गोगोल, निकोलाय : (१ एप्रिल १८०९–४ मार्च १८५२). रशियन विनोदकार, कथा-कादंबरीकार आणि नाटककार, जन्म सरचीन्स्क ह्या युक्रेनमधील एका गावी झाला. शिक्षण पल्टाव्हा आणि न्येझिन येथे झाले (१८२१–२८). त्यानंतर १९३१ पर्यंत त्याने सेंट पीटर्झबर्ग येथे सरकारी खात्यात कारकुनाची नोकरी केली. १८३६ ते १८४१ हा काळ त्याने परदेशांत–विशेषतः इटलीत– घालवला. 

व्हिचिरा ना खूतरे ब्लिज दिकान्की (१८३१-३२, इं. शी. ईव्हनिंग्ज इन अ फार्म निअर दिकान्की) ह्या

निकोलाय गोगोल

त्याच्या कथासंग्रहाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. युक्रेनमधील लोकजीवन आणि परंपरा ह्यांवर आधारलेल्या हलक्याफुलक्या कथा त्यांत आहेत. वास्तववादी आणि स्वच्छंदतावादी अशा दोन्ही प्रवृत्तींचे प्रत्ययकारी मिश्रण त्यांत आढळते. मीरगरद (१८३५) ह्या त्याच्या दुसऱ्या कथासंग्रहातील कथा मात्र वास्तववादाला अधिक जवळच्या आहेत. पितरबुर्गस्कीये रास्‌स्काजी (१८४२, इं. शी. द पीटर्झबर्ग स्टोरीज) ह्या त्याच्या आणखी एका कथा संग्रहात ‘शिन्येल’ सारख्या (इं. शी. द ग्रेट कोट) गाजलेल्या कथा आहेत. ह्या सर्व कथांमधून गोगोलने दारिद्र्याचे, पददलितांचे तसेच जमीनदारांच्या आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या नैतिक अधोगतीचे चित्रण केलेले आहे. विनोदी वर्णनांतून कारुण्याचा प्रभावी प्रत्यय देण्याचे सामर्थ्य त्यांत आढळते. सखोल मानवतावाद आणि समाजवाद ह्या गोगोलने मानलेल्या मूल्यांची जाणीव ह्या कथांतून व्यक्त होते.

गोगोलने काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांपैकी रिविजोर (१८३५–प्रयोग १८३६, इं. भा. द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर, १९४७) ह्या विशेष उल्लेखनीय सुखात्मिकेत त्याने तत्कालीन रशियातील सामाजिक परिस्थितीचे औपरोधिक चित्रण केले आहे. गोगोलच्या ह्या नाटकाचे मराठी रूपांतर पु.ल. देशपांडे ह्यांनी अंमलदार  ह्या नावाने केलेले आहे. एक वास्तववादी उपरोधकार ही गोगोलची प्रतिमा ह्या नाटकाने प्रस्थापित केली. मोर्तव्हिये इशि (भाग १ — १८४२, इं. भा. द डेड सोल्स ) ही कादंबरी गोगोलची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती. ह्या कादंबरीत त्याने जमीनदार आणि गुलामांचे मालक ह्यांचे विस्तृत व औपरोधिक चित्र रेखाटले आहे. ह्या कादंबरीतील पुष्कळ व्यक्तिरेखांची नावे रशियात आता सामान्य नावांसारखी वापरली जातात. उदा., ख्लिस्ताकोव्ह, मानीलव्ह, चीचिकव्ह, सबाक्येविच इत्यादी. रशियन कादंबरीचा विकास आणि रशियन वास्तववाद ह्यांचे आकलन होण्याच्या दृष्टीने ह्या कादंबरीचे महत्त्व मोठे गणले जाते. ह्या कादंबरीचा दुसरा भाग गोगालने लिहिला परंतु तो त्याला स्वतःलाच आवडला नाही त्यामुळे त्याने त्याचे हस्तलिखित जाळून टाकले (१८५२).

ह्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर गोगोलच्या मनात एक मानसिक संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून त्याने व्हीब्रान्निये मिस्ता इज पिरिपीस्की स द्रुज्यामि (१८४७, इं. शी. सिलेक्टेड पीसेस फ्रॉम कॉरस्पाँडन्स विथ फ्रेंड्स) हे प्रतिगामी विचारांनी भरलेले पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाने गोगोलबाबत अनेकांचा अपेक्षाभंग केला. ब्यिल्यिन्‌स्कई ह्या प्रसिद्ध रशियन टीकाकाराने गोगोलला एक पत्र लिहून त्याचा तीव्र निषेध केला. 

टुर्ग्येन्येव्ह, टॉलस्टॉय, डॉस्ट्येव्हस्की इ. नंतरच्या रशियन लेखकांवर गोगोलचा मोठा प्रभाव जाणवतो. रशियन साहित्यविचारात ‘गोगोलवाद’ अशी एक प्रवृत्ती मानली गेली आहे. सामान्यतः दंभस्फोट करणारा वास्तववाद व उपरोधप्रचुर शैली ही ह्या प्रवृत्तीची वैशिष्ट्ये म्हणता येतील. 

आयुष्याच्या अखेरीअखेरीस गोगोलमध्ये मानसिक विकृती निर्माण झाली होती. त्याच अवस्थेत मॉस्कोमध्ये त्याचे निधन झाले. 

संदर्भ : 1. Garnett, Constance Trans. Works of Gogol, 6 Vols., 1922–28. 

    2. Lavrin, Janko, Nikolai Gogol : 1809–1852, New York, 1962. 

    3. Nabokov, Vladimir, Nikolai Gogol, Norfolk, (Conn.), 1944. 

   4. Setchkarev, V. Trans. Kramer, R. Gogol : His Life and Works, New York, 1965. 

पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)