गुरु -२ : आदरणीय वा पूजनीय व्यक्ती, असा या शब्दाचा अर्थ आहे. आईबाप, थोरला भाऊ, वयाने व मानाने थोरले नातेवाईक उदा., मातापितरांचे आईबाप, चुलता, मामा, राजा, उच्चवर्णीय व्यक्ती इत्यादिकांना संस्कृत भाषेत सामान्यतः ‘गुरु’ शब्द लागतो परंतु विशेषार्थाने आचार्य, ज्ञानदाता, शिक्षक, उपदेशक, मंत्र देणारा, पुरोहित, धर्मोपदेशक यांचा वाचक गुरू हा शब्द आहे. धार्मिक कर्मकांड किंवा पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तीलाही गुरू हा शब्द लागतो. गुरुपदवी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही प्राप्त होऊ शकते.
आश्रमव्यवस्थेप्रमाणे पहिल्या आश्रमास ब्रह्मचर्य म्हणतात. नित्य जपण्याचा गायत्री मंत्र सांगून ह्या आश्रमाची जो दीक्षा देतो आणि वेद इ. शिकवितो, तो गुरू किंवा आचार्य होय आणि ब्रह्मचर्यव्रत स्वीकारून गुरूपाशी अध्ययन करणारा शिष्य होय. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिघांना उपनयनपूर्वक वेदाध्ययनाचा अधिकार आहे. शूद्राला वेदाध्ययनाचा अधिकार नाही परंतु त्याला वेदांशिवाय इतर विद्यांचा व कलांचाही उपनयनपूर्वक अधिकार आहे. हे उपनयन आगमोक्त पद्धतीने होते. शिक्षणयोग्य वयात व्यक्ती आली, की ब्रह्मचर्यव्रत स्वीकारून तिला अध्ययनार्थ गुरुकुलात राहणे प्राचीन काली आवश्यक मानले जात होते. मनुस्मृतीप्रमाणे (२·१४२) गुरूने आपल्याजवळ राहिलेल्या शिष्याचे पालनपोषण करून शिक्षण देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. शिष्याने गुरुगृही राहून गुरूची शुश्रूषा करावयाची असे. म्हणजे गुरूच्या घरी गुरू व गुरुपत्नीस आवश्यक असलेली सर्व प्रकारची कामे निरलसपणे करणे, हे त्याचे कर्तव्य असे. गुरुसेवेतून उरलेल्या वेळी गुरूस अभिवादन करून गुरूपासून विद्येचे ग्रहण करावयाचे. गुरूची आज्ञा निरपवादपणे पाळावयाची, हा ब्रह्मचर्यव्रताचाच भाग मानला जात होता. गुरू व गुरुपत्नी यांना प्रतिदिनी अभिवादन म्हणजे प्रणाम करावयाचा नियम शिष्याने निक्षून पाळावयाचा असे. गुरुगृही सर्व प्रकारचे कष्ट सहन करण्याची शिष्याची तयारी असावी लागे. गुरुगृह म्हणजेच गुरुकुल होय. गुरुकुल ही शिक्षणसंस्था प्राचीन वैदिक काळापासून तो आज विसाव्या शतकापर्यंत भारतात अस्तित्वात आहे. कृष्ण, बलराम, उत्तंक इत्यादिकांनी गुरुगृहात राहून विद्या संपादन केली, याचे दाखले पुराणांत मिळतात. अध्ययनसमाप्तीनंतर शिष्याने स्वगृही परतण्याचा संस्कार होत असे. यास ‘समावर्तन’ किंवा ‘स्नान’ असे म्हणतात आणि समावर्तन झालेल्या विद्यार्थ्यास ‘स्नातक’ असे म्हणतात. समावर्तनाच्या वेळी मुख्यतः गुरूस दक्षिणा अर्पण करावयाची प्रथा होती. पूर्ण शिकविल्याशिवाय गुरुदक्षिणा गुरूने म्हणजे आचार्याने स्वीकारू नये अशा तऱ्हेचाही नियम होता, असे उपनिषदांतील उल्लेखांवरून दिसते.
परमार्थमार्गात परमार्थाचा विचार व मंत्र देऊन दीक्षा देणाऱ्या गुरूचा महिमा फार मोठा मानतात. गुरूशिवाय मोक्षप्राप्ती वा ईश्वरप्राप्ती किंवा परमार्थसिद्ध होऊ शकत नाही, असा एक परमार्थविद्येतील प्रमुख सिद्धांत आहे. मुंडकोपनिषदात (१·२·१२) म्हटले आहे, की ब्रह्मज्ञानाकरिता संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न झालेल्या गुरूलाच शरण जावे. तो गुरू विद्वान आणि ब्रह्मनिष्ठ असावा. ईश्वराच्या ठिकाणी जितकी भक्ती तितकीच गुरूच्या ठिकाणी भक्ती असावी, तशी भक्ती असली तरच परमार्थाचा प्रकाश लाभतो, असे श्वेताश्वतर उपनिषदात अखेरीस म्हटले आहे. तर्कबुद्धीने आत्मज्ञान पूर्ण होऊ शकत नाही, त्याला आचार्योपदेशाची आवश्यकता आहे, असे कठोपनिषदात (१·२·८) म्हटले आहे. सदाचारी, जितेंद्रिय, विद्याविनयसंपन्न , दैवी संपत्तीने युक्त, तत्त्वज्ञानी व अत्यंत शांत अशीच व्यक्ती गुरू होय. गुरू हा शिष्याला ज्ञानदान करून स्वतःसारखाच बनवितो, असे गुरूचे सामर्थ्य वर्णिलेले असते.
ज्या मुमुक्षू साधकाला मानवी गुरू परमार्थमार्गात प्राप्त झालेला नाही, त्याला ईश्वरच प्रत्यक्ष उपदेश करतो व त्याचा उद्धार करतो, अशीही उदाहरणे उद्धृत केलेली आढळतात. उदा., समर्थ रामदासस्वामी यांना परमेश्वरच गुरू म्हणून लाभला. पातंजल योगसूत्रात ईश्वर हा प्राचीन योग्यांचाही गुरू आहे, असे सांगितले आहे. अर्जुनाचा पारमार्थिक गुरू भगवान श्रीकृष्ण हा साक्षात परमेश्वरच आहे, ही गोष्ट भगवद्गीतेवरून लक्षात येते. जगातील यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्मांतील प्रेषित उपदेशक म्हणजे मोझेझ, येशू ख्रिस्त व मुहंमद पैगंबर यांच्यासारख्यांना ईश्वराचा आदेश मिळाला व तो त्यांनी जगाला दिला, असे जे त्या त्या धर्मामध्ये मानले जाते, ते वरील पातंजल योगसूत्रांशी सुसंगतच आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात आपली गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजे साक्षात शंकरापासून सांगितली आहे. बृहदारण्यकोपनिषदात दोन ठिकाणी ब्रह्मविद्येची आचार्यपरंपरा सांगितली आहे, तिचा प्रारंभ स्वयंभू ब्रह्म म्हणजे परमेश्वर म्हणूनच सांगितला आहे.
बौद्ध व जैन धर्मांत विश्वकर्ता व विश्वनियंता ईश्वर मानलेला नाही. परंतु बुद्ध वा तीर्थंकर यांना ईश्वरवत सर्वज्ञ मानलेले आहे. बुद्धाने वा तीर्थंकरांनी केलेला तत्त्वांचा व साधनांचा उपदेश आगमांत ग्रथित केला आहे. म्हणजे हे सर्वज्ञ मुख्य धर्मगुरू होत.
जगातील सर्वच प्रमुख धर्मसंस्थांमध्ये धर्माची दीक्षा देणाऱ्या धर्मोपदेशकांस मुख्य स्थान दिलेले असते. हे धर्मोपदेशक म्हणजेच गुरू होत. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती, मुसलमान इ. सर्व धर्मांत गुरूला मुख्य स्थान आहे. सर्व धर्मांमध्ये गुरुपूजा करून गुरूविषयी पूज्यभाव व्यक्त करण्याची प्रथा आहे.
पहा : आचार्य शिखांचे धर्मगुरु.
जोशी, लक्ष्मणशास्त्री