गुदामव्यवस्था : आधुनिक शास्त्रीय पद्धतींनी शेतमालाची सुरक्षित साठवण करण्याची व्यवस्था. अशी साठवणाची व्यवस्था गुदामे व वखारी यांमधून केली जाते. यांनाच कृषिभांडागारे असेही म्हणतात. गुदामव्यवस्था ही प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. फिनिशियन राज्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांकरिता अनेक भांडागरे (गुदामे) बांधली होती. मध्ययुगीन काळात व्हेनिस व जेनोआ ह्यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक भांडागरे उभारण्यात आल्याचे आणि त्यांद्वारा वाणिज्यव्यवहार केले जात असल्याचे उल्लेख उपलब्ध आहेत. एकावेळी बरेचसे उत्पादन होणे आणि वर्षातून एका पिकाचे एकदा किंवा फार तर दोनदा उत्पादन होणे, ही शेतीउत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे शेतमालाचा पुरवठा वर्षातून एकदा किंवा दोनदा मोठ्या प्रमाणावर होतो. औद्योगिक उत्पादकाला किंवा ग्राहकाला शेतमालाची गरज मात्र वर्षभर साधारणपणे सारखी असते. शेतमालाच्या मागणी व पुरवठ्यातील या तफावतीमुळे जशी गिऱ्हाइकाची अडचण होते तशी, किंबहुना तीपेक्षा जास्त, शेतकऱ्याची होते. सुगीच्या वेळी सर्वांचाच माल तयार झाल्याने बाजारातील आवक वाढते व त्यामुळे भाव पडतात. अशा वेळी काही घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात. साठविलेला माल पुढे ते चढत्या भावाने विकतात म्हणजे गिऱ्हाइकाला द्याव्या लागणाऱ्या किंमतीचा काही हिस्साच प्रत्यक्ष उत्पादकाच्या पदरात पडतो व मधला गाळा घाऊक व्यापाऱ्याला मिळतो. 

बाजारपेठेच्या या चढउतारापासून स्वतःचे संरक्षण करण्याची शेतकऱ्याला इच्छा असते. आपला सर्व माल एकदम न विकता बाजारभाव पाहून विकला, तर चांगली किंमत मिळेल, हे त्याला माहीत असते पण तसे करण्यात दोन प्रमुख अडचणी येतात. एक तर एकदम तयार झालेला इतका मोठा माल साठवून ठेवायला पुरेशी जागा नसते. शेतीमाल हा कमीअधिक प्रमाणात नाशवंत असल्याने हवापाणी, उंदीर-घुशी, किडे-मुंग्या यांपासून संरक्षण होऊ शकेल, अशा प्रकारची साठवणाची व्यवस्था करणे खर्चाचे काम असते व साठा आपल्या घरी किंवा गावी ठेवणे, हे बाजारपेठेतील परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने तितकेसे फायद्याचे नसते त्यासाठी बाजारपेठेच्या जवळच अशा संरक्षित साठवणाची व्यवस्था व्हायला हवी. 

शेतकऱ्याची दुसरी अडचण असते ती पैशाची. भारतातील बहुसंख्य शेतकरी छोटे व मध्यम आहेत. हातात पीक येईपर्यंत त्यांची आर्थिक तंगी वाढलेली असते. प्रापंचित गरजा भागविण्यासाठी पीक हातात आल्याबरोबर ते विकून पैसा करण्याची त्यांना घाई असते. बाजारभाव अनुकूल होईपर्यंत वाट पाहायची झाल्यास, मालाच्या आधारावर त्यांना कर्ज किंवा उचल मिळण्याची सोय होणे अनिवार्य ठरते. बँका असा व्यवहार करतात पण त्यांच्या शाखा विशेषतः शहरात असतात. आपल्याकडील शेतकऱ्यांचे अज्ञान आणि गरिबी लक्षात घेता, त्यांना बॅंकांशी अशा प्रकारचा व्यवहार करणे कठीण जाते. बाजारपेठेतील अडते आणून टाकलेल्या शेतमालावर उचल देतात पण सात-आठ दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना तो माल ठेवता येत नाही. साठवण्याच्या जागेची त्यांनाही अडचण असते.  भारतात साठवणाची एक सोय परंपरेने चालत आली आहे ती म्हणजे पेवाची. खेडेगावात कोरडी जागा असेल त्या भागात जमिनीत फार मोठा खड्डा करून त्याचे तोंड निमुळते ठेवलेले असते. ज्वारी, गहू, बाजरी यांसारखी धान्ये त्यात ठेवून तोंड बंद करतात. नीट काळजी घेतल्यास तीनचार वर्षे ते धान्य टिकते पण या पद्धतीत अडचणी आहेत. त्या अशा : (१) पेव एखाद्या मोठ्या शेतकऱ्याच्या मालकीचे असते व तो इतरांचा माल ठेवून घेण्यास नाखूष असतो. (२) पेव हे खेड्यात म्हणजेच बाजारपेठेपासून लांब असल्याने बाजारभावाचा तात्काळ फायदा घेण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. गावातल्या गावात अडचणीच्या काळासाठी या साठवणाचा उपयोग होऊ शकतो. 

शेतमालाच्या मागणीचा सुयोग्य फायदा घेऊन आपल्या मालाला जास्तीत जास्त किंमत मिळविण्याच्या मार्गातील या अडचणी इतर देशांतील शेतकऱ्यांनाही आल्या. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा वगैरे देशांत या अडचणी दूर करण्याचे जे प्रयत्न झाले, त्यांतूनच कृषिभांडागाराची कल्पना विकसित झाली. शेतमालाची प्रत बिघडू न देता विज्ञानाच्या साहाय्याने तो साठविण्याची योग्य ती व्यवस्था करणे, एकेका शेतकऱ्याने आणून ठेवलेल्या मालाची पावती त्याला देणे आणि तो मागेल त्यावेळी साठवणाचे भाडे घेऊन त्याचा माल त्याला परत देणे , अशा कामांसाठी कृषिभांडागारे बांधली गेली. काही खाजगी व्यक्तींनीही अशी भांडागारे चालविली, तर काही सहकारी संस्थांनी सुरू केली. भांडागारांत वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा माल एकत्र मिसळला जात असल्याने प्रतवारी करण्याची सुरुवातीला विशेष दक्षता घ्यावी लागते. किडेमुंग्यांपासून संरक्षण होण्यासाठी औषधाचे फवारे मारणे, यांसारखी व्यवस्थाही या भांडागारांतून होऊ लागली. तसेच मोठ्या प्रमाणावर सोयी झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याला माफक खर्चात भांडागारांचा उपयोग करून घेणे शक्य झाले. 

या भांडागारांत ठेवलेल्या मालाच्या पावतीच्या तारणावर कर्जे देणे बँकांनी सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांची दुसरीही अडचण दूर झाली. भांडागाराच्या पावतीला कायदेशीर रूप देण्यासाठी बहुतेक देशांत कायदे केलेले आढळतात. अमेरिकेत ‘वेअरहाऊस रिसीट्स ॲक्ट’ हा कायदा प्रचलित असून इंग्लंडमध्ये १८८९ च्या ‘फॅक्टर्स ॲक्ट’ या कायद्यात भांडागार-पावतीविषयीच्या तरतुदी आहेत. या कायद्यान्वये भांडागारे चालविणाऱ्या व्यक्तीवर अथवा संस्थेवर आवश्यक ते निर्बंध लादण्यात आले आहेत. 

कालांतराने भांडागार-पावतीला परक्राम्य पत्राचेही स्वरूप आले. म्हणजे असे की, ज्या शेतकऱ्याने माल भांडागारात ठेवला असेल, त्याने तो माल विकताना भांडागारातून स्वतः काढून घेण्याची गरज नसते. ज्याला माल विकला, त्याच्या नावाने ती भांडागार-पावती बेचन करून देण्यात येते. तो खरेदीदार परस्पर भांडागारात जाऊन आधीच वजन करून ठेवलेला माल ताब्यात घेऊ शकतो. मात्र अशी सूचना मूळ मालकाने भांडागाराला व्यवस्थापकास द्यावी लागते. या प्रथेमुळे व्यवहाराची सुलभता खूपच वाढली आहे. 

सार्वजनिक गुदामांचे त्यांत साठविण्यात येणाऱ्या वस्तूंनुसार, अनेकविध प्रकार आहेत. सर्वसाधारण व्यापारी माल व गृहोपयोगी वस्तू साठविण्यासाठी गुदामे बांधण्यात येतात नाशिवंत अन्नमाल साठविण्याकरिता प्रशीतित गुदामे उपयोगात आणतात कापूस, लोकर, तंबाखू, अन्नधान्ये आणि बटाटे यांसारख्या शेतमालासाठी बांधण्यात येणाऱ्या भांडागारांना उच्चालक (एलिव्हेटर) असे म्हणतात पेट्रोलियम, वनस्पति-तेले यांसारखे द्रवपदार्थ साठविण्याकरिता विशेष प्रकारची भांडागारे उपयोगात आणतात. 

