गोंगाट : नको असलेला कोणताही आवाज म्हणजे गोंगाट अशी या राशीची व्याख्या करता येईल. तथापि सामान्यपणे जे आवाज अप्रिय वाटतात किंवा ज्यांनी कटकट होते अथवा हवा असलेला आवाज ऐकण्यामध्ये अडथळा आणतात त्यांनाच गोंगाट म्हणतात. गोंगाटातील ध्वनीचे स्वरपद (स्वराची उच्चनीचता ही कंपनसंख्येच्या समप्रमाणात असते), तीव्रता आणि आवाजाचे सातत्य या गोष्टी कमीअधिक प्रमाणात असतील त्याप्रमाणे गोंगाट निव्वळ कटकट होण्यापासून तो अपाय करण्यापर्यंतची पायरी गाठतो. वाढत्या यांत्रिकीकरणाबरोबर गोंगाट हा अनेक दृष्टींनी एक कटकटीचा प्रश्न बनला आहे. मोटारगाड्यांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणारे आवाज, कारखान्यांतील विविध यंत्रांचे आवाज, जेट विमानांच्या उड्डाणाच्या व उतरण्याच्या वेळी निर्माण होणार प्रचंड आवाज इ. अनेक प्रकारच्या उद्‌गमांपासून अतिशय त्रासदायक आवाज निर्माण होतात व त्यांचे नियंत्रण करणे ही आधुनिक काळातील एक महत्त्वाची समस्या झालेली आहे. बौद्धिक व कुशल कामात व्यत्यय, झोपमोड, भावनिक क्षोभ आणि प्रकृतीत सर्वसाधारण बिघाड हे गोंगाटाचे काही अपायकारक परिणाम आहेत. ८५—९० डेसिबेल (dB, डेसिबेल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे) पेक्षा जास्त तीव्रतेच्या गोंगाटामुळे श्रवणशक्ती कमी होते. काही वेळा कायमचे बहिरेपणही येते. गोंगाटाची तीव्रता ९० डेसिबेल आणि त्याहून जास्त असल्यास कामगारांची कार्यक्षमता निश्र्चितपणे कमी होते व कामात चुका होण्याची शक्यता वाढते.

गोंगाटाचे नियमन करण्यासाठी व तो कमी करण्यासाठी योग्य अशी मापनाची साधने उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. तरीसुद्धा मनुष्याची गोंगाटाच्या बाबतीतील प्रतिक्रिया फार जटिल असल्यामुळे गोंगाटाच्या व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ मापनांतील यथायोग्य संबंध प्रस्थापित करणे अवघड आहे. आवाजाची तीव्रता डेसिबेलमध्ये मोजतात, परंतु ‘ सममूल्य तीव्रतेचे’ फोन (P) हे त्याचे एकक आता मान्यता पावलेले आहे. व्यक्तिनिष्ठ मापनासाठी सोन (S) हे एकक वापरतात. हे एकक सर्वसामान्य मनुष्याच्या आवाजाच्या अंदाजाच्या प्रमाणात असते. सोन व फोन यांमधील संबंध पुढील सूत्राने दाखविला जातो : S = 2(P-40) / 10 या सूत्रान्वये ४० फोन तीव्रता पातळीची गरिमा (आवाजाची तीव्रता) १ सोन येते व तीव्रता पातळी ८० फोन असल्यास गरिमा १६ सोन असते.

ध्वनिपातळीमापक हे गोंगाट मोजण्याचे सर्वांत साधे उपकरण आहे. या उपकरणात ध्वनिग्राहक (मायक्रोफोन), विवर्धक (विद्युत् प्रवाहाची शक्ती वाढविणारे साधन), विशिष्ट प्रकारची मंडले व प्रदान (बाहेर पडणारे फल) मोजणारा मापक अशी साधने असतात. दुसऱ्या उपकरणाला सप्तक पट्ट किंवा तृतियांश-सप्तक पट्ट विश्लेषक (पृथःकरण करणारा) म्हणतात. याच्या साहाय्याने निरनिराळ्या कंप्रता (दर सेकंदास होणारी कंपन संख्या) पट्‌ट्यातील ध्वनिपातळी मोजता येते. यंत्रामधील आवाज कमी करण्यासंबंधीच्या संशोधनात, ध्वनिप्रेषणात व ज्या ठिकाणी विशिष्ट कंप्रता पट्ट्यातील ध्वनिपातळीची माहिती हवी असते अशा ठिकाणी या विश्लेषकांचा उपयोग करतात.

मोटारगाडीमधील आवाज कमी करण्यासंबंधी जवळजवळ तीन तपे संशोधन होऊन त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. रस्त्यावरील वाहतुकीमुळे व वाऱ्यामुळे निर्माण होणारा गोंगाट कमी करण्याबाबत संशोधन चालू आहे. विद्युत्‌ चलित्रे (मोटरी), पंखे, संपीडन (दाब प्रेरणा निर्माण करणारा) पंप, दंतचक्रे (गिअर) व अन्य फिरते भाग वापरून बनविलेल्या असंख्य साधनांतील आवाजही संशोधनाने बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ध्वनिकीय अभियंता इमारतीमध्ये ध्वनिशोषक पदार्थांचे तक्ते वापरून किंवा अन्य साहित्याचा यथायोग्य उपयोग करून इमारतीच्या भिंती, छते, जमिनी व विभाजक (पार्टिशन) यांमधून पार जाणाऱ्या आवाजाचे प्रमाण कमी करतो. काही देशांत गोंगाटाच्या मर्यादेवर नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने कायदे करण्यात आलेले आहेत व काही परिस्थितींत गोंगाटामुळे होणाऱ्या अपायाची नुकसान भरपाई करण्यासंबंधीही नियम करण्यात आले आहेत.

मनुष्याच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद जटिल असल्यामुळे गोंगाट कितपत तीव्र आहे यासंबंधी व्यक्तिनिष्ठ माप देणे अवघड आहे. तथापि यदृच्छया होणाऱ्या गोंगाटाच्या बाबतीतली तीव्रतेची मापे व गोंगाटाचे सर्वसाधारण स्वरूप वरील कोष्टकात दिली आहेत.

सर्वसाधारण आवाजांची अंदाजी तीव्रता पातळी (फोनमध्ये). 

मोठे विमान (उड्डाणासमयी)

१२० 

कापड विणकाम विभाग 

१००

वायवीय छिद्रक यंत्र (३ मी. अंतरावर)

१००

भुयारी रेल्वे 

९०

गजबजलेले टंकलेखन कार्यालय  

८०

गजबजलेला रस्ता 

७०

सर्वसाधारण संभाषण 

५०—६०

सर्वसाधारण उपनगरातील खोली 

४०

संथ संभाषण 

३०

कुजबूज 

२०

खेड्यातील शांत रात्र 

१०

ध्वनिग्रहणाची किमान मर्यादा 

विद्युत् प्रयुक्तींमध्ये वा प्रणालींमध्ये व्यत्यय आणणाऱ्या व अनावश्यक असलेल्या विद्युत् प्रवाहांना किंवा विद्युत् दाबांना ⇨ विद्युत् गोंगाट  म्हणतात. दूरध्वनी, दूरचित्रवाणी, रडार, रेडिओ इ. संदेशवाहक प्रणालींमध्ये अशा विद्युत् गोंगाटामुळे संकेतांच्या प्रेषणात वा ग्रहणात व्यत्यय निर्माण होतो.

पहा : कान (बहिरेपण) ध्वनि ध्वनिकी. 

संदर्भ : Suri, R. L. Acoustics, Bombay, 1966. 

शिरोडकर, सु. स.