गेओर्ग, श्टेफान : (१२ जुलै १८६८— ४ डिसेंबर १९३३). जर्मन भावकवी. जन्म बिंगनजवळील ब्यूडेशाइम येथे. पॅरिस, म्यूनिक आणि बर्लिन विद्यापीठांतून तत्त्वज्ञान आणि कलेतिहास ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. त्याने अनेक यूरोपीय देशांचा प्रवास केला होता. फ्रेंच प्रतीकवाद्यांचा, तसेच प्री-रॅफेएलाइट कवींचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. जर्मनीस परतल्यानंतर त्याने George-Kreis (गेओर्ग सर्कल) हा आपला स्वतंत्र सौंदर्यवादी काव्यसंप्रदाय स्थापन केला.

कवी म्हणजे प्रेषित व काव्यनिर्मिती हाच धर्म होय, ह्या विचाराने गेओर्ग भारलेला होता. सौंदर्यान्वेषी वृत्तीने त्याने कवितेच्या रूपाचा विचार केला. कवितेचा घाट घोटीव, कातीव असला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. ऐतिहासिक व्यक्तींच्या प्रतीकांतून त्याने आपल्या निखळ सौंदर्यवादी दृष्टिकोणाचा आविष्कार केला. गेओर्गचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्याने मास्किमिन नावाच्या एका तरुणाच्या सौंदर्यातून स्फूर्तीचा शोध घेतला. बीआट्रिसबद्दल दान्तेच्या भावना जेवढ्या उत्कट होत्या, तेवढ्याच गेओर्गच्या माक्सिमिनबद्दल होत्या. मास्किमिन हा त्याला साक्षात ईश्वरावतार वाटत होता. Der Siebe-nte Ring (१९०८, इं. शी. सेव्हन्थ रिंग) ह्या काव्यसंग्रहातील कवितांत त्याची ही भावना ठळकपणे व्यक्त झाली आहे. त्याच्या अनेक कवितांतून त्याच्या विविध भाववृत्तींचे विशुद्ध दर्शन घडते. त्याच्या उत्कट, नादमधुर कवितेने जर्मन काव्य संपन्न केले. 

‘गेओर्ग सर्कल’ मधील सर्व कवींवर गेओर्गची सक्त हुकमत होती व कडव्या अनुयायांचा हा संप्रदाय सदैव बंदिस्तच राहिला. गेओर्गच्या कविता अत्यंत खाजगीपणे प्रकाशित होत व त्याच्या प्रभावळीपुरतेच त्या कवितांचे वाचन मर्यादित असे. १८९९ मध्ये त्याच्या कविता त्याच्या मंडळाबाहेरील वाचकांस प्रथम खुल्या झाल्या. गेओर्गच्या कवितांतील शब्दांचा वर्णक्रम आणि विरामचिन्हे त्याने आपल्या इच्छेनुसार योजिलेली असत. Die Blaetter fuer die Kunst (इं. शी. पिरिऑडिकल फॉर आर्ट) हे ह्या मंडळाचे मुखपत्र होते. 

Die Hymnen (१८९०, इं. शी. हिम्स), Pilgerfahrten (१८९१, इं. शी. पिल्‌ग्रिमेज), Algabal (१८९२), Die Buecher der Hirten und Preisgedichte… (१८९५, इं.शी. बुक्स ऑफ द शेफर्ड्‌स अँड ऑफ द यूलॉजीज…), Das Jahr der Seele (१८९७, इं. शी. द यिअर ऑफ द सोल) आणि Der Teppisch des Lebens… (१८९९, इं. शी. द कार्पेट ऑफ लाइफ…) हे त्याचे प्रमुख काव्यग्रंथ होत. 

ह्यांखेरीज दान्ते, दान्नून्त्स्यो, व्हेर्लेअन, शेक्सपिअर, स्विन्‌बर्न ह्यांच्या कवितांची उत्कृष्ट भाषांतरे त्याने केली. 

हल्डरलीनप्रमाणेच जर्मनीच्या पुनरुत्थानाचा गेओर्गने ध्यास घेतला होता. त्यासाठीच त्याने नेतृत्वाच्या तत्त्वावर आणि नेत्यांची आज्ञा पाळण्यावर खास भर दिला. त्यामुळे गेओर्गचा आपल्याला पाठिंबा आहे, असा नाझींचा समज झाला होतो पण गेओर्गने त्यांना जवळ केले नाही. मीनूझ्यॉ (स्वित्झर्लंड) येथे तो निधन पावला. 

संदर्भ : Bennett, E. K. Stefan George, Cambridge, 1954. 

घारपुरे, न. का.