गोरखपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्याचे आणि गोरखपूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,३०,९११ (१९७१). हे राप्ती नदीच्या डाव्या तीरावर, वाराणसीच्या उत्तरेस सु. १६० किमी. महामार्गाने सु. २०० किमी. वसलेले असून राप्ती व रोहिणी नद्या आणि रामगढ तलाव यांनी वेढलेले आहे. हे ईशान्य लोहमार्गावरील एक प्रमुख प्रस्थानक असून लखनौ–फैजपूरवरून येणारा महामार्ग येथून दक्षिणेकडे गाझीपूर–वाराणसीकडे जातो. रेल्वे, मोटारींप्रमाणेच येथे जलमार्गानेही वाहतूक होते. नगरावर हिंदू, मुस्लिम व इंग्रजी राजवटींची स्पष्ट छाप दिसून येते. ज्याच्यावरून गोरखपूर हे नाव पडले, ते गोरखनाथाचे भव्य देवालय अलाउद्दीनाने पाडून तेथे मशीद उभारली. अकबराच्या काळातही येथे मुस्लिम राजवटच होती. १६१० मध्ये राजपूत राजा वसंतसिंहाने ते घेतले. हिंदू राजवटीत मंदिर पुन्हा उभारले गेले. १६८० मध्ये औरंगजेबाने शहर घेतले, तेव्हा तेथे पुन्हा मशीद बांधली. नंतर शहराच्या पश्चिमेस हल्लीच्या जागी मंदिर उभारले गेले. इंग्रजी राजवटीत नगराचा पद्धतशीर विकास झाला. १८८५ मध्ये रेल्वे व त्यानिमित्त अनेक कार्यालये आली. शाळा, दवाखाना इ. सोयी झाल्या. १९४७ पासून मोटार वाहतुकीचे केंद्र म्हणून महत्त्व वाढले. येथे लोखंडी सामान, कागद, छपाई, खाद्यपदार्थ, पेये, तंबाखू इत्यादिकांचे कारखाने असून आसमंतातील शेती उत्पादनाचाही व्यापार चालतो. येथे दोन महाविद्यालये, बारा माध्यमिक शाळा व एक औद्योगिक शाळा असून एक विद्यापीठही निघाले आहे. चित्रपटगृहे वगैरे मनोरंजनाची साधने आहेत. योग्य स्वच्छतेअभावी येथे हिवतापाचा उपद्रव वारंवार होतो. 

कुमठेकर, ज. ब.