धान्य साठवण : धान्य साठवणीच्या बाबतीत दोन प्रकार आहेत : (१) लहान प्रमाणावरील साठवण, (२) मोठ्या प्रमाणावरील साठवण. हे दोन्ही प्रकार भारतात प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. लहान प्रमाणावरील साठवणीत मुख्यतः पोती, मातीची भांडी, कणग्या, तांब्या-पितळेचे डबे, पत्र्याची पिंपे वगैरे साधनांचा वापर करतात. भाताच्या प्रदेशात लहान प्रमाणावर माल साठविण्यासाठी कणगे (बांबूच्या पट्ट्यांपासून बनविलेले) आणि कोठारे वापरण्याचा प्रघात जास्त आहे. मोठ्या प्रमाणावरील साठवणीकरिता पेव (बळद), सायलो किंवा खट्टी यांसारख्या साधनांचा उपयोग करण्यात येतो. यातही (१) जमिनीखालची साठवण आणि (२) जमिनीच्या पृष्ठभागावरील साठवण असे दोन प्रकार आढळतात. जमिनीखालच्या साठवण-पद्धतीत पेव, खट्टी किंवा सायलो यांचा उपयोग करतात. पेव म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जमिनीत, विशिष्ट आकाराचे, जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही असे तयार केलेले तळघर. त्यात साठवावयाचे धान्य भरून झाल्यावर त्याचे तोंड सीलबंध करतात. धान्य बाहेर काढण्याच्या वेळी, पेवाचे तोंड मोकळे करून बराच वेळपर्यंत तसेच उघडे ठेवून पेवात बाहेरची मोकळी हवा मिसळू देतात त्यायोगे पेवातील दूषित हवा सुधारते. त्यानंतरच धान्य काढण्याकरिता माणसांना पेवात उतरविले जाते. पेवात दूषित हवा असेतोवर धान्य काढण्याचे काम त्यातील जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन केले जात नाही. सायलो प्रकारात जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत विहिरीसारखा गोल खड्डा खणतात किंवा जमिनीवर दंडगोलाकार वा घुमटाकार बांधकाम करतात. त्याच्या भिंती आणि तळजमीन सिमेंट काँक्रीटची व तोंडावरील झाकण सीलबंद असते. यामधूनही धान्य काढताना पेवाप्रमाणेच काळजी घ्यावी लागते. पेव व खट्टी या प्रकारच्या साधनांत ठेवलेले धान्य पुष्कळ काळ चांगले टिकते. आतील हवा मोकळी व खेळती नसून मर्यादित व कोंडलेली असल्याने किडींना पोषक असा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्याचप्रमाणे आतील तपमानही स्थिर असते. या दोन्ही कारणांमुळे कीटकांची वाढ होत नाही व परिणामी धान्याचा नाश होत नाही. जमिनीवरील साठवणीसाठी पोती, कोठारे, हवाबंद गुदामे, सायलो यांचा उपयोग करतात.


 

धान्य साठवणीतील अडचणी : साठवणीतील धान्यावर पडणाऱ्या किडी, बुरशी, उंदीर-घुशी यांसारखे प्राणी यांयोगे धान्याची अपरिमित नासधूस होत असते. भारतात धान्य साठवणीत सु. ४० प्रकारच्या किडी आढळतात. त्यांपैकी १४ प्रमुख व उर्वरित दुय्यम प्रकारच्या असतात. या किडींमुळे सु. १०% पर्यंत धान्याचे नुकसान होते. प्रमुख किडींमध्ये टोके, सुरसे, लघुभुंगेरे, खाप्राभुंगेरे इत्यादींचा समावेश होतो. दुय्यम किडींत पिठातील तांबडे भुंगेरे, लांबट डोक्याचे भुंगेरे इ. मोडतात. त्यांच्यामुळे पिठात वा रव्यात जाळी निर्माण होते. सर्वसाधारणतः प्रमुख किडी साठवणीतील पुष्कळसे धान्य खाण्यासाठी पोखरून त्याचा भुगा करतात. त्यामुळे एकूण धान्याचे पोषणमूल्य कमी होते. खाप्राभुंगेरे ही कीड धान्याचा फक्त बीजकोश खाते. त्यायोगे बेण्यासाठी साठवण केलेले धान्य बियाण्याकरिता निरुपयोगी बनते. किडींच्या प्रादुर्भावामुळे साठवणीतील धान्यामधील तपमान वाढते. त्याने धान्यातील अंगभूत ओलाव्याचे बाष्पीभवन होऊन ती वाफ धान्याच्या पृष्ठभागी येताच, तेथे तिचे पाण्यात रूपांतर होऊन त्या पाण्याने धान्याचा थर भिजून त्यावर बुरशी वाढते. त्यामुळे धान्य कुजून त्याची पेंडीसारखी खापरे बनतात, धान्याला कुबट वास मारतो आणि ते खाण्यास निरुपयोगी बनते. साठवणीतील धान्यावर कीड पडण्यास मुख्यतः धान्यातील अंगभूत ओलावा आणि धान्यराशीतील तपमान कारणीभूत असते. साधारणतः हवेतील ओलावा ६९-७० टक्के व दाण्यातील अंगभूत ओलावा १०–१२ टक्के आणि उष्णतामान २१–३२ से. या दोन कारणांमुळे साठ्यात कीड पडल्यास तिची वाढ जलद व विस्तृत प्रमाणावर होते. साठवणीमधील धान्याची योग्य काळजी सुरुवातीलाच न घेतल्यास उंदीर-घुशी हे प्राणी धान्याची फार नासाडी करतात. 

