गेडिस, पॅट्रिक : (२ ऑक्टोबर १८५४—१७ एप्रिल १९३२). आधुनिक स्कॉटिश जीववैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ व नगररचनाकार. जन्म बॅलटर (स्कॉटलंड) येथे. वयाच्या सोळाव्या वर्षी पर्थ अकादमीतून पदवी घेतली. त्यांनी लंडन येथे टी.एच्.हक्सली यांच्या हाताखाली जीवविज्ञानाचे शिक्षण घेतले. युनिव्हर्सिटी कॉलेज, डंडी (स्कॉटलंड) येथे १८८९ ते १९१४ या काळात ते वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९१९ साली त्यांनी मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभागाची स्थापना केली व विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९१९—२४). १९३१ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. माँट पील्यर, फ्रान्स येथे त्यांचे निधन झाले.
हक्सली व हेकेल यांच्या प्रभावामुळे गेडिस परिस्थितीविज्ञानाकडे वळले. जीवविज्ञानातील पर्यावरणाच्या सिद्धांतास अनुसरून त्यांनी पुढील विचार मांडले : ‘मानवी समाज व त्याचे पर्यावरण यांचा एकमेकांवर परिणाम होतो. नव्या साधनतंत्रांच्या शोधामुळे मानवाच्या कार्यशक्तीत भर पडते. या अतिरिक्त शक्तीचा उपयोग धर्म, तत्त्वज्ञान, कला, रंजन इ. क्षेत्रांमध्ये करून तो आपला सामाजिक वारसा समृद्ध करतो. पर्यावरण व मानवाची सर्जनशीलता यांच्या परस्परपरिणामापासूनच जीवनाची निर्मिती होते’. या विचारांच्या आधारे त्यांनी १८८२ साली आपली कार्यशक्तिविज्ञानाची (एनर्जेटिक्स) कल्पना पुढे मांडली.
गेडिस १८७९ साली मेक्सिकोला गेले असता, तेथे काही आजारामुळे त्यांना तात्पुरते अंधत्व आले. या आपत्तीमुळेच त्यांनी आरेख्यक संकेताचे अभिनव तंत्र शोधून काढले. कागदाला घड्या पाडून बनविलेल्या चौकोनांच्या व आरेखांच्या आधारे निरनिराळ्या घटकांमधील आंतरक्रियांचे व परस्परसंबंधाचे स्वरूप व्यक्त करता येते, हे त्यांनी सप्रमाण दाखविले. अशाच एका आकृतीच्या द्वारे कल्पना (आयडिया), कार्य (फंक्शन) व समूह (ग्रुप) यांमधील आंतरक्रियांचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले. या आलेख-आकृत्यांना ते ‘विचार करणारी यंत्रे’ (थिंकिंग मशीन्स) असे संबोधीत असत.
गेडिस यांच्या समाजशास्त्रीय विचारसरणीत काँत व ल प्ले यांचा आधार होता. समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र असल्याने, समाजाच्या लोक (फोक), कार्य (वर्क) व स्थान (प्लेस) या घटकांचा अभ्यास करणारी अनुक्रमे मानवशास्त्र, अर्थशास्त्र व भूगोल ही शास्त्रे व्यापक अर्थाने समाजशास्त्राची आधारभूत शास्त्रे आहेत व समाजशास्त्र हे सर्वस्पर्शी असे शास्त्र आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. ज्ञानक्षेत्रातील अतिरिक्त विशेषीकरणाला त्यांचा विरोध होता.
त्यांनी एडिंबरो येथे ‘आउटलूक टॉवर’ या आपल्या निवासस्थानी समाजशास्त्रीय संशोधनाचे व विचारमंथनाचे केंद्र स्थापन केले. ह्या केंद्राचे वर्णन चार्ल्स झूब्लिन यांनी ‘जगातील पहिली समाजशास्त्रीय प्रयोगशाळा’ असे केले आहे. तेथून केलेल्या अवलोकनांतून त्यांच्या नगररचनेसंबंधीच्या विचारांना चालना मिळाली. सिटी डेव्हलपमेंट (१९०४) हा त्यांचा प्रस्तुत विषयावरील प्रमाणभूत ग्रंथ होय. शहराच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांना बाध न आणता त्याची पुनर्रचना कशी करता येईल, ह्याची चर्चा त्यात आहे. प्रादेशिक सर्वेक्षणपद्धतीचा पायाच त्यांनी घातला. तसेच शहरी, ग्रामीण व औद्योगिक विभागांच्या एकात्म किंवा सेंद्रिय संबंधांच्या समग्र अभ्यासावर त्यांनी भर दिला. इंग्लंडमधील १९०९ च्या गृहनिवसन व नगररचना यांसंबंधीच्या कायद्यावर गेडिस ह्यांच्या प्रस्तुत विचारांचाच प्रभाव होता.
गेडिस यांच्या ह्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना भारतामध्ये निमंत्रित करण्यात आले व १९१४ ते २४ ह्या काळात त्यांनी भारतातील पन्नास शहरांची तसेच उद्यानांची पाहणी व आखणी केली. इंदूर संस्थानाधिपतींच्या सूचनेवरून त्यांनी इंदूर विद्यापीठाच्या संकल्पित रचनेसंबंधीचा अहवाल दोन खंडात तयार केला (१९१८).
त्यांनी विविध विषयांवर मौलिक ग्रंथनिर्मिती केली आहे. ॲन अनॅलिसिस ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१८८४), द मास्क ऑफ एन्शंट लर्निंग अँड इट्स मेनी मीनिंग्ज (१९१२), सिटीज इन इव्होल्यूशन (१९१५), द इव्होल्यूशन ऑफ सेक्स (जे. ए. टॉमसन यांच्या समवेत, १८८९), बायॉलॉजी (जे. ए. टॉमसन यांच्या समवेत, १९२५), अवर सोशल इन्हेरिटन्स (व्हिक्टर ब्रॅन्फर्ड यांच्यासह, १९१८) हे त्यांपैकी काही ग्रंथ होत.
संदर्भ : 1. Boardman, Philip, Patrick Geddes : Maker of the Future, Chapel Hill, 1944.
2. Mairet, Philippe, Pioneer of Sociology : The Life and Letters of Patrick Geddes, London, 1957.
भोईटे, उत्तम
“