गुप्तवार्ता : (इंटेलिजन्स). देशातील किंवा परदेशातील गुप्त स्वरूपाची किंवा इतर प्रकारची महत्त्वाची माहिती गोळा करणे, हे कोणत्याही शासनाच्या दृष्टीने आवश्यक असते. परकीय, परराष्ट्रे व देशांतर्गत परिस्थिती यांविषयी नाना प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवून तिचा राष्ट्रीय स्वास्थ्य, हित व संरक्षण यांसाठी उपयोग करणे, हे गुप्तवार्तासंकलनाचे उद्दिष्ट आहे. गुप्तवार्तासंकलनामुळे राज्यकर्त्यांना अनेक राष्ट्रीय गोष्टींसंबंधी निर्णय घेऊन तत्संबंधी योग्य अशा योजना वेळीच आखता येतात. सर्वसाधारणपणे शास्त्रीय संशोधन, उद्योग, शेती, अन्नधान्य, वाहतूक, राजकारण, परराष्ट्रीय संबंध, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय पक्षांचे बलाबल, शासनकर्त्यांची वैयक्तिक माहिती, शासन-प्रजा यांचे संबंध, संरक्षणक्षमता, इतिहास, भूगोल, ऋतुमान, खनिज संपत्ती यांसारख्या विनिमय विषयांसंबंधी पूर्वज्ञान मिळविण्याची गरज असते. खास गुप्तचरांमार्फत पूर्वी गुप्तवार्तासंकलनकार्य केले जाई. आधुनिक काळात त्याला मोठ्या यंत्रणेचे स्वरूप आले आहे.

गुप्तवार्तासंकलनासंबंधी प्राचीन काळापासून विचार होत आला आहे. ऋग्वेद (१०·३०८), अथर्ववेद, रामायण (७२·१२·१५ व १०५·१८·२०), महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र  (११ व १२ अधिकरणे) यांतून असे निर्देश आढळतात. गेल्या चाळीस वर्षांत गुप्तवार्तासंकलनकला सर्व शाखांतील प्रगतीमुळे व विशेषतः इलेक्ट्रॉनिकीमुळे फारच प्रगल्भ झाली आहे. अमेरिका व रशिया यांनी या क्षेत्रात अग्रेसरत्व मिळविले आहे. गुप्तवार्तासंकलन दोन प्रकारचे असते. (१) दूरगामी स्वरूपाचे : यात सध्या घडणाऱ्या घटनांचा तात्कालिक व दूरगामी स्वरूपाचा काय परिणाम होईल, कोणत्या घटना राजकीय दृष्ट्या घडविल्या गेल्या पाहिजेत, विशिष्ट घटना का घडविल्या जात आहेत, त्यांचे अन्योन्य संबंध कसे आहेत आणि त्यांचे तात्कालिक व दूरगामी परिणाम काय संभवतात इ. प्रकारची माहिती मिळवावी लागते. (२) लष्करी स्वरूपाचे : यात युद्धापूर्वी व युद्ध चालू असताना शत्रूची लष्करी हेतूने माहिती मिळविणे तसेच शांतताकाळातही शत्रूच्या संरक्षण व्यवस्थेसंबंधी अद्ययावत माहिती गोळा करणे, हे कार्य असते. गुप्तवार्तासंकलन राष्ट्रीय पातळीवरून बहुशः एकाच केंद्रीय संस्थेकडून केले जाते. ग्रेट ब्रिटन व काही साम्यवादी राष्ट्रांत दोन संस्थांकडून हे केले जाते. राजदूत व त्याच्या साहाय्यास असलेल्या राजकीय, लष्करी, आर्थिक, सांस्कृतिक खात्यांतील अधिकारी, सल्लागार व तज्ञ यांकडून गुप्त माहितीचे संकलन केले जाते. साधारणपणे ऐंशी टक्के माहिती उघडपणे मिळते. वर्तमानपत्रे, ग्रंथ, सरकारी अहवाल, नोंदी, आकडेवारी, विधिमंडळातील प्रश्नोत्तरे, राजकीय व शासकीय वक्तव्ये, धोरणपत्रके, रेडिओ, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम वगैरेंवरून योग्य ती माहिती गोळा केली जाते. उरलेली वीस टक्के माहिती खटपट केल्याशिवाय मिळत नाही. विशेषतः अणुशक्ती संशोधन केंद्रे, संरक्षण केंद्रे, शस्त्रास्त्रांचे उत्पादन व आयात-निर्यात, संरक्षण योजना व संघटना, परराष्ट्रीय संबंध इत्यादींविषयी माहिती मिळविणे फार कठीण असते. कारण या सर्व बाबतींत अत्यंत गुप्तता पाळली जाते. म्हणून गुप्तहेरांचे व फितुरांचे जाळे अशा ठिकाणी मोठ्या कुशलतेने आणि गुप्तपणाने निर्माण करावे लागते [→ हेरगिरी]. गुप्ततेने व चोरून गुप्तवार्ता मिळविणे, हा हेग आंतरराष्ट्रीय अभिसंधीप्रमाणे गुन्हा मानला जात नाही परंतु ती मिळविताना पकडले गेल्यास तो गुन्हा होऊ शकतो. तसेच परराष्ट्रास ती पाठविणे व देऊ करणे हाही गुन्हा आहे. अर्थात प्रत्येक राष्ट्र आपल्या सोयीप्रमाणे कायदे करून पकडलेल्या गुप्तहेरांना शिक्षा देऊ शकते.

गुप्तवार्तासंकलनाचे तंत्र दोन प्रकारचे असते. पहिले चोरून व दुसरे हेरगिरी करून. ज्याविषयी माहिती उघडपणे मिळविणे अशक्य असते, त्याविषयी गुप्तपणे, कुटिलतेने व चोरून माहिती मिळवावी लागते. चोरून माहिती मिळविली जाते हे सर्वांना ठाऊक असते. राजदूत व त्यांचे सहकारी चोरून माहिती मिळवितात व ती स्वदेशास पाठवितात. राजदूताचे रेडिओ संदेशांचे दळणवळण चालू असते परंतु अशा संदेशांतून परदेशाविषयी गुप्तवार्ताही पाठविली जाते. कोणत्यातरी दिखाऊ राजकीय आवरणाखाली दुसऱ्या देशांची माहिती गोळा करतात. राजदूतनिवासात मायक्रोफोन लावून संभाषणे ऐकणे व इतर प्रगत इलेक्ट्रॉनिक व रेडिओ उपकरणांच्या साहाय्याने चोरून माहिती मिळविणे शक्य झाले आहे. परदेशात वृत्तपत्रसंस्था, वाणिज्यसंस्था, मित्रमंडळे स्थापन करून किंवा संशोधन करण्याच्या मिषाने प्रवासी धाडून अथवा विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करून किंवा स्वयंसेवक संघटना वा सल्लागार पाठवून त्यांच्या मार्फत गुप्तपणे व चोरून माहिती मिळवितात. एवढेच की जर काही अनुचित घडले, तर खरी वस्तुस्थिती उघडकीस येऊन आरोप येणे शक्य असते. राजकीय व सैनिकी रेडिओ संदेशांचे अंतर्छेद घेऊन त्यातूनही माहिती मिळविली जाते. हल्ली मच्छीमारी बोटीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवून मच्छीमारीच्या नावाखाली सर्रास गुप्तवार्ता मिळवितात. कृत्रिम उपग्रहांचा उपयोग करून परदेशांतील प्रक्षेपणास्त्र केंद्र, दळणवळणाचे मार्ग, लष्करी केंद्रे, शहरे, कारखाने यांची छायाचित्रे घेता येतात. उपग्रहांमुळे चीन पहिला अणुस्फोट केव्हा करू शकेल, याचा अमेरिकेने अंदाज घेतला होता. अतिशय उंचीवरून विमानातून माहिती घेतली जाते. भारताने गोव्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, हे अमेरिकेला व ग्रेट ब्रिटनला लष्करी रेडिओ संदेश विश्लेषणामुळे अगोदरच कळले होते. म्हणून गोवामुक्तीची कारवाई चोवीस तास पुढे ढकलण्याची विनंती अमेरिकेचे राजदूत गालब्रेथ यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना केली होती व त्यामुळे कारवाई पुढे ढकलली. उत्तर कोरियाने अमेरिकेचे प्यूबलो हे जहाज पकडले होते. या जहाजात अत्यंत आधुनिक व विशिष्ट बनावटीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे होती. त्यांच्यामुळे उत्तर कोरियातील रेडिओ, रडार व समुद्राच्या पोटातील दळणवळणाची माहिती गोळा केली जात असे. मनुष्यनियंत्रित उपग्रहांच्या आधारेही परदेशातील अणुसंशोधन केंद्रे, अणुशक्तीने चालणारी वीजकेंद्रे, प्रतिप्रक्षेपणास्त्र पद्धत इत्यादींची माहिती सुलभतेने मिळविता येते. अमेरिकेने चीन आणि रशियाविषयी रेडिओ व रडार प्रक्षेपणाची माहिती मिळविण्याकरिता फेरेट उपग्रह सोडले आहेत. यांचे अवकाशभ्रमण ५०० किमी. उंचीवरून चालते. उपग्रहाचे आयुष्य सात वर्षांचे असते. या उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीचे संकलन द्येगो गार्सीआ या हिंदी महासागरातील तळावर व इतरही काही ठिकाणी केले जाते. वर लिहिल्याप्रमाणे चोरून व हेरगिरी करून माहिती मिळविल्यानंतर त्यापुढचे अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे अमुक अमुक माहिती गोळा करण्यात आली आहे, हे दुसऱ्या देशाला ठाऊक होता कामा नये. शिवाय आपणास माहिती मिळाली आहे, हे प्रतिस्पर्ध्याला ठाऊक आहे किंवा नाही, हेही स्वतःला कळले पाहिजे. नाहीतर गुप्तवार्ता मिळविण्यात सामील असलेल्या व्यक्ती व कार्यपद्धती उघडकीस येऊन राजकीय दृष्ट्या घोटाळे निर्माण होतात.

संकलन : उघडपणे व गुप्तपणे माहिती मिळविणे, तिचे वर्गीकरण करणे, विविध प्रकारच्या माहितीमधील दुवे जोडणे, माहितीचे पृथक्करण व विश्लेषण करून पर्याय काढणे व शेवटी निष्कर्ष काढणे, अशी संकलन प्रक्रिया असते. संकलनात खंड पडत नाही व संकलनचक्र नेहमी चालू राहते. संकलक आपापल्या विषयांतील अनुभवी तज्ञ असतात. संकलनाकरिता भाषातज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते, राज्यशास्त्रज्ञ असे अनेक तज्ञ लागतात.

भारतात १९६२ च्या चीन-भारत युद्धानंतर १९६५ साली संयुक्त गुप्तवार्तासंकलन समिती स्थापण्यात आली. या समितीवर संरक्षण, गृह व परराष्ट्रीय खात्यांचे चिटणीस व तीनही सेनादलांचे प्रमुख सदस्य असतात. गुप्तवार्तासंकलन मध्यवर्ती गुप्तवार्तासंकलन कार्यालयाकडून (सेंट्रल इटेलिजन्स ब्यूरो) केले जाते. आंतरराज्यीय गुप्तवार्तासंकलन प्रत्येक राज्याचे पोलीस खाते करते.


प्रति-गुप्तवार्तासंकलन : परकीयांच्या गुप्तवार्तासंकलन कार्यास प्रतिबंध करणे म्हणजे प्रति-गुप्तवार्तासंकलनकार्य होय. आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने हे करणे अत्यंत आवश्यक आहे. परकीयांस आपली माहिती मिळू न देणे व त्यांच्या संकलनात जास्तीत जास्त अडथळे-अडचणी उभ्या करणे आवश्यक असते. याकरिता स्वदेशात येणाऱ्या-जाणाऱ्या परकीय व्यक्तीवर नजर ठेवणे, देशात परकीय हेर वा फितूर व्यक्ती कोण आहेत आणि त्या कोणती माहिती व ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच ते कोणत्या पद्धतीने करीत आहेत याची माहिती मिळवावी लागते. हेर-फितुरांचा नायनाट करणे, परकीय प्रचारकेंद्रे, परकीय आर्थिक साहाय्याने चालणाऱ्या संस्था, मित्रमंडळे, परदेशांतून शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्ती, परकीय संशोधक, सल्लागार, व्यापारी व सांस्कृतिक मंडळे इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. प्रतिस्पर्ध्याचे मनसुबे आधीच कळणे आवश्यक असते. वर म्हटल्याप्रमाणे हेग आंतरराष्ट्रीय अभिसंधीप्रमाणे गुप्तवार्तासंकलन व माहिती मिळविणे हा गुन्हा नव्हता. तरी प्रत्येक राष्ट्राने याकरिता विशिष्ट कायदे केलेले असतात. उदा., भारत संरक्षण कायदा.

लष्करी गुप्तवार्तासंकलन : परकीयांची संरक्षणनीती, संरक्षणसंघटना, सैनिकी हालचाली, संदेशवहनपद्धती, क्षेपणास्त्र संशोधन, अण्वस्त्रे, लढाऊ विमानतळ, बंदरे, लढाऊ जहाजे, गुप्तलेखनतंत्र इत्यादींची माहिती साधारणपणे मध्यवर्ती गुप्तवार्तासंकलन संस्थेकडून गोळा केली जाते. लष्करी संकलन हे युद्ध जुंपण्यापूर्वी आणि युद्धकालात प्रत्यक्ष रणक्षेत्रात केले जाते. आघाडीवरील सैन्याधिकाऱ्यांस शत्रूविषयी पूर्व माहिती मिळत राहिल्यामुळे डावपेच करून व कमीत कमी हानी सोसून यशस्वी होणे सुकर होते. सामान्यतः लष्करी गुप्तवार्ता पुढील प्रकारे गोळा केली जाते : (१) शत्रूचे सैन्यबळ, शस्त्रात्रे, युद्धरचना, आघाडीव्यूह (डिप्लॉयमेंट) इत्यादींच्या माहितीवरून शत्रू हल्ला करणार वा बचाव करणार की पळ काढणार, याचा अंदाज घेता येतो आणि त्याप्रमाणे डावपेच करणे, राखीव सैन्य बोलाविणे अथवा रणगाडे, तोफखाना वगैरेंना विशिष्ट कामगिरी देणे, हे ठरविता येते. शत्रूची मर्मस्थाने व भेद्यस्थाने त्यामुळे आधीच हेरता येतात. (२) अधिकारी केंद्रे : या केद्रांद्वारे हालचालींचे, डावपेचांचे हुकूम दिले जातात, त्याचप्रमाणे लढाईवरील आधिपत्य व नियंत्रण केले जाते. म्हणून या केंद्रांची माहिती झाल्यास त्यांना त्याबरोबर संदेशवहन केंद्रांना निष्क्रिय करता येते. (३) विभाग पथकातील अंतर्सीमा : या सीमा म्हणजे संभवनीय भेद्यस्थाने होत. या सीमा जर निश्चित केल्या नसतील किंवा त्यांचे रक्षण करण्याबद्दल अधिकाऱ्यास उचित आणि पक्के हुकूम नसतील, तर या ठिकाणी आघाडी फोडणे शक्य होते. (४) भौगोलिक घडण : या घडणीप्रमाणे युद्धाची व्यूहरचना, रणगाड्यांचा वापर, विमानहल्ले, हालचालींची सुरक्षितता, रडार व अस्त्रतळ, राखीव दल इत्यादींची योजना करता येते. (५) रडार व क्षेपणास्त्रतळ : यांना जोडीनेच काम करणे भाग असते. हे कोठे प्रस्थापित करावयाचे हे भौगोलिक घडणीवर अवलंबून असते. विमानहल्ल्यापासून सैन्याला सुरक्षित राखण्याची जबाबदारी यांच्यावर असल्यामुळे असल्या तळांची माहिती असणे आवश्यक आहे. (६) रेडिओप्रक्षेपण व संदेशवहन केंद्रे : यांची माहिती झाल्यास आधिपत्य व नियंत्रणाची रचना कळून येते. त्यामुळे संदेशाचा अंतर्छेद घेणे किंवा प्रक्षेपण आणि वहनयंत्रणा ⇨इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्राद्वारे निष्क्रिय करता येते. (७) दळणवळणाचे रस्ते आणि पायवाटा : यांची माहिती झाल्यास प्रत्यक्ष लष्करी हालचालींची माहिती मिळून, युद्धहेतुविषयी अंदाज घेता येतो. त्याचा डावपेचावर परिणाम होऊ शकतो. (८) हवामान : सूर्योदय-सूर्यास्त केव्हा होणार, धुके, पाऊस, वाऱ्याची दिशा, वादळे वगैरेंची माहिती मिळाल्यास गोळामारी, अस्त्रप्रक्षेपण, विमानहल्ले, जमिनीवरून हल्ले करणे वगैरे व बचावपथ्ये उभारणे इत्यादींचे नियोजन करता येते. विमानहल्ले कोणत्या बाजूने व केव्हा होऊ शकतील याचाही अंदाज घेता येतो. अस्त्रक्षेपणदिशा पण निश्चित करता येते.