धान्य साठवणीतील  खबरदारी : (१) धान्य साठविण्यासाठी वापरावयाची साधने, धान्य भरण्यापूर्वी, काटेकोरपणे साफ करून घेणे अगत्याचे असते. जरूर तर धुरी देऊनही ती निर्दोष करून घेतात. (२) साठविण्याचे धान्य भारतामध्ये उन्हात शक्य तितके खडखडीत वाळवून घेतात पाश्चात्य देशांत ते कृत्रिम उष्ण हवेच्या झोताने वाळवितात. साठवण करण्याच्या धान्यातील अंगभूत ओलावा ८ टक्क्यांहून कमी असावा लागतो. १०-१२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास त्या धान्यात कीड पडून तिचा झपाट्याने प्रसार होतो. (३) साठवणीची जागा पावसाळ्यातही ओल न येणारी (कोरडी) असावी लागते. धान्याच्या साठवण–साधनांच्या तळजमिनीला ओल येण्याचा संभव असल्यास, धान्य पोत्यांत भरून ती पोती लाकडी घडवंचीवर रचतात. (४) हवाबंद गुदामे बांधून उंदीर-घुशींना गुदामात शिरता येणार नाही अशी व्यवस्था करतात. गुदामाची तळजमीन गुदामाबाहेरील जमिनीच्या पातळीपेक्षा उंच ठेवतात. गुदामातील हवेचे नियंत्रण करता येईल अशी व्यवस्था करतात. त्यामुळे किडींची उत्पत्ती रोखली जाते आणि साठवणीतील धान्य पुष्कळ काळ सुरक्षित राहते. गुदामाच्या जमिनीवर धान्य मोकळे पसरून किंवा पोत्यात भरून त्यांच्या थप्प्या लावून साठवण करतात. मोकळे धान्य साठविताना खबरदारी म्हणून गुदामाच्या जमिनीवर ३०० गेज जाडीचा पॉलिथिलीनचा कागद पसरून त्यावर धान्य साठवितात. त्यायोगे ओलीमुळे होणाऱ्या धान्याच्या नुकसानीचा धोका टाळता येतो. (५) धान्य साठवणीसाठी नवी कोरी पोती वापरणे चांगले. जुनी पोती वापरणे भाग पडल्यास ती नीट काळजीपूर्वक साफ करून, उन्हात वाळवून वापरणे सोईचे असते. धान्य भरलेली पोती गुदामात रचून ठेवताना भिंतीपासून ७५ सेंमी. अंतर सोडून त्यांच्या उंच थप्प्या लावतात. दोन थप्प्यांमध्ये ७५ सेंमी. अंतर सोडतात. त्यामुळे गोदामातील हवा खेळती राहते त्याचप्रमाणे पोत्यांतील धान्यांची वारंवार तपासणी करणे, पोत्यांवर कीटकनाशके मारणे यांसारख्या क्रिया गुदामात सुलभतेने करता येतात. (६) काही प्रसंगी पीक शेतात उभे असतानाच दाण्यावर कीड पडते. अशा प्रकारचे धान्य साठविण्यापूर्वी त्याला धुरी द्यावी लागते. 

उपाययोजना : वरीलप्रमाणे खबरदारी घेऊनही जर काही कारणांमुळे पोत्यात कीड पडल्याचे तपासणीत आढळून आले, तर लगेच उपाययोजना करण्यात येते. तपासणीत एक किग्रॅ. धान्यात एकूण कीटकसंख्या दहापर्यंत असल्याचे आढळल्यास त्या धान्यसाठ्याला कीटकनाशक धुरी देतात. महत्त्वाची कीटकनाशके कार्बन डायसल्फाइड, एथिलीन डाय क्लोराइड व टेट्राक्लोराइडचे मिश्रण (इडीसीटी मिश्रण) आणि मिथिल ब्रोमाइड अशी आहेत. कार्बन डायसल्फाइड फार ज्वालाग्राही असते. ते फार काळजीपूर्वक वापरावे लागते. ते ४६४ ग्रॅ. किंवा इडीसीटी मिश्रण १,१३६ ग्रॅ. दर २.८२ घ.मी. जागेसाठी वापरून ४८ तासांपर्यंत धुरी देतात. मिथिल ब्रोमाइड दर १०० घ.मी.ना ३ किग्रॅ. याप्रमाणे वापरून पोती ५-६ तास तशीच झाकून ठेवतात. अशी धुरी बियांच्या धान्यसाठ्याला देत नाहीत, कारण तिचा बीजांकुरावर वाईट परिणाम होतो. याशिवाय हायड्रोजन फॉस्फाइड हे फॉस्टॉक्सिन नावाने वड्यांच्या रूपात मिळते. ते दर टन धान्यास दोन वड्या याप्रमाणे वापरतात. धान्य पुष्कळ काळपर्यंत साठवून ठेवावयाचे असल्यास त्याला पहिली धुरी पावसाळ्यापूर्वी, दुसरी पावसाळ्यानंतर आणि तिसरी हिवाळ्यात ह्याप्रमाणे तीनदा धुरी देतात. हे धान्य वापरण्यापूर्वी दोन दिवस उघड्या हवेत ठेवणे जरूर असते. 

धान्याच्या पोत्यावर कीटकनाशक म्हणून बाहेरून ५ टक्के बीएच्‌सी किंवा ०.०६ टक्के पायरेथ्रम भुकटी पिस्कारतात किंवा पाण्यात मिसळणारी ५० टक्के बीएच्‌सी भुकटी १: २५ प्रमाणात किंवा २.५ टक्के पायरेथ्रम पायस किंवा ५० टक्के मॅलॉथिऑनचे पायस १: ३०० प्रमाणात पाण्यात मिसळून दर १०० घ. मी. जागेस ३ लिटर याप्रमाणे दर महिन्यास फवारल्यास किडीचा उपद्रव नष्ट करता येतो.

भारत : भारतात कृषिभांडागारे स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न १९२० च्या सुमारास झाला. पहिल्या महायुद्धानंतर पंजाबमध्ये ल्यालपूर येथे गव्हाचे उच्चालक बसविण्यात आले. सुरुवातीचा खर्च सरकारने केला आणि त्याची व्यवस्था एका खाजगी कंपनीकडे दिली पण नुकसान येऊन ते तीन वर्षात बंद पडले.

भांडागाराची पद्धत मुंबई-कलकत्ता यांसारख्या बंदरांच्या परिसरात विकसित झाली. आयात व्यापार करणाऱ्यांना माल आल्याबरोबर जकात भरण्याची धावपळ करावी लागू नये, म्हणून बंदरांजवळ परवानाधारक व्यक्तींची भांडागारे आहेत. आयात माल जहाजावरून उतरवून तो या भांडागारांत ठेवता येतो आणि सवडीने जकात भरून तो तेथून व्यापाराच्या ठिकाणी हलविता येतो. या भांडागाराची पावती तारण म्हणून वापरली जाऊ शकते. भारतातील १९३० सालच्या ‘माल (वस्तू) विक्री अधिनियमा’ च्या (सेल ऑफ गुड्स ॲक्ट) कलम ३६ मध्ये भांडागार-पावत्यांविषयीची तरतूद केलेली आहे. पुढे १९४७ साली तत्कालीन मुंबई इलाख्यात ‘मुंबई गुदाम अधिनियम’ संमत करण्यात आला पण भांडागारांचा विकास मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिला.

