गुप्तचर : गुन्हे व गुन्हेगार, राजकीय-सामाजिक घडामोडी आणि राज्ययंत्रणेच्या दैनंदिन कारभारातील सचोटी यांविषयीची माहिती गुप्तपणे गोळा करणाऱ्यांना गुप्तचर ही संज्ञा आहे. त्यांचे दोन वर्ग असतात : सरकारी गुप्तचर आणि खाजगी रीत्या व्यवसाय करणारे गुप्तचर. गुप्तचराचे काम करणारे सर्व कर्मचारी पोलीस संघटनेतीलच असतात, असे नाही. लाचलुचपत-प्रतिबंधक, अर्थ, जकात इ. खात्यातील कर्मचाऱ्यांचीही गुप्तचर म्हणून नेमणूक होत असते. खाजगी गुप्तचरांच्या संस्था गेल्या शतकात उदयास आल्या. गेल्या शतकापर्यंत पाश्चात्य देशांतील शासनयंत्रणा पोलीस खाते चालवीत नसे. नगरपालिका, (प्रादेशिक) परगणे आणि खेडेगावे यांच्या वतीने वेगवेगळ्या पोलीस संघटना काम करीत असत पण अशी दले स्वतःची कामगिरी बजावण्यात क्वचितच कार्यक्षम ठरत. कित्येकदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा नीटपणे तपासही केला जात नसे. अर्थातच जनतेची फारच कुचंबणा होई. खाजगी गुप्तचर संस्था स्थापन झाल्या, त्या ही अडचण दूर करण्यासाठीच. अनेक खळबळजनक गुन्ह्यांचा शोध लावण्यात त्यांनी भरघोस यशही मिळविले. सर आर्थर कॉनन डॉइलसारख्या सिद्धहस्त लेखकांना कथाकादंबऱ्यांतून शेर्‌लॉक होम्ससारखे गुप्तचर नायक रंगवता आले ते यामुळेच. आता मात्र तसे नायक प्रत्यक्षात भेटणे जवळजवळ अशक्यच आहे. कारण आता बहुतेक सर्व पोलीस संघटनांत स्वतंत्र गुप्तचरविभाग आहेत. आजच्या खाजगी गुप्तचरसंघटना मुख्यत्वेकरून खाजगी कारखान्यांत अथवा दुकानांत चोऱ्या होऊ नयेत, म्हणून देखरेख करण्यापुरते गुप्तचर पुरवीत असतात. खाजगी व्यक्तींना हवी असलेली महत्त्वाची माहितीही ते गुप्तपणे काढून पुरवितात. अलीकडे अशा खाजगी गुप्तचरसंघटना भारतातही निघालेल्या आहेत.

भारतात गुप्तचर नेमण्याची प्रथा वास्तविक अगदी पुरातन काळापासून रूढ होती. ऋग्वेदात म्हटले आहे, की वरुण सम्राटाचे स्पश म्हणजे गुप्तचर सर्वत्र पसरलेले असतात. राजाने बारीकसारीक घडामोडींची माहिती चाकरांकडून गुप्तपणे जमा करवावी, असा सल्ला रामायणात दिलेला आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात गूढ पुरुषसंस्थेला म्हणजे गुप्तचर संघटनेला मार्गदर्शक ठरेल, अशी सविस्तर माहितीच दिलेली आहे. प्रसिद्ध तमिळ पंडित तिरुवळ्ळुवर यानेही आपल्या तिरुक्कुरळ  या ग्रंथात गुप्तचरपद्धतीचे वर्णन केलेले आहे, ते असे : राज्यातील नानाविध घटनांची माहिती राजाने गुप्तचरांद्वारा काढली नाही, तर त्याला यश मिळणारच नाही. आपले शत्रू कोण, मित्र कोण, ते काय करीत असतात इ. चौकशी राजाने गुप्तचरांमार्फत सतत करविली पाहिजे. लोकांना अजिबात संशय येणार नाही, अशाच बेताने गुप्तचरांनी वेषांतर करून राज्यात सर्वत्र संचार करायला हवा पण ते गुप्तचर असल्याची मात्र तिळमात्र शंका लोकांच्या मनात येता कामा नये. एखाद्याने शंका घेतली, अगदी मारहाण केली, तरी आपण गुप्तचर असल्याचे त्यांनी मान्य करता कामा नये. एका गुप्तचराचा सुगावा दुसऱ्या गुप्तचरालाही लागून उपयोगी नाही. एका गुप्तचराने सादर केलेल्या वृत्तांताची शहानिशा दुसऱ्या गुप्तचराकडून करून घेतल्याविना राजाने त्यावर विश्वास ठेवू नये. तिरुवळ्‌ळुवरच्या या सूचना आजही सर्व गुप्तचरसंघटनांना मार्गदर्शक ठरतील. 

