गोगलगाय : मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघाच्या ⇨ गॅस्ट्रोपोडा वर्गातील प्रोझोब्रँकिएटा, ओपिस्थोब्रँकिएटा व पल्मोनेटा या गणांतील प्राण्यांना सामान्यतः गोगलगाई म्हणतात. त्यांचा प्रसार जगभर झालेला असून काही जमिनीवर, काही गोड्या पाण्यात तर बहुसंख्य समुद्रात राहतात. सागराच्या सु. ५,६०० मी, खोलीपासून ते जमिनीवरील ६,००० मी. उंचीपर्यंतच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत त्या आढळतात. जेथे गोगलगाई नाहीत अशी फारच थोडी क्षेत्रे पृथ्वीवर आहेत. समुद्रातील काही गोगलगाई खडकांवर, काही वाळू किंवा चिखलावर आणि काही सागरी वनस्पतींवर राहतात. सेरिथियम, परप्युरा, लिटोरिना यांच्यासारख्या काही थोड्या सागरी वंशांच्या गोगलगाई गोड्या पाण्यात आणि लिम्निया, प्लॅनॉबिस यांसारख्या काही गोड्या पाण्यातील वंशांच्या गोगलगाई समुद्रात विशेषतः बाल्टिक समुद्रासारख्या व सामान्य सागरी पाण्यापेक्षा कमी खारट पाणी असलेल्या समुद्रात राहू शकतात. नद्या व सरोवरातील अप्युलॅरिया सारख्या गोगलगाई जमिनीवर राहू शकतात.
गोगलगाईच्या विशिष्ट संरचना शीर्ष, पाद, प्रावार (शंखाच्या लगेच खाली असणारी त्वचेची बाहेरची मऊ घडी), आंतरांग पुंज आणि कवच (शंख) या होत. काही गटांमध्ये यांपैकी काही अवशेषी (लहान व ऱ्हास पावलेल्या) असतात अथवा मुळीच नसतात. बहुसंख्य गोगलगाईंना स्पष्ट शीर्ष असून त्यावर संस्पर्शक (स्पर्शज्ञानाकरिता असणारी लांबट सडपातळ व लवचिक इंद्रिये) व डोळे असतात. पाद एकच असून तो स्नायुमय व चपटा असतो त्याचा तळवा सपाट असतो. या पादाने गोगलगाई मंद गतीने सरपटतात. प्रावार पातळ असून त्याचे क्लोम (श्वसनांग) गुहेभोवती आवरण असते. त्याच्या स्रावापासून कवच तयार होते. प्रावाराचा श्वसनेंद्रिय म्हणूनही उपयोग होतो. गोगलगाईंच्या शरीरातील पचनमार्ग, गुदद्वार, हृदय, क्लोम (कल्ले), वृक्कक (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारे नळीसारखे इंद्रिय) व काही तंत्रिका (मज्जातंतू) यांचे १८० अंशांमधून व्यावर्तन (फिरणे) होते. यामुळे प्राण्याच्या डाव्या बाजूला असणारी इंद्रिये उजव्या बाजूला येतात, गुदद्वार पुढच्या बाजूला येते आणि तंत्रिका तंत्राला इंग्रजी 8 या आकड्यासारखा तिढा पडतो. प्रत्येक बाजूला एकेक याप्रमाणे जोडीने असणाऱ्या इंद्रियांपैकी एका बाजूची (मूळ उजव्या बाजूची) काही इंद्रिये नाहीशी होतात आणि मूळची द्विपार्श्व सममिती (एकाच प्रतलाने शरीराचे दोन सारखे भाग होण्याची स्थिती) अस्पष्ट होते.
बहुसंख्य गोगलगाईंचे कवच कुंडलित (मळसूत्राकार) असून त्याला मंडले (वलये) असतात. बहुतेक गोगलगाईंचे शंख दक्षिणावर्ती (उजवीकडे वळलेले) असतात, पण काहींचे वामावर्तीही (डावीकडे वळलेलेही) असतात. कधीकधी कवचाचा आकार पेल्यासारखा (पटेला), नलिकाकृती (सीकम) किंवा पट्टीसारखा (स्कूटम) असतो.
बऱ्याचशा सागरी गोगलगाई शाकाहारी असून शैवलांवर उपजीविका करतात. बक्सिनम, युरोसाल्पिंक्स इ. काही वंशांच्या गोगलगाई हिंस्त्र असून मुख्यतः इतर मृदुकाय व क्वचित एकायनोडर्म खाऊन राहतात. काही वंशांतील गोगलगाई मल किंवा शवभक्षकही असतात. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगाई शाकाहारी असतात व दमट अरण्यात त्या विपुल असतात. वृक्षांवर राहून त्यांच्या सालीवर व पानांवर वाढलेली दगडफुले खाऊन राहणाऱ्या कित्येक वंशांच्या गोगलगाईंच्या शरीरांचे रंग भडक असतात व अत्यंत सुंदर गोगलगाईंत त्यांची गणना होते.