शेतकऱ्याला या प्रकारची सोय पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावी, अशी शिफारस १९५२ साली नेमलेल्या ग्रामीण कर्ज पाहणी समितीने आग्रहाने केली. गुदामे व वखारी यांची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी सरकारने आवश्यक त्या संस्था निर्माण कराव्यात व त्यांना भांडवल पुरविण्याची व्यवस्था सरकार आणि रिझर्व्ह बँक ह्यांनी करावी, अशी सूचना समितीच्या अहवालात करण्यात आली होती. तीनुसार १९५६ साली ‘शेतमाल (विकास व गुदामव्यवस्था) निगम अधिनियम’ संमत करण्यात आला. १ सप्टेंबर १९५६ रोजी ‘राष्ट्रीय सहकारी विकास आणि गुदामव्यवस्था मंडळ’ स्थापन करण्यात आले २ मार्च १९५७ रोजी ‘केंद्रीय वखार निगमा’ची स्थापना करण्यात आली आणि १९५६-५७ साली प्रथम बिहारमध्ये ‘राज्य वखार निगम’ स्थापन होऊन नंतर १९५९-६० पर्यंत इतर सर्व राज्यांतही अशा संस्था स्थापन झाल्या.

३१ डिसेंबर १९७२ अखेर १५ राज्य वखार निगमांनी व केंद्रशासित प्रदेशांनी उभारलेल्या वखारींची संख्या ६९७ व एकूण साठवणक्षमता १६,४५,७४६ टन होती. केंद्रीय व राज्य वखार निगमांच्या गुदामांची एकूण साठवणक्षमता १९७२ अखेर १,७३,८१,२५६ टन होती. १९७३ अखेर केंद्रीय वखार निगमाच्या गुदामांची एकूण साठवणक्षमता १५·७९ लक्ष टन होती. भारतीय अन्न निगमाच्या स्वतःच्या मालकीच्या वखारींची साठवणक्षमता ३१ जुलै १९७३ रोजी ४९·४४ लक्ष टन होती. अन्नधान्ये, डाळी, तेलबिया, रासायनिक खते, साखर, गूळ, कापूस, सरकी, ताग, हळद, आले, काळी मिरी ह्यांसारख्या शंभराहून अधिक प्रकारच्या वस्तू वखारीत व गुदामांत साठविण्यात येतात.

धान्याचे शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्याकरिता संशोधन आणि प्रशिक्षण ह्या दोहोंची आवश्यकता आहे. हापूर (उत्तर प्रदेश) येथील भारतीय धान्य साठवण केंद्र, म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रविद्याविषयक संशोधन संस्था ह्यांसारख्या अनेक संस्था धान्य साठवणाविषयी संशोधनाचे व प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. धान्याच्या साठवणीसाठी योग्य साधनाच्या कणग्या, त्या तयार करण्याकरिता येणारा खर्च व त्याचे व्यवस्थापन ह्यांबाबत या संस्थांमधून विशेष संशोधन चालू आहे. खाजगी क्षेत्रात धान्याचे साठवण करणाऱ्या विविध संस्थांना उपयुक्त होतील, अशा प्रकारच्या शास्त्रीय साठवणविषयक विस्तारसेवा केंद्रीय वखार निगमाने उपलब्ध केल्या आहेत. या प्रकारच्या सेवा राज्य वखार निगमांद्वाराही प्रसारीत केल्या जाणार आहेत.

धान्याचा नाश उंदीर, खारी वगैरेंसारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यापासून फार मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यांपासून संरक्षण करण्यासाठी आता धातूच्या कणग्यांचा उपयोग काही ठिकाणी (शेतावर) प्रायोगिक स्वरूपात करण्यात येऊ लागला आहे. एका प्रयोगात्मक योजनेनुसार, शेतकऱ्यांना हप्त्यावर ह्या धातूच्या कणग्या पुरविल्या जाणार असून, त्यांची उभारणी करण्यासाठी व निगा राखण्यासाठी तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे. पंजाब राज्यात दहा हजारांहून अधिक धातूच्या कणग्या शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ह्या कणग्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यापूर्वी प्रायोगिक योजनेची कार्यवाही अजमावणे अत्यावश्यक आहे. 

गुदामव्यवस्थेच्या (वेअरहाउसिंग) सुविधेचा अधिकाधिक प्रसार होण्याच्या दृष्टीने, चौथ्या योजनेत केंद्रीय वखार निगमासाठी १२ कोटी रु., तर राज्यांच्या योजनांमधून राज्य वखार निगमांकरिता ६ कोटी रु. नियोजित खर्चाची तरतूद करण्यात आली. 

पहा : कृषिविपणन केंद्रीय वखार निगम भारतीय अन्न निगम.

दोरगे, सं. कृ. सुराणा, पन्नालाल