्यक्तिनामांचा समावेश असून त्यांतील कक्षीवत् सोडून बाकी गोत्रनामे आहेत.
गौतम हे गोत्र ब्राह्मण व क्षत्रिय या दोन्ही वर्णांतील कुळांमध्ये सापडते. भगवान बुद्ध हासुद्धा गौतम होता. दीर्घतमस्ला व त्याच्या कुळातील व्यक्तींना गोतम किंवा गौतम हे नाव पडले. याचे कारण ते लोक बलिष्ठ होते, अशाही एक उपपत्ती पुराणांत सांगण्यात येते. ‘गो’ हा शब्द स्त्रीलिंग व पुल्लिंग अशा दोन्ही लिंगांत संस्कृतमध्ये चालतो. बलिष्ठ माणसाला ‘ऋषम’ किंवा ‘वृषभ’ हे आदरार्थी विशेषण संस्कृतमध्ये प्राचीन काळी वापरलेले आढळते. वर उल्लेखिलेल्या गौतम गणातील दीर्घतमस्प्रमाणेच अंगिरस्, कक्षीवत्, राहूगण, वामदेव इ. ऋषी ऋग्वेदातील सूक्तद्रष्टे किंवा मंत्रद्रष्टे आहेत. कठोपनिषदात नचिकेतस् व त्याचा पिता वाजश्रवस यांचाही निर्देश गोतम व गौतम आसाही केलेला आहे.
अहल्यापती गौतम : शरद्वत् गौतमाला ब्रह्मदेवाने आपली सुंदर मुलगी अहल्या त्याचे जितेंद्रियत्व व तपःसिद्धी पाहून पत्नी म्हणून दिली. ती अत्यंत सुंदर असल्यामुळे देवांचेही मन तिच्यावर गेले होते. तिचा गौतमाशी विवाह झाल्यामुळे इतर देवांनी तिची अभिलाषा सोडून दिली परंतु इंद्राच्या मनातील आसक्ती तशीच राहिली. इंद्राने अहल्येला फसवून तिच्याशी संबंध केला. ही गोष्ट गौतमाच्या लक्षात आली. त्याने इंद्र व अहल्या या दोघांनाही शाप दिला. रामपादस्पर्शाने व गोदावरीच्या स्नानाने ती शापमुक्त झाली. वाल्मीकिरामायण, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, महाभारत, स्कंदपुराण, ब्रह्मपुराण, लिंगपुराण व गणेशपुराण यांच्यामध्ये ही कथा कमीजास्त निरनिराळ्या स्वरूपांत आलेली आहे.
गोदावरी नदीलाही ‘गौतमी’ असे दुसरे नाव आहे. ब्रह्मपुराणात हे गौतमीमाहात्म्य विस्ताराने आले आहे. गौतम हा सामवेदाच्या एका उपशाखेचा प्रवर्तक आहे. गौतम धर्मसूत्र नावाचा एक अत्यंत प्राचीन धर्मशास्त्रग्रंथ (इ.स.पु.सु. सहावे शतक) प्रसिद्ध आहे.
न्यायदर्शनकार गौतम : मेधातिथी गौतम आणि अक्षपाद गौतम असे न्यायशास्त्रकारांचे दोन प्रकारचे निर्देश आढळतात. येथे ‘न्यायशास्त्र’ शब्दाचा अर्थ प्रसिद्ध षड्दर्शनांतील एक दर्शन म्हणजे तर्कशास्त्र, हे होय. प्राचीन संस्कृत नाटककार भास याच्या प्रतिमा नाटकात (अंक पाचवा) मेधातिथीच्या न्यायशास्त्राचा मानवधर्मशास्त्रे, माहेश्वरयोगशास्त्र आणि बार्हस्पत्य अर्थशास्त्र यांच्याबरोबर निर्देश आला आहे. महाभारतातील शांतिपर्वात मेधातिथीला गौतम म्हटले आहे. मेधातिथी गौतम इतर ऋषींबरोबर लोकांना उपनिषदांतील तत्त्वज्ञान सांगतो, असे तेथे म्हटले आहे. वादशास्त्रज्ञ गौतमाचा अवेस्ता या पारश्यांच्या ग्रंथामध्ये निर्देश आढळतो. हल्ली उपलब्ध असलेली न्यायसूत्रे यांचा कर्ता अक्षपाद म्हणून, त्या सूत्रांवरील वात्स्यायनकृत न्यायसूत्रभाष्यात, या भाष्यावरील उद्योतकरकृत न्यायवर्तिकात आणि वाचस्पतिमिश्रकृत न्यायवार्तिकतात्पर्यटीकेत उल्लेख आला आहे. हा अक्षपादही गौतम होय, असे त्या सूत्रांवरील न्यायसूत्रवृत्तीत विश्वनाथ न्यायपंचाननाने म्हटले आहे. वैशेषिक दर्शनाचा कर्ता कणाद याच्यासह अक्षपादाचा उल्लेख वायुपुराण व ब्रह्मांडपुराण यांमध्ये आला आहे. हा अक्षपाद व कणाद सौराष्ट्रातील प्रभास तीर्थात राहाणाऱ्या सोमशर्म्याचे पुत्र होत, असे तेथे म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासंबंधी असलेली एका ‘माहात्म्या’त गोदावरीतीरी त्र्यंबकेश्वर येथे वास करणारा गौतम हा न्यायशास्त्रकर्ता होय, असे म्हटले आहे. भगीरथाने जशी गंगा नदी पृथ्वीवर शंकराच्या आराधनेने आणली, तशी या गौतमाने गोदावरी पृथ्वीवर आणली, असे म्हटले आहे. गौतमाचे न्यायदर्शन आणि कणादाचे वैशेषिक दर्शन हे पाशुपतधर्मसंप्रदायी आहे. असे रा. गो. भांडारकर यांनी म्हटले आहे.
अक्षपाद गौतमाचे न्यायदर्शन हे भारतीय तर्कविद्येचे, प्रमाणशास्त्राचे आणि एकंदर ज्ञानमीमांसेचे मुख्य उगमस्थान होय. सांख्य, वेदान्त, मीमांसा, जैन व बौद्ध दर्शने या सर्वांच्या ज्ञानमीमांसेचा प्रारंभ किंवा मूलस्रोत अक्षपाद गौतमाचे न्यायदर्शनच होय.
पहा : न्यायदर्शन.
संदर्भ : 1. Vidyabhusana, Satis Chandra, A History of Indian Logic, Calcutta, 1921.
२. चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, पुणे, १९६४.
३. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. धर्मकोश : संस्कारकांडम्, खंड ३ रा, भाग १, वाई, १९५९.
जोशी, लक्ष्मणशास्त्री