गुलबर्गा किल्ल्यातील जामी मशीद

गुलबर्गा : कर्नाटक राज्यातील सहाव्या क्रमांकाचे शहर व गुलबर्गा जिल्ह्याचे प्रमुख ठाणे. लोकसंख्या १,४५,५८८ (१९७१). हे मुंबई–मद्रास लोहमार्गावर मुंबईपासून ५६५ किमी. आग्नेयीस असून हैदराबादच्या १७६ किमी. पश्चिमेस आहे. १३४७–१४२२ यांदरम्यान येथे बहमनी राज्याची राजधानी होती त्यामुळे हे खूप भरभराटलेले होते. त्या अमदानीत बांधल्या गेलेल्या कित्येक कलाकुसरयुक्त वास्तू, विशेषतः मशिदी, आजही गुलबर्ग्याचे सौंदर्य वाढवितात. पंधराव्या शतकात बांधलेली मूर शैलीतील जामी मशीद स्पेनमधील कॉर्दोव्हा शहरातील मशिदीसदृश आहे. फिरोजशाह तुघलकाबरोबर येथे आलेल्या चिस्ती कुटुंबातील बंदा नवाझ या संताचा दर्गा अतिशय पवित्र समजला जातो तेथे दरवर्षी मोठा उरूस भरतो. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हे म्हैसूर राज्यातील जिल्हाकेंद्र बनले. गहू, ज्वारी, गळिताची धान्ये इत्यादींची ही मोठी बाजारपेठ असून तेथे कापसाच्या गिरण्या व तेलघाणे आहेत. हे हल्ली शिक्षणाचे मोठे केंद्र बनले असून लिंगायत लोकांचे क्षेत्र समजले जाते. 

शाह, र. रू.