गीयोम, शार्ल एद्वार : (१५ फेब्रुवारी १८६१—१३ जून १९३८). फ्रेंच-स्विस भौतिकीविज्ञ. १९२० च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म फ्ल्यूरिये, स्वित्झर्लंड येथे झाला. नशाटेल व झूरिक येथील तंत्रविद्यालयांत शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी तोफखान्यात काम केले. ते १९१५—३६ या काळात वजने व मापे यांसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक होते. निकेल व पोलाद यांच्या मिश्रधातूंचा अभ्यास करून त्यांनी तापमान बदलामुळे अत्यल्प प्रसरण व आकुंचन होणाऱ्या इन्व्हार या मिश्रधातूचा शोध लावला. प्रमाणभूत मापे व सूक्ष्ममापक उपकरणे तयार करण्यासाठी इन्व्हारचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. या कार्याकरिता त्यांना १९२० सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. उष्णताजन्य प्रसरण व स्थितिस्थापकता यांचा समन्वय साधणाऱ्या एलिन्व्हार या मिश्रधातूचाही त्यांनीच शोध लावला. ते पॅरिस येथे मृत्यु पावले. भदे, व. ग.