गुंडिरा : (लिंबारा हिं. आंखतरूवा क. दोड्डली, तुरल लॅ. हेनिया त्रिजुगा कुल-मेलिएसी). सु. ९—१२ मी. उंच व १·५ मी. घेराचा हा शोभिवंत, सदापर्णी, लहान वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश व भारत येथे नद्यांच्या काठाने आणि घनदाट जंगलात आढळतो. याची साल पातळ, खरबरीत, लालसर. तपकीरी असते. पाने संयुक्त. एकांतरित(एकाआड एक), पिसासारखी दले ५ — १३, समोरासमोर, लांबट गोलसर, तळाशी तिरपी टोकाचे दल अधिक मोठे फुले लहान, सुगंधी, पांढरी व अनेक असून फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये परिमंजरीवर येतात. बोंड लालसर वाटोळे असून तडकल्यावर दोन शकले होतात. बी एक, शेंदरी, वाटोळे आणि पातळ अध्यावरणयुक्त (बीजाच्या बाहेरच्या आवरणावर जादा वाढ असलेले) असते [→ मेलिएसी ]. लाकूड उदी रंगाचे व मध्यम कठीण असते. तुळया, खांब वगैरेंकरिता घर बांधणीत वापरतात बियांचे तेल दिव्याकरिता नेपाळात उपयोगात आहे. साल व पाने कडू व पौष्टिक असून पानांचा काढा अतिसारावर देतात. याची फळे मलेशियात इतर औषधिद्रव्यांबरोबर मिसळून लोकांना गुंगी आणण्यास चोर वापरतात. साल, पाने व फळे विषारी असतात.
वैद्य, प्र. भ.