गॉडर्ड, रॉबर्ट हचिंग्झ : (५ ऑगस्ट १८८२ — १० ऑगस्ट १९४५). अमेरिकन भौतिकीविज्ञ व अमेरिकेतील रॉकेटविज्ञानाचे आद्य प्रणेते. त्यांचा जन्म वुस्टर, मॅसॅचूसेट्‌स येथे झाला. वुस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून १९०८ मध्ये पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९११ मध्ये क्लार्क विद्यापीठाची पीएच्.डी. मिळविली. त्यांनी १९१२-१३ या काळात प्रिन्स्टन विद्यापीठात व नंतर १९४३ पर्यंत क्लार्क विद्यापीठात भौतिकीचे अध्यापन केले.

विद्यार्थीदशेतच गॉडर्ड यांनी अनेक टप्प्यांचे रॉकेट, द्रव प्रचालनकाच्या (रेटा निर्माण करून गती देणाऱ्या पदार्थाच्या) साहाय्याने संतत रॉकेट प्रचालन, आयन प्रचालन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन उच्च वेगाने बाहेर फेकून गती देणारा रेटा निर्माण करण्याचे तंत्र), हायड्रोजन व ऑक्सिजन रॉकेटासंबंधीचा सिद्धांत, समानव व मानवरहित अवकाश उड्डाण, रॉकेट उड्डाणातील उच्च प्रवेगावस्थेत मानवाचे संरक्षण करण्याचा प्रश्न इत्यादींसंबंधी माहितीपर नोंदी तयार केल्या होत्या. तथापि या कल्पना प्रत्यक्षात आणता येतील अशी खात्री होईपर्यंत त्यांनी त्या प्रसिद्ध केल्या नाहीत. १९१४—१६ या काळात त्यांनी रॉकेट उड्डाणाच्या मूलभूत सिद्धांताचा विस्तार केला व घन प्रचालनकासंबंधी प्रयोग केले. १९१६ मध्ये गॉडर्ड यांनी रॉकेटासंबंधीच्या आपल्या संशोधनास मदत मिळावी म्हणून स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनला ए मेथड ऑफ रीचिंग एक्स्ट्रीम आल्टिट्यूड्स  हा आपला निबंधरूप अहवाल सादर केला. या संस्थेने त्यांना १९१७ साली संशोधनासाठी आर्थिक साहाय्य दिले आणि त्यांचा अहवाल काही अधिक माहिती घालून १९१९ साली प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांनी द्रव प्रचालनकासंबंधी संशोधन करून १९२६ मध्ये आपले पहिले द्रव इंधनयुक्त रॉकेट उडविले. क्लार्क विद्यापीठ व गूगेनहाइम फाऊंडेