गोंगोरा इ आरगोते, लूइस दे : (११ जुलै १५६१—२३ मे १६२७). स्पॅनिश कवी. जन्म कॉर्दोव्हा येथे. शिक्षण सालामांका विद्यापीठात. प्रथम कॉर्दोव्हा येथे धर्मगुरू होता. १६१२ मध्ये तो माद्रिदला आला. १६१७ मध्ये राजाचा चॅप्लिन (एक धर्मपद) म्हणून त्याची नियुक्ती झाली. पुढे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे तो कॉर्दोव्हा येथे परतला (१६२६) आणि तेथेच निधन पावला.
आरंभी सुनीते, रोमान्स, उपरोधिका अशी काही रचना त्याने केली. तथापि त्याने आपल्या उत्तरायुष्यात
लिहिलेल्या Fa’bula de Polifemo Y Galatea ( १६१२) आणि Soledades (१६१३—१७) ह्या त्याच्या दीर्घकविता अत्यंत वादग्रस्त ठरल्या. अभिजात लॅटिन शब्दकळा आणि वाक्यरचना ह्यांचा स्पॅनिश भाषेशी मेळ घालण्याचा प्रयोग ह्या कवितांत त्याने केला होता तसेच अनेक पौराणिक संदर्भ आणि विस्तृत व मार्मिक रूपके वापरली होती. ही काव्यशैली ‘गोंगोरीझम’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. गोंगोराला त्याच्या हयातीत टीकेला तोंड द्यावे लागलेच परंतु तो निवर्तल्यानंतरही दीर्घकाळपर्यंत गोंगोरीझम ही साहित्यसमीक्षेतील एक निंदाव्यंजक संज्ञा होऊन बसली. विसाव्या शतकात गोंगोराच्या साहित्यकृतींचे पुनर्मूल्यांकन होऊन श्रेष्ठ स्पॅनिश कवींमध्ये त्याची गणना होऊ लागली.
मेहता, कुमुद
“