गोवर्धनगिरी : कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील एक टेकडी. शिमोगा जिल्हा व दक्षिण कानडा जिल्हा यांच्या सरहद्दीवर सु. ५२५ मी. उंचीची ही टेकडी असून सह्याद्रीतून पूर्वपश्चिम जाणाऱ्या शरावती नदीखोऱ्याच्या दक्षिणेस आहे. नदीखोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आठव्या शतकात जिनदत्तराय याने टेकडीवर एक मजबूत किल्ला बाधला. टेकडीवर जैनांचे मंदिर असून सोळाव्या शतकातील धातूचा स्तंभ आणि त्यावर लेख कोरलेला आढळतो. किल्ला आज मोडकळीस आला असला, तरी शरावतीवरील गिरसप्पाचा विहंगम देखावा येथून दिसतो.

शाह, र. रू.