उलट कौटिल्यप्रणीत गुप्तचरपद्धती मात्र अंगावर शहारे आणणारी आहे. सर्वंकष संशय हाच तिचा आत्मा आहे. तिरुवळ्‌ळुवरच्या मते एकाच प्रकारची बातमी दोन गुप्तचरांनी स्वतंत्रपणे आणल्यास तीवर विश्वास ठेवायला प्रत्यवाय नसतो पण कौटिल्य मात्र तीन गुप्तचरांकडून शहानिशा करून घेतल्यावाचून कोणत्याही बातमीवर विश्वास टाकू नये, असाच सल्ला देतो. राजपुत्र, अंतःपुर, अमात्यमंडळ यांच्यासकट राज्यातील सर्व गटांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर नेमायला हवेच, असा कौटिल्याचा स्पष्ट अभिप्राय आहे. गुन्हे शोधून काढण्यासाठी आवश्यक ती माहिती तर गुप्तचरांनी गोळा करायलाच हवी, त्याशिवाय त्यांनी इतरही नानाविध कामगिऱ्या पार पाडल्या पाहिजेत : राजाची ठिकठिकाणी खरीखोटी प्रशंसा करून त्याला लोकप्रियता प्राप्त करून द्यावी. खजिन्यात पैशाचा तुटवडा पडल्यामुळे राजाला प्रजेकडून निधी हवा असल्यास तो वसूल करण्यासाठी गुप्तचरांनी साम, दाम, दंड, भेद इत्यादींचा प्रयोग करून, किंबहुना अवश्य तर फसवणुकीचाही मार्ग चोखाळून जनतेला पिळून काढावे. राजाच्या प्रकट शत्रूंवर तर गुप्तचरांची बारीक नजर हवीच पण वेळप्रसंग पडल्यास कोण राजाचे शत्रू बनण्याचा संभव आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी लोकांची परोपरीने पारख करावी. यासाठी एखाद्याला राजाविरुद्ध चिथवावे आणि तो त्या चिथावण्याच्या आहारी गेल्यास त्यास राजाचे संभाव्य वैरी मानून लागलीच शासनही करावे. कौटिल्याच्या या चौकटीत चपखल बसणारा गुप्तचर अर्थातच हरहुन्नरी असायला हवा. म्हणूनच गुप्तचराची निवड कशी करावी, याची सविस्तर माहिती त्याच्या अर्थशास्त्रात दिलेली आढळते. संन्यास घेऊनही संसाराचे मोहपाश तोडता न आल्यामुळे फिरून गृहस्थाश्रमी बनलेले उदास्थित, व्यापारधंद्यात दिवाळे निघालेले वैदेहिक, शेतीत फटका बसलेले गृहपतिक इत्यादींना द्रव्याचे सहाय्य करून त्यांचे संसारात, व्यापारधंद्यात किंवा शेतीत पुनर्वसन करावे आणि मग त्यांना गुप्तचर म्हणून राबवावे. द्रव्यलोभी, तापसांना मठ स्थापून द्यावेत, दुसऱ्यांच्या पोटात शिरून गुप्त माहिती काढून घेण्यात वाकबगार असलेल्या चलाख विद्यार्थ्यांची नेमणूक ‘कापटिक गुप्तचर’ म्हणून करावी. गारुडी, हस्तसामुद्रिक जाणणारे, ज्योतिषी, मांत्रिक, वशीकरणपटू यांसारख्या उपजीविकेचे स्थिर साधन नसलेल्या भटक्या लोकांना ‘सत्री’ म्हणजे अज्ञात स्थळी राहणारा कर्मचारी, म्हणून नियुक्त करून माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धाडून द्यावे. प्रसंगी विषप्रयोग करायलाही कचरणार नाहीत, अशांना ‘रसद गुप्तचर’ म्हणून नियुक्त करावे. बक्षिसाच्या लोभाने वाघ, हत्ती यांसारख्या हिंस्त्रपशूंशीही झुंज देणाऱ्या निधड्या छातीच्या लोकांतून ‘तीक्ष्णसंज्ञक’ हेर निवडावेत, अंतःपुरावर आणि अमात्य मंडळावर नजर ठेवण्याच्या कामासाठी हुशार वा वय झालेल्या गणिका आणि दरिद्री व धीट विधवा हेर म्हणून योजाव्यात, अशा सूचना कौटिल्याने आपल्या ग्रंथात केलेल्या आहेत.

