गॉल्टन, सर फ्रान्सिस : (१६ फेब्रुवारी १८२२ — १७ जानेवारी १९११). इंग्लिश शास्त्रज्ञ, अन्वेषक (संशोधक), मानवमितिज्ञ (मानवी शरीराचे आकारमान व त्याची प्रमाणे यांचे मापन करणाऱ्या शास्त्रातील तज्ञ) आणि सुजननविज्ञानाचे (पितरांच्या योग्य निवडीने मानववंशातील गुणलक्षणे सुधारण्यासंबंधीच्या विज्ञानाचे ) आद्य प्रवर्तक. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे हे पुतणे होत. स्पारब्रुक (बर्मिंगहॅम) जवळ ते जन्मले. त्यांचे शिक्षण किंग्ज कॉलेज, लंडन ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज सेंट जॉर्ज हॉस्पिटल, लंडन जनरल हॉस्पिटल, बर्मिंगहॅम इ. संस्थांतून झाले. प्रथम त्यांनी बाल्कन संस्थाने, ईजिप्त, सूदान, लेव्हँट ह्या प्रदेशांतून बराच प्रवास केला त्यानंतर नैर्ऋत्य आफ्रिकेत सु. २,८३० किमी. प्रवास केला व शेवटी स्पेन देशातही जाऊन आले. १८५७ पासून ते लंडनमध्ये स्थायिक झाले व आपल्या जीवनातील उत्तरकाल त्यांनी शास्त्रीय संशोधनात घालविला.
त्यांनी सुजननविज्ञानावर आपले लक्ष केंद्रित केले होते. पैतृकावस्थेत निवड करून मानवाच्या जीवशास्त्रीय स्वरूपात सुधारणा घडवून आणण्यावर त्यांचा विश्वास होता. हेरेडिटरी जीनीयस (१८६९) या त्यांच्या ग्रंथावरून असे दिसून येते की, सुप्रसिद्ध कुटुंबातील व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचे विश्लेषण करताना त्यांच्या विकासात सामाजिक परिस्थितीला फार कमी महत्त्व होते.
इंटरनॅशनल हेल्थ एक्झिबिशन, लंडन या संस्थेत त्यांनी आपली मानवमितीय प्रयोगशाळा स्थापिली (१८८४ – ८५) व तेथे असंख्य अभिलेख (नोंदी) व सु. नऊ हजारांवर संबंधित बाबींचा अभ्यास झाला. त्यांचा अन्वयार्थ लावण्याकरिता त्यांनी सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) पद्धतींचा शोध लावला व त्यातून सहसंबंधी कलन (दोन अगर अधिक वस्तू, गुणधर्म इत्यादींमधील परस्परसंबंधांविषयी अभ्यास करणारी सांख्यिकीची शाखा) या त्यांच्या वैज्ञानिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाच्या कार्याचा उगम झाला. त्यांना उपलब्ध झालेल्या कुटुंबीय माहितीच्या आधारे त्यांनी आनुवांशिकतेचे परिमाणात्मक मूल्यमापन केले त्यामध्ये त्यांना आप्तस्वकीयांच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा समन्वय करावा लागला तसेच एखाद्या व्यक्तीबाबत मापन करून आढळलेली दोन लक्षणे स्वतंत्र नसून संबंधित असतात असे त्यांना आढळून आले. समरूप जुळी मुले व एकुलत्या एक स्त्रीवारसाबरोबर विवाह केल्याने येणे शक्य असलेले वंध्यत्व यांसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनास विशेष महत्त्व आहे.
वातावरणविज्ञानातील अपसारी चक्रवाताचे [→ चक्रवात] महत्त्व १८६३ मध्ये त्यांनी दाखवून दिले. संमिश्र छायाचित्रांची निर्मिती तसेच प्रत्येक व्यक्तीची अचूक ओळख पटण्यासाठी बोटांच्या ठशांची उपयुक्तता हे शोध त्यांनीच प्रथम लावले. त्यांना १९०९ मध्ये ‘सर’ हा किताब मिळाला. आफ्रिकेतून संकलित करून आणलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल त्यांना १८५३ मध्ये रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. १८५६ मध्ये रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली. इंग्लिश मेन ऑफ सायन्स (१८७४) इनक्वायरीज, इन्टू ह्यूमन फॅकल्टीज (१८८३) नोटवर्दी फॅमिलीज (१९०६) आणि एसेज एन यूजेनिक्स (१९०९) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मृत्यूपूर्वी त्यांनी लंडन विद्यापीठात सुजननविज्ञानाच्या एका अध्यापकाची जागा स्थापन करण्यासाठी जरूर ती अर्थव्यवस्था केली. ते हेझल्मीर येथे मृत्यू पावले.
परांडेकर, शं. आ.