गूटेनबेर्क, योहान : (१३९८?–३ फेब्रुवारी १४६८). यूरोपातील मुद्रणकलेचे आद्य प्रणेते. त्यांचा जन्म जर्मनीतील मेंझ येथे झाला. त्यांनी प्रथम सोनाराचा धंदा केला. धातुखोदकामात त्यांनी प्राविण्य मिळविले व त्यामुळेच त्यांचे लक्ष मुद्रणाकडे वळले. सप्टेंबर १४२८ मध्ये त्यांना मेंझमधून राजकीय कारणास्तव हद्दपार करण्यात आले. १४३०–४४ मध्ये ते स्ट्रासबर्ग येथे होते. १४५० मध्ये त्यांनी योहान फूस्ट यांच्या भागीदारीत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. १४५५ मध्ये त्या दोघांत भांडण होऊन छापखान्याची मालकी फूस्ट यांच्याकडे गेली. याआधी त्यांनी १,२८२ पृष्ठांचे ‘माझारिन बायबल’ छापण्यास सुरुवात केली होती. ते ‘४२ ओळींचे बायबल’ या नावानेही ओळखले जाते. ते लॅटिन भाषेत छापले होते. हे बायबल १४५७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. तथापि मुद्रक म्हणून गूटेनबेर्क यांचे नाव त्यावर नव्हते. इतर अनेक पुस्तकांवर त्यांचे मुद्रक म्हणून नाव दिलेले आढळत नाही, तथापि त्या काळात ते मुद्रणाचा व्यवसाय करीत होते असे निश्चित पुरावे आढळतात. १४६५ मध्ये ते मेंझचे आर्चबिशप आडोल्फ यांच्याकडे नोकरीस राहिले.
प्रत्येक अक्षराची मातृका तयार करून, तिच्यापासून सुटे खिळे तयार करून आणि ते ओळींमध्ये जुळवून शब्द व ओळी तयार करणे ही कल्पना प्रथमच गूटेनबेर्क यांनी अमलात आणली.
ते मेंझ येथेच मृत्यु पावले.
जोग, अ. रा.