गिरणा : तापी नदीची महाराष्ट्रातील एक महत्त्वाची उपनदी. लांबी. सु. ३०० किमी. नासिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यात सह्याद्रीच्या उत्तर भागात उगम पावून कळवण, बागलाण आणि मालेगाव तालुक्यांतून ती पूर्वेकडे जाते. वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला सितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ—सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते. गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.
कुमठेकर, ज. ब.