राजाच्या जोडीला अमात्य, राजस्व-अधिकारी आणि नागरी व ग्रामीण विभागातल्या तसेच खेडेगावच्या पोलीस अधिकाऱ्यांनादेखील गुप्तचर नेमण्याचा अधिकार कौटिल्याने दिलेला आहे. गुप्तचरांनी कोणत्या प्रसंगी कशा प्रकारे वेषांतर करावे ज्योतिषी, व्यापारी, शेतकरी, चोर, भिक्षुक इ. असल्याची बतावणी कशी पार पाडावी वेडा, पांगळा, अर्धवट बहिरा, मुका, आंधळा इत्यादिकांची सोंगे कशी सजवावी एखाद्या घरात प्रवेश मिळविण्यासाठी किंवा तिथून निसटण्यासाठी काय काय क्लृप्त्या लढवाव्या यांविषयीच्या सूचनाही कौटिल्याने बारकाव्याने दिलेल्या आढळतात. काढलेली माहिती योग्य स्थळी बिनबोभाट पोहोचती करणे, हे गुप्तचरी कामगिरीचे महत्त्वाचे अंग ठरते. त्यासाठी ठराविक वेळी एकांतात भेटी घेणे, हस्ते-परहस्ते सांकेतिक भाषेतली पत्रे रवाना करणे, शिकवून तयार केलेल्या पाळीव कबुतरांचा उपयोग करून घेणे इ. मार्ग कौटिल्याने सुचविलेले आहेत.

आपला शेजारी गुप्तचर तर नसेल, या शंकेने धास्तावलेला राहून एकाही प्रजाजनाने राजाविरुद्ध अवाक्षरही काढू नये, यासाठी एवढी प्रचंड यंत्रणा उभारून लोकांची परोपरीने पारख करणे, हे कौटिल्याला अत्यावश्यक वाटले. यावरून तत्कालीन राजकीय परिस्थिती पराकाष्ठेची अस्थिर असावी असे दिसते. परंतु संशयपिशाचाने भारून गेल्यामुळे आखलेली ही सर्वंकष योजना संपूर्णपणे प्रत्यक्षात उतरवता आली असेल, असे मात्र वाटत नाही कारण ती तशी व्यवहार्य दिसत नाही. विशाखादत्तचे मुद्राराक्षस  नाटक कौटिल्याने म्हणजे चाणक्याने वर्णिलेल्या राजकीय उलथापालथीवरच आधारलेले आहे. परस्पर शंकाकुशंकांनी गढुळलेल्या वातावरणाची परिसीमा त्यात गाठलेली आहे. संशयखोरपणातून जन्माला आलेल्या स्वतःच्या कल्पना निरंतर व्यवहार्य ठरणार नाहीत, याची जाणीव असल्यामुळेच बहुधा चंद्रगुप्ताच्या महामात्यपदाचे दायित्व स्वतःकडे घेण्याचे टाळून ते पराभूत नंदराजाचा अमात्य राक्षस याच्या गळ्यात युक्तिप्रयुक्तीने बांधण्याची योजना चाणक्याने आखली असावी.


कौटिल्याप्रणीत गुप्तचरयंत्रणा आजही दोन दृष्टींनी उपयुक्त ठरते. एक तर त्याने केलेल्या काही सूचना आजच्या गुप्तचरांनासुद्धा उपयोगी पडण्यासारख्या आहेत. दुसरे म्हणजे कौटिल्याने सिद्ध केलेला हा आराखडा नानाविध हुकूमशाही राजवटींतल्या गुप्तचरयंत्रणांशी अत्यंत मिळताजुळता असाच आहे. अद्ययावत शास्त्रीय संशोधनाच्या उपयोगाचा भाग वगळता आधुनिक युगातल्या हुकूमशाही राष्ट्रांच्या गुप्तचरयंत्रणादेखील कौटिल्यप्रणीत योजनांचाच अनेत बाबतींत अवलंब करताना दिसतात. आधुनिक हुकूमशाही राष्ट्रांतील गुप्तचरांना अशीच अमर्याद सत्ता गाजवता येते. विशिष्ट राजवट अबाधित असेल, तोपर्यंत त्यांना कोणीही जाब विचारू शकत नाही. कौटिल्याने या गुप्तचरांना ‘गूढपुरुष’ किंवा ‘चार’ हे नाव दिले आहे. दक्षिण भारतातील प्राचीन गुप्तचर ‘संचारक’ या नावाने ओळखले जात.