गोगलगाईच्या मुखगुहेत एक किसणीसारखी संरचना असते तिला रेत्रिका म्हणतात. ही एक पातळ पट्टी असून तिच्यावर तीक्ष्ण कायटिनी दातांच्या अनेक आडव्या ओळी असतात. वनस्पतींचे देठ, पाने वगैरे भाग या किसणीने किसून त्या खातात. अन्नपुटाच्या (अन्न साठविण्याकरिता असलेल्या भागाच्या) भोवती लाला ग्रंथी असतात आणि त्यांचा श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) व एंझाइमांनी (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगांनी) युक्त असलेला स्राव मुखगुहेत येतो. पचन ग्रंथीपासून उत्पन्न होणारा एंझाइमयुक्त द्रव अन्नपुटात येतो. जठर पचन ग्रंथीने वेढलेले असून त्यात स्रावी, अभिशोषी व कॅल्शियमी कोशिका (पेशी) असतात. ऊर्जेच्या उत्पादनाकरिता गोगलगाई, विशेषतः हीलिक्ससारख्या प्रारूपिक (नमुनेदार) गोगलगाई सेल्युलोज, ⇨ कायटिन, स्टार्च अथवा ग्लायकोजेन यांचा उपयोग करतात.
कित्येक उभयलिंगी (नर आणि मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असलेल्या) गोगलगाईंत नेहमी परनिषेचनच (एका प्राण्याच्या अंड्यांचे त्याच जातीच्या दुसऱ्या प्राण्याच्या शुक्राणूंच्या योगाने होणारे निषेचनच म्हणजे फलनच) होते. या गोगलगाईंच्या शरीरात एक प्रासक-कोश (योनीत उघडणारी पिशवी) असून त्यात एक कॅल्शियमी प्रासक (बारीक अणकुचीदार भाल्यासारखा दंड) असतो. दोन गोगलगाई एकमेकींना चिकटल्यावर प्रत्येक आपला प्रासक अतिशय वेगाने सोडून दुसरीच्या अंगात घुसविते. यामुळे दोन्ही गोगलगाईंचे मैथुनाकरिता उद्दीपन होते. प्रत्येक गोगलगाय आपले शिश्न दुसरीच्या योनीत घालून तीत शुक्राणुधर (शुक्राणूंची जुडी असलेली डबी) सोडते. प्रासक पुन्हा तयार होतो. बहुसंख्य सागरी गोगलगाई पुष्कळ अंडी घालतात. अंड्याचा विकास होऊन पटिका डिंभावस्थेतून [→ डिंभ] गेल्यावर प्रौढ प्राणी तयार होतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगाई अंडी घालतात व अंड्यांपासून प्रौढ प्राणी सरळ तयार होतात.
भूचर गोगलगाई हिवाळ्यात अन्न खाणे बंद करून पालापाचोळ्याखाली जमिनीत लहान बिळे तयार करून त्यांत शिरतात व आपले सर्व शरीर कवचात ओढून घेऊन शीतनिष्क्रियतेत (अर्धवट अथवा पूर्ण गुंगीच्या स्थितीत) जातात. या स्थितीत त्या सहा महिनेही राहू शकतात [→ शीतनिष्क्रियता].
पुष्कळ देशांत सागरी गोगलगाईंच्या काही जातींचा व यूरोपात हीलिक्स पोमॅशिया या भूचर गोगलगाईचा मनुष्याच्या अन्नासाठी उपयोग केला जातो. कित्येक गोगलगाई अपायकारक असतात. मनुष्याला व पाळीव जनावरांना पर्णाभकृमींमुळे होणारे काही रोग आहेत. भूचर आणि गोड्या पाण्यातील गोगलगाईंच्या काही जाती या कृमींचे मध्यस्थ पोषक असतात व त्यांच्यामुळे या रोगांचा प्रसार होतो. सदरहू गोगलगाईंचा नाश करणे हाच त्या रोगांच्या नियंत्रणाचा व्यावहारिक उपाय होय. समुद्रातल्या कोनिडी कुलातील गोगलगाईंना एक विषारी उपकरण असते. त्यांना निष्काळजीपणाने हाताळताना त्यांच्या दंशामुळे माणसे मेल्याची उदाहरणे आहेत.
जमदाडे, ज. वि.
“