गिबन : हा मानवसदृश कपी (माकड) हायलोबेटिडी कुलातील आहे. आसाम, ब्रह्मदेश, मलाया, जावा, सुमात्रा, सयाम, बोर्निओ या टापूत हा आढळतो. समुद्रसपाटीच्या आणि २,४०० मी. उंचीवरील वर्षावनात (ज्यात सु. २५० सेंमी. किंवा त्यापेक्षाही पुष्कळच जास्त पाऊस पडतो अशा दाट अरण्यात) हा राहतो. ह्याच्या सहा जाती आहेत. त्यांपैकी भारतात (आसाममध्ये) आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव हायलोबेटीस हूलॉक  असे आहे. भारतात एवढाच मानवसदृश कपी आढळतो.

हूलॉक लुकडा असून त्याची उंची ९० सेंमी.पर्यंत असते, वजन ६ —८ किग्रॅ. असते, हात पायांपेक्षा बरेच लांब असतात, शेपूट नसते, श्रोणि-किण (ढुंगणावरील घट्टे) असतात, आंत्रपुच्छ (आतड्याच्या दूरस्थ भागापासून निघालेला लहान पिशवीसारखा भाग, ॲपेंडिक्स) असते, दाढा माणसांसारख्याच असतात आणि गालफडात कोटरिका (पिशव्या) नसतात. इतर कपींपेक्षा हा अत्यंत चपळ आहे. शरीर केसाळ असते. 

गिबन

वयाने लहान असलेली मादी आणि नर यांचा रंग काळा असतो. पाचव्या किंवा सहाव्या वर्षी वयात आल्यावर मादीचा रंग पिवळसर करडा होतो. नवजात हूलॉकच्या अंगावर पिवळसर केस असतात.

  

यांची कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबात नर, मादी व दोन-चार पिल्ले असतात. अन्नाचा भरपूर पुरवठा असेल अशा ठिकाणी यांची बरीच कुटुंबे एकत्र राहताना आढळतात. रात्री दरीतील सुरक्षित ठिकाणी ते झोपतात व सकाळ होताच डोंगर चढून जाऊन भक्ष्य मिळविण्याच्या उद्योगाला लागतात. प्रत्येक कुटुंब भक्ष्य शोधण्याकरिता आपल्यापुरते ठराविक क्षेत्र आखून घेते. फळे, पाला, किडे आणि कोळी हे यांचे भक्ष्य आहे. दिवस वर आल्यावर हे ओरडायला सुरुवात करतात व यांच्या आरड्याओरड्याने सगळे अरण्य दुमदुमते. दुपारी उन्हाच्या वेळी हूलॉक सावलीच्या जागी विश्रांती घेतो. संध्याकाळी पुन्हा भक्ष्याचा शोध व आरडाओरडा सुरू होतो, पण सकाळच्यापेक्षा तो कमी असतो. याची चलनाची रीत दोनतीन प्रकारची असते. एका फांदीवर उभा राहून खालच्या फांदीवर तो उडी घेतो किंवा झाडांच्या मोठमोठ्या फांद्यांवरून ताठ उभा राहून चालत जातो किंवा फांदीला हाताने लोंबकळून व शरीराला झोके देऊन तो दुसरी फांदी पकडतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला नर व मादी यांचा समागम होतो. गर्भावधी सु. २१२ दिवसाचा असतो. मादीला दर खेपेस एक पिल्लू होते. पिल्लाची काळजी घेण्यात ती फार दक्ष असते. फार मोठी उडी घेताना ती पिल्लाला पाठीवर घेते किंवा एका हाताने पोटाशी घट्ट धरून ठेवते. 

मलेशिया व सुमात्रामध्ये आढळणाऱ्या गिबनच्या जातीला सिॲमँग गिबन म्हणतात. हा हूलॉकपेक्षा उंच आणि वजनाने जवळजवळ दुप्पट असतो. 

पहा : मानवसदृश कपि. 

जोशी, मीनाक्षी