गुलखेरा

गुलखेरा : (गु. गुलखेड इं. हॉलिहॉक लॅ. ॲल्थिया रोझिया कुल-माल्व्हेसी). बागेतील ताटव्यास शोभा देणारे हे क्षुप (झुडूप) मूळचे क्रीट व ग्रीसमधील असावे असे कित्येक म्हणतात. परंतु ते चीनमध्ये बरीच वर्षे लागवडीत आहे. ते सु. दोन मी. उंच, काटक, वर्षायू (एक वर्ष जगणारे) किंवा द्विवर्षायू फुलझाड आहे. टेकड्यांवर बहुवर्षायूप्रमाणे वाढविता येते. हे ⇨ माल्व्हेसी  कुलातील असल्याने याची अनेक शारीरिक लक्षणे त्या कुलवर्णनात दिल्याप्रमाणे आहेत. पाने साधी, मोठी (७·५ – १२·५ सेंमी. व्यासाची), लांब देठाची, ५–७ खंडांची, हृदयाकृती असून फुलोरा खोडाच्या शेंड्याकडे लांब मंजरीसारखा असतो त्यावर अल्पवृंत (लहान देठ असलेली) व मोठी फुले जानेवारी – मार्चमध्ये येतात. गुलाबी, जांभळट, पांढरा व पिवळा असे भिन्न आकर्षक प्रकार फुलांत आढळतात. फुलाला ६ – ९ जुळलेल्या छदकांचा अपिसंवर्त असतो. किंजपुटातील प्रत्येक कप्प्यात एक बीजक असते. [→ फूल]. फळ (पालिभेदी) बसके, शुष्क असून त्याचे अनेकबीजी सुटे भाग होतात. बी सपाट असून फार जलद रुजते. हिवाळ्यात वाढ चांगली होते, पण पाऊस बेताचा असल्यास पावसाळ्यातही वाढते. सपाटीवर सौम्य हवामानात वर्षभर वाढ चालू राहते. खतावलेली सुपीक जमीन आवश्यक असते. तसेच झाडांमधून योग्य अंतर व पुरेसे पाणीही द्यावे लागते. भुरी, तांबेरा, मावा व पांढरी माशी यांचा उपद्रव होतो व त्यांचा बंदोबस्त करावा लागतो.

जोशी, गो. वि.