मुसलमान सुलतानांचे राज्य दिल्लीस प्रस्थापित झाल्यावर त्यांनीही कार्यक्षम गुप्तचरयंत्रणा उभारली. गुप्तचर नेमण्याचे अधिकार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविलेले होते. राजाची पत्रे सांडणीस्वारामार्फत धाडण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. या टपालासाठी जागोजागी निरनिराळे अधिकारी नेमलेले असत. गुप्तचरांनाही रोज आपले गुप्त अहवाल पाठविण्याची सोय असे. ही गुप्तचरयंत्रणा साम्राज्य नष्ट होईतो व्यवस्थितपणे कार्य करीत होती.

ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली, तेव्हा देशांतर्गत परिस्थितीची माहिती काढण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी उपकारक ठरणाऱ्या गुप्तचरसंघटनेचा या नव्या राज्यकर्त्यांना थोडादेखील अनुभव नव्हता. परंपरागत पोलीस दल आणि गुप्तचरसंघटना दोन्ही त्या वेळेला जवळजवळ ढासळलेल्याच होत्या. म्हणूनच पोलीसयंत्रणा उभारण्याचे नानाविध प्रयोग ईस्ट इंडिया कंपनीला जवळजवळ दोनशे वर्षे करीत रहावे लागले. गुप्तचरसंघटनेचा उपयोग करून घेण्याची कल्पना प्रथम १८०८ साली चोवीस परगण्याच्या जिल्हा न्यायाधीशाला सुचली, कारण पोलीस अधीक्षकाची जादा जबाबदारीही त्याच्यावरच होती. त्या वेळी ठग व पेंढारी यांनी जिकडे तिकडे धुमाकूळ घातला होता. विद्यमान पोलीसयंत्रणा तर अगदीच निकामी ठरली होती. शेवटी ठगांतील आणि पेंढाऱ्यांतीलच काहींना त्यांनी ‘गोएंदा’ किंवा बातमीदार म्हणून नेमले. पुढे पेंढाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी कर्नल स्मिथच्या हाताखाली स्वतंत्र दलही उभारण्यात आले. पकडलेल्या आणि शिक्षा झालेल्या कित्येक पेंढाऱ्यांना माफी देऊन स्मिथने त्यांना गोएंदा म्हणून नोकरीवर घेतले. ही युक्ती पूर्णपणे सफल होऊन ठगांच्या आणि पेंढाऱ्यांच्या धुमाकूळाला अल्पावधीतच आळा बसला. या यशावरून धडा घेऊन बहुतेक सर्वच भारतीय पोलीस दलांनी जागोजागी गुन्हेगारांचीच गुप्तचर म्हणून नेमणूक केली.

राजकीय घडामोडींची माहिती गोळा करण्यासाठी आपल्याजवळ चांगली संघटना नसल्याचे १८५७ च्या उठावानंतरच सरकारच्या ध्यानात आले. तरीही काही वर्षे ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना राजकीय, सामाजिक आणि धार्मिक चळवळींवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकार वरचेवर करीत राहिले. पुढे तर राष्ट्रीय चळवळीचा उदय, वर्तमानपत्रांनी चालवलेला सरकारविरोधी प्रचार, वरचेवर येणारा दुष्काळाचा फेरा आणि शेतकऱ्यांनी उभारलेली सावकारविरोधी बंडे यांपायी सरकारला अगदी कोंडीत सापडल्यासारखे झाले. मग मात्र प्रत्येक सचिवालयात एक स्वतंत्र शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक चळवळी, वृत्तपत्रांत वा इतरत्र प्रसिद्ध झालेला मजकूर इत्यादींचा बारीक अभ्यास करणे, लोकांत फैलावलेल्या बातम्यांचा माग काढणे, भारतीय वा परदेशी व्यक्तींवर आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे, एतद्देशीय संस्थानातील संशयास्पद घडामोडींचे अहवाल तयार करणे, चोरून शस्त्रास्त्रे बनवणाऱ्यांवर पाळत राखणे, दुष्काळी परिस्थितीची पाहणी व चिकित्सा करणे इ. कामांची जबाबदारी या नव्या शाखांवर टाकण्यात आली. १८८८ साली प्रत्येक प्रांतिक सचिवालयातल्या प्रमुख सचिवाच्या विभागात अशा विशेष शाखा उघडण्यात आल्या.

