गुप्तरोग : काही संसर्गजन्य रोगांच्या समूहाला गुप्तरोग म्हणतात. दूषित व्यक्तीशी संभोग केल्यामुळे होणाऱ्या या रोगांना रतिरोग असेही म्हणतात. कधीकधी हे रोग संभोगाशिवाय होऊ शकतात. दूषित व्यक्तीच्या इतर संसर्गजडित भागांशी संबंध आल्यानेही हे रोग होतात. दूषित व्यक्तीचे चुंबन घेणे, दाईच्या अंगावर पिणाऱ्या दूषित अर्भकापासून तिच्या स्तनास संसर्ग होणे, दूषित व्यक्तीने वापरलेली कपबशी किंवा कपडे योग्य प्रकारे न धुता वापरणे इत्यादींमुळे हे रोग होण्याचा संभव असतो. डॉक्टर, परिचारिका वगैरेंनी योग्य काळजी न घेतल्यास रोग्याच्या दूषित रक्तस्रावापासून हातावर किंवा डोळ्यावर परिणामाने रोग जडू शकतो. गर्भात असलेल्या गर्भास, विशेषेकरून गर्भधारणेच्या उत्तरार्धात उपदंश (गरमी) होते. प्रसूतीच्या वेळी दूषित मातेच्या जननेंद्रियाचा स्राव लागून मुलास रोग होतो. उदा., नवजात नेत्रशोथ (डोळ्यांना पूयप्रमेहामुळे येणारी सूज).

पुढील रोगांचा गुप्तरोगात समावेश होतो : (१) उपदंश, (२) पूयप्रमेह (परमा), (३) मृदुरतिव्रण, (४) लसीका कणार्बुदी वंक्षण रोग, (५) यॉज (उपदंशासारखाच परंतु सौम्य रोग), (६) जघन कणार्बुद, (७) ट्रिकोमोनियासिस (ट्रिकोमोनास नावाच्या चाबकासारखे शेपूट असलेल्या सूक्ष्मजंतूमुळे होणारा योनिमार्ग आणि मूत्रमार्ग यांचा शोथ म्हणजे दाहयुक्त सूज). या सर्व रोगांवर स्वतंत्र नोंदी मराठी विश्वकोशात इतरत्र दिल्या आहेत.

  जगातील सर्व देशांत हे रोग आढळतात. विषुववृत्तीय व उष्ण कटिबंधातील देशांत यांचे प्रमाण जास्त आढळते. एकाच रोग्यामध्ये वरीलपैकी एकापेक्षा अधिक रोग एकाच वेळी असण्याची शक्यता असते उदा., उपदंश व पूयप्रमेह. १९५० पर्यंत अशा रोग्यांचे लोकसंख्येतील प्रमाण कमी होत होते, परंतु त्यानंतर त्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९५६–६० या काळात ते १३० टक्क्यांनी वाढले. जागतिक आरोग्य संघटनेच्या १९७१ च्या पाहणीवरून सर्व देशांत पूयप्रमेहाची वाढ झाल्याचे आढळले आहे तर उपदंशाचे प्रमाण कॅनडा, डेन्मार्क व स्वीडन या देशांत कमी झाल्याचे आढळले आहे. याच पाहणीमध्ये अमेरिकेतील उपदंशाचे प्रमाण ८ ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे आढळले आहे. तिथे कोवळ्या वयाच्या (१२ ते १९ वर्षे) तरुणांत या रोगाचे झपाट्याने वाढणारे प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. स्वैराचार, लैंगिक दृष्टिकोनातील बदल, लैंगिक संबंधांबद्दल व या रोगांबद्दलचे अज्ञान यास कारणीभूत झाले आहे. खाजगी डॉक्टरकडे उपचारार्थ आलेल्या या रोग्यांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यास न दिल्यामुळे रोग संसर्गाचे मूळ निपटून काढता येत नाही. केवळ उपचारांनी रोग निवारण करता येत नाही. त्याकरिता योग्य शैक्षणिक व सामाजिक बदलाची जोडही द्यावी लागते.

नियंत्रणात्मक  उपाय :  ज्या देशांत या रोगांचे प्रमाण अधिक आहे, ते जगाच्या इतर भागाला अव्यक्त धोकाच आहे. या रोगांचे स्वरूपही अशाच प्रकारचे आहे की, नियंत्रणाकरिता सर्वांनी एकाच वेळी कसून प्रयत्न करावयास हवा. या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गुप्तरोग व ट्रिपॅनोमॅटोसिस (ट्रिपॅनोमा नावाच्या सर्पिल आकाराच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्‌भवणारे गुप्तरोग व इतर रोग) यांकरिता खास शाखा उघडली आहे. ही शाखा निरनिराळ्या देशांच्या आरोग्य संघटनांना या रोगांच्या नियंत्रण कार्यात मदत करते व प्रोत्साहन देते. जगभर पसरलेल्या नियंत्रण कार्यवाहीशी ती सतत संपर्क साधून असते.

अमेरिकेत स्थानिक व मध्यवर्ती दोन्ही स्वरूपाच्या मदतीने गुप्तरोग नियंत्रणाकरिता उपाय योजिले जात आहेत. १९६१ मध्ये अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतर्फे नेमलेल्या या विषयावरील चौकशी समितीने पुढील उपाय सुचविले आहेत.

(१) खाजगी डॉक्टर व त्यांच्या संस्था तसेच रोग्यांचे रक्त तपासणाऱ्या प्रयोगशाळा यांचे सहकार्य मिळवून सर्व दूषित व्यक्तींची नावासहित माहिती आरोग्य खात्याने मिळवावी.

(२) रोगपरिस्थितिविज्ञानविषयक यंत्रणा अधिक जोमाने वाढवून तिच्या मदतीने उपदंशाचा प्रत्येक रोगी हाताळण्याची व्यवस्था करावी.

(३) वैद्यक व्यावसायिक (डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा मदतनीस वगैरे) आणि जनता यांना या रोगांचे खास शिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

गुप्तरोग नियंत्रणाकरिता तसेच ट्रिपॅनोमामुळे होणाऱ्या इतर (संभोगाव्यतिरिक्त होणाऱ्या) रोगांच्या नियंत्रणाकरिता सामाजिक तसेच वैयक्तिक कृतीची जरूरी असते. सामाजिक उपायांमध्ये आरोग्य व लैंगिक संबंधांबद्दलचे शिक्षण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाहपूर्व आणि प्रसूतिपूर्व रक्त तपासणी इत्यादींचा समावेश होतो.

वैयक्तिक उपायांमध्ये पुरुषांनी निरोध (निर्जंतुक रबरी पिशवी) वापरणे हा एक साधा व उत्तम उपाय आहे. दूषित व्यक्तीशी संबंध आल्याबरोबर पेनिसिलिनाचा इलाज करून घेणे हा उपदंश व पूयप्रमेह या दोहोंवर एक गुणकारी प्रतिबंधक इलाज आहे.

दूषित व्यक्तींवरील नियंत्रणामध्ये योग्य निदान, संबंधितांची तपासणी, योग्य उपचार आणि आरोग्य खात्याकडे नाव नोंदणी यांचा समावेश होतो.

गुप्तरोगांचा फैलाव थांबविण्यात अनेक अडचणी येतात. हे रोग मुख्यत्वेकरून संभोगजन्य असल्यामुळे त्याबद्दल गुप्तता राखण्याची प्रवृत्ती असते. जुजबी उपचार करण्याकडे किंवा एखाद्या अनोळखी वैदूकडून, भोंदू वैद्याकडून अयोग्य उपचार करून घेण्याकडे अशा रोग्यांचा कल असतो. अर्धवट उपचारांनी रोग पूर्ण बरा न होता असा रोगी इतरांमध्ये रोग पसरविण्यास कारणीभूत होतो.

भारताच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेत गुप्तरोग नियंत्रण हा केंद्रीय शासनाच्या अखत्यारीतील विषय करण्यात आला असून त्याकरिता आर्थिक मदतीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. १९७३ मध्ये २९ नवी गुप्तरोग चिकित्सागृहे स्थापन करण्यात आली असून त्यांची एकूण संख्या २९८ झाली आहे. गुप्तरोग नियंत्रणविषयक प्रशिक्षणाची सफदारजंग रुग्णालय, नवी दिल्ली येथील व इन्स्टिट्यूट ऑफ व्हिनिरिऑलॉजी या मद्रास मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या संस्थेतून सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी शिक्षण व संशोधन या दोहोंवर भर दिला जातो. काही विद्यापीठांतून या विषयाचे खास शिक्षण व पदविका मिळविण्याची सोय आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेत एकूण ७५·९७ लक्ष रुपयांची गुप्तरोग नियंत्रणाकरिता तरतूद करण्यात आली आहे.

सलगर, द.चि. भालेराव, य. त्र्यं.