गोविंदफळ : (वागाटी लॅ. कॅपॅरिस झेलॅनिका  कुल-कॅपॅरिडेसी). भारतात कोकण, पश्चिम घाट, दख्खन इ. प्रदेशांत विशेषकरून आढळणारे हे अनेक शाखायुक्त ताठर झुडूप आहे. पाने साधी, चिवट, लांबट, चकचकीत असून उपपर्णी काटे सरळ व आखूड असतात. फूले पांढरी व पानांच्या बगलेत, एकटी किंवा एका दांड्यावर २-३, फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये येतात. वरच्या दोन पाकळ्यांवर तळाजवळ रंगीत ठिपका असतो. किंजधर लहान [ → फूल]. फळ लंबगोल, लहान लिंबाएवढे, गर्द शेंदरी व साधारण टोकदार असते. त्यातील पांढऱ्या मगजात (गरात) अनेक बिया बुडलेल्या असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कॅपॅरिडेसी  कुलात वर्णन केल्याप्रमाणे. याच्या फळांची भाजी आषाढ शुद्ध द्वादशीला खाणे हिंदू लोकांत पवित्र मानतात. मुळाची साल व पाने औषधी आहेत. साल कडू असून शामक, दीपक (भूक वाढविणारी) आणि पित्तशामक असते. पानांचे पोटीस गळवे, सूज, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी असते. 

घवघवे, ब. ग.