गॉफ, सर ह्यू : (३ नोव्हेंबर १७७९—२ मार्च १८६९). प्रसिद्ध ब्रिटिश सेनानी. यूरोप, आफ्रिका आणि आशिया या तिन्ही खंडांत तलवार गाजविलेल्या ह्यू गॉफचा जन्म आयर्लंडमधील लिमरिक परगण्यातील वुड्सडाउन गावी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यास कमिशन मिळाले. अठराव्या शतकाच्या अखेरच्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजच्या मोहिमांत त्याने भाग घेतला. सतराव्या वर्षी आयरिश पायदळ पलटणीचा तो कर्नल झाला. स्पेन व पोर्तुगालमधील युद्धात (१८०८—१२) तो वेलिंग्टनच्या हाताखाली लढला. या युद्धात अनेक ठिकाणी त्याने तलवार गाजविली आणि अनेक वेळा तो जखमीही झाला. त्याच्या कामगिरीबद्दल त्यास सर पदवी मिळाली. १८३० मध्ये तो मेजर जनरल झाला व १८३७ साली त्याची भारतात म्हैसूर येथे नेमणूक झाली. १८४० च्या चीनविरुद्ध झालेल्या अफू-युद्धात त्याने ब्रिटिश फौजेचे यशस्वी नेतृत्व केले. १८४२ मध्ये त्यास बॅरोनेटचा किताब व भारताचे सरसेनापतिपद देण्यात आले. शिंद्यांचा त्याने ग्वाल्हेरजवळ महाराजपूर येथे १८४३ मध्ये पराभव केला. पहिल्या व दुसऱ्या शीख-युद्धात (१८४५-४६ व १८४८-४९) मुडकी, फिरोझशाह, सोब्राउन व चिलिआनवाला इ. लढायांत नेतृत्व केले. शीख-युद्धानंतर त्यास ‘व्हायकौन्ट’चा किताब मिळाला. शेवटी १८६२ साली त्याला फील्ड मार्शलचा हुद्दा देण्यात आला. स्वदेशी परतल्यावर आयर्लंडमधील बुटर्सटाउन येथे तो मरण पावला.
संदर्भ : Rait, R. S. Life and Compaigns of Viscount Gough, 2 Vols., 1903.
चाफेकर, शं. गं.