वार्तासंकलनाची प्रक्रिया : माहिती – संपादन प्रत्यक्ष व परोक्ष या दोन पद्धतींनी केले जाते. प्रत्यक्ष पद्धतीत शत्रूहालचाली, युद्धबंदी, मुलकी लोक, निसटून आलेले आपले युद्धबंदी, कागदपत्रे, संदेश, तोफांचे आवाज, तोफगोळ्यांचे आवाज, त्यांनी केलेले खड्डे व त्यांचे तुकडे, अणुदूषित व वायुदूषित भूभागाचे परीक्षण, नकाशे, छायाचित्रे, हवामान अंदाज, अपेक्षित पण एकाएकी बंद पडलेल्या शत्रुकारवाया व कार्यक्रम वगैरेंपासून माहिती मिळविली जाते. परोक्ष पद्धतीत आपल्या हस्तकांकडून किंवा गुप्तचरांकडून मिळालेली माहिती, गस्तीपथकांनी मिळविलेली माहिती, हवाई व इतर प्रकारची ⇨टेहळणी, ⇨रडार यांसारख्या उपकरणांद्वारा मिळालेली माहिती वगैरेंचा समावेश होतो.

संस्करण : प्रत्यक्षपणे वा परोक्षपणे मिळालेल्या माहितीचे विषयानुरूप वर्गीकरण करणे महत्त्वाचे असते. याकरिता निरनिराळ्या प्रकारांची कालिके, पत्रके व टिपणे ठेवतात.

विश्लेषण व मूल्यांकन : माहिती कितपत खरी, समर्पक, विश्वासार्ह व मौलिक आहे, हे पडताळण्यासाठी तिचे विश्लेषण व मूल्यमापन केले जाते.

अर्थबोध व एकात्मीकरण : ही शेवटची प्रक्रिया होय. संपादन केलेल्या माहितीपासून काय बोध घेता येईल हे ठरवावे लागते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीतील दुवे नीट फोडून त्यांच्यात संगती लावावी लागते.

वायूसेना व नौसेना यांच्याकरिता गुप्तवार्तासंकलन करताना वरील प्रक्रियाच वापरतात. पण त्यांच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि कामगिरीला उपयुक्त होईल, या दृष्टीने ते केले जाते.

गुप्तवार्तासंकलन पूर्ण झाल्यानंतर संबंधितांकडे ती माहिती पाठविण्यात येते. गुप्तवार्तासंकलन पूर्वनियोजन केल्याशिवाय शक्य होत नाही. त्यातील सर्व प्रक्रिया चक्राप्रमाणे अखंड चालू असतात. गुप्तवार्तासंकलन व प्रति-गुप्तवार्तासंकलन या दोन्ही गोष्टी बरोबरीने व एकाचवेळी चालू असतात.

लष्करातील प्रत्येकाने सुरक्षितता व रणांगणावरील सुरक्षिततेचे नियम व आज्ञा कसोशीने पाळणे, चौकस राहणे, जे जे पाहण्यात व ऐकण्यात येईल (अफवा सोडून) ते वरिष्ठांना कळविणे, युद्धबंदी न होणे, बंदी झाल्यास निसटून जाण्याचा प्रयत्न करणे, शत्रूच्या चौकशीला दाद न देणे इ. गोष्टींचा गुप्तवार्तासंकलनाशी निकटचा संबंध आहे. भूपृष्ठावरून व आकाशातून टेहळणी करताना कोठलीही गोष्ट शत्रूच्या नजरेस पडू नये म्हणून ⇨मायावरणाचा उपयोग करण्यात येतो.

महत्त्वाच्या गुप्तवार्ता संघटना : सी.आय्.ए. (सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी) ही अमेरिकेची केंद्रीय गुप्तवार्ता संघटना १९४७ मध्ये स्थापन करण्यात आली. या संघटनेवर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे नियंत्रण असते. राष्ट्राध्यक्ष या समितीचा अध्यक्ष असतो. राष्ट्रीय गुप्तपोलीस संघटना (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) सी.आय्.ए. पासून वेगळी आहे. पण गुप्तपोलीस संघटना संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवते व योग्य ते विरोधी काम करते.

के. जी. बी. (Komitet Gosudarstvennoye Bezopasnosti) ही रशियाची संघटना आहे. यापूर्वी ही चेका, एन्.के.व्ही.डी. ऑगप्यू वगैरे नावांनी ओळखली जात असे. के.जी.बी.च्या कार्यक्षेत्रात गुप्तवार्ता तर आहेच शिवाय गुप्तपोलीस, राजकीय तुरुंग, श्रमछावण्या आणि सीमासंरक्षक पोलीस व दलदेखील येतात. एकंदरीत ही संघटना सर्वंकष आहे.

जी. आर्. यू (Glavnoye Razvedyvatelnoye Upravlenie) ही रशियाची संघटना सैनिकी गुप्तवार्तेकरिता आहे. सैनिकांच्या अखत्यारीतील युद्ध-गुप्तवार्तासंघटना वेगळी आहे परंतु त्यांचे एकमेंकीस सहकार्य मिळते. के.जी.बी.चा देखील यांत वरचष्मा असावा, असे वाटते.

एम्.आय्.-६ (मिलिटरी इंटेलिजन्स डिपार्टमेंट-६) ही ब्रिटनची गुप्तवार्ता संघटना परराष्ट्रमंत्र्याच्या नियंत्रणाखाली काम करते. एम्.आय्.- ६ ही जगातील अत्यंत गुप्त संघटना आहे, असे म्हणतात. एम्.आय्.-५ (मिलिटरी इंटेलिजन्स डिपार्टमेंट-५) ही गुप्तपोलीस संघटना गृहमंत्र्याला जबाबदार आहे. एम्.आय्.-६ व ५ या दोन्हीही संघटनांना एकमेकींस साहाय्य करावे लागते.

समाजकार्य खाते या नावाने चीनची गुप्तवार्ता संघटना ओळखली जाते. रशियाच्या के.जी.बी. व जी. आर्.यू. या संघटनांप्रमाणेच हिची कार्यपद्धती असावी, असे वाटते. अंतर्गत सुरक्षा खाते हे गुप्तपोलीस खाते आहे. याशिवाय परदेशांत असलेल्या चिनी समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी वेगळे असे आंतरराष्ट्रीय संपर्क खातेही आहे.

संदर्भ : 1. Dulles, Allen, The Craft of Intelligence, London, 1964.

           2. Heymont, I. Combat Intelligence in Modern Warfare, Pennsylvania, 1960.

           3. Newman, Bernard, The World of Espionage, London, 1962.

                                               

दीक्षित, हे. वि.