१९०२ साली लॉर्ड कर्झनने नवीन पोलीस आयोग नेमला. साऱ्या देशाचा दौरा करून विविध श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि इतर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यावर गुप्तचरव्यवस्थेसंबंधी काही निष्कर्ष या आयोगाने सादर केले. त्वरित दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्यापासून गुन्हेगार दूरदूरच्या जिल्ह्यांत संचार करून गुन्हे करू लागल्याचे चौकशीत निदर्शनास आले होते. दरोडेखोरांच्या टोळ्या दूरवर जाऊन डाके घालू लागल्या. स्थानिक पोलिसांजवळ फक्त स्थानिक गुन्हेगारांचीच माहिती असल्यामुळे या नव्या गुन्ह्यांचा यशस्वी शोध करणे, अडचणीचे होऊन बसले. औद्योगिक व व्यापारी क्षेत्रांत विशेष प्रगती झालेली असल्याने विविध क्षेत्रातील तज्ञांच्या अभावी खोटी नाणी पाडणे, दस्तऐवजात फेरफार करून अवाढव्य रकमांचा अपहार करणे, यांसारख्या गुन्ह्यांचा तपास करण्यात यश येणे जवळजवळ अशक्यच होऊन बसले. याच सुमारास बोटांच्या ठशांवरून व्यक्तीची ओळख पटविण्याच्या प्रगत झालेल्या शास्त्रात वाकबगार असलेल्या तज्ञांच्या साहाय्याची निकड भासू लागली. त्या दृष्टीने प्रत्येक प्रांतात स्वतंत्र गुन्हासंशोधनखाते स्थापन करण्याची व त्यात कर्तृत्ववान पोलीस अधिकाऱ्यांची आणि निष्णात तज्ञांची गुप्त पोलीस म्हणून भरती करावी, अशी शिफारस वरील आयोगाने केली. या अधिकाऱ्यांनी व तज्ञांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील गुन्हे, गुन्हेगार आणि त्यांचे गुन्हे करण्याचे तंत्र, यांची नोंद ठेवून गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांना उपयुक्त सूचना द्याव्यात, गुन्हेगार टोळ्यांनी दूरदूरच्या जिल्ह्यांत जाऊन केलेल्या गुन्ह्यांची तसेच ज्यांच्या तपासाला तज्ञाचे साहाय्य लागणार असेल अशा गुन्ह्यांची चौकशी त्यांनी स्वतःच करावी, सर्व प्रांतांतील गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांचा संग्रह करून ठेवावा इ. शिफारशीही या आयोगाने केल्या. इंग्लंडमध्ये लंडन शहरासाठी असे गुन्हा-अन्वेषण खाते यापूर्वीच स्थापन करण्यात आलेले होते. त्याच धर्तीवर भारतातही गुन्हा-अन्वेषण खाते सुरू करण्याचीच ही योजना होती.


निरनिराळ्या जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखतींतून प्रस्तुत आयोगाला असे आढळून आले, की जिल्ह्याबाहेरील राजकीय, सामाजिक वा धार्मिक उलाढालींची या अधिकाऱ्यांना मुळीच माहिती नव्हती. त्यामुळे १८८८ साली प्रत्येक सचिवालयात उघडलेल्या खास शाखा या नव्या गुन्हा-अन्वेषण खात्यात विलीन करून गुन्ह्यांच्या तपासाच्या जोडीला इतर घडामोडींच्या अभ्यासांचेही काम या खात्याकडे सोपवावे व पोलीस उपमहानिरीक्षक त्या खात्यात प्रमुख असावा, अशी सूचना करण्यात आली. अशी गुन्हा-अन्वेषण खाती प्रत्येक प्रांतात १९०६ साली स्थापन करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील गुन्हाअन्वेषण शाखा उघडून ती पोलीस अधीक्षकाच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचीही सूचना आयोगाने केली होती. तीही मान्य करून पोलीस खात्यातील काही कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम करणारे गुप्तचर म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढील चाळीस वर्षात गुन्हा-अन्वेषण खात्याचा व्याप खूपच वाढला. केंद्र सरकारनेही आपली स्वतंत्र शाखा उघडून तिची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविली. गुन्ह्यांच्या तपासात अधिक कार्यक्षमता येण्याच्या दृष्टीने शास्त्रीय साधनांचा उपयोग तपासासाठी करून घेण्याच्या दिशेनेही पावले टाकण्यात आली. गुन्हा-अन्वेषण खात्याच्या प्रांतोप्रांतीच्या शाखा राजकीय उलाढालींचा साप्ताहिक अहवाल तयार करू लागल्या. ऐतिहासिक कागदपत्रे या नात्याने अशा अहवालांना खास महत्त्व असते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकशाही आली. तिने बहाल केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य यांसारख्या मूलभूत हक्कांमुळे राजकीय कार्यात प्रचंड वाढ झाली. पूर्वी साम्राज्यरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष शाखा आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने माहिती गोळा करू लागल्या. परकी राष्ट्रांच्या हेरांचा शोध लावून त्यांविरुद्ध उपाययोजना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. कायदा आणि सुव्यवस्था यांना सुरुंग लावणाऱ्या राजकीय उलाढालींत वाढ झाल्यामुळे नव्या समस्या उद्‌भवू लागल्या. त्यामुळे राज्यातील खास शाखांवर वेगळे उपमहानिरीक्षक नेमावे लागले. केंद्र सरकारच्याही शाखेत ठळक फेरफार झाले. राजकीय उलाढाली आणि राष्ट्रीय संरक्षण यांसाठी एक आणि आंतरप्रांतीय गुन्हे, महत्त्वाचे ठरणारे गुन्हे आणि लाचलुचपतीचे गुन्हे यांच्या तपासासाठी दुसरी, अशा वेगवेगळ्या संघटना उभारण्यात आल्या. दुसऱ्या संघटनेकडे शास्त्रीय साधनांचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने पोलीस संघटनांना प्रशिक्षण देण्याचीही जबाबदारी आली. देशाच्या औद्योगिक आणि सर्वसाधारण प्रगतीमुळे कर चुकविणे, काळा पैसा साठवणे, मालाची चोरटी आयात करणे, परकी चलनाचा दुरुपयोग करणे यांसारख्या आर्थिक गुन्ह्यांतही वाढ झाली. त्यांचा माग काढण्यासाठी अर्थखात्यानेही सर्वंकष गुप्तचरयंत्रणा उभारली आहे. तात्पर्य, आज केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळ्या गुप्तचरयंत्रणा काम करीत असतात : एक, गुन्हे शोधून काढण्यासाठी दुसरी, राजकीय उलाढालींचा अभ्यास आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी टेहेळणी करण्यासाठी आणि तिसरी, लाचखोरीला आळा घालण्यासाठी. अशा यंत्रणा बहुतेक सर्व राज्यांतही आहेत. विविध खात्यांतील सरकारी कर्मचारी तर त्यांत काम करतातच पण भरीला खाजगी व्यक्तींचाही उपयोग करून घेण्यात येतो.

बहुतेक सर्व पाश्चात्य देशांतील गुप्तचर संघटनाही थोड्या फार फरकाने वर वर्णन केलेल्या भारतीय संघटनेसारख्याच असतात. अन्य राष्ट्रांत विशेषतः हुकूमशाही राष्ट्रांतही अशा संघटना असतात पण त्यांचे कार्यक्षेत्र आणि अधिकारी दोन्हीही अधिक व्यापक असतात. तेथे वैयक्तिक स्वातंत्र्याला वावच नसल्याने गुप्तचरसंस्थांच्या प्रमुखांना अनियंत्रित अधिकार दिलेले असतात. त्या सर्वांवर कौटिल्यप्रणीत गुप्तचरव्यवस्थेची छाप थोडीफार पडलेली दिसते.

पहा : गुन्हातपासणी गुन्हाशोधविज्ञान गुप्तलेखनशास्त्र गुप्तवार्ता पोलीस.

नगरकर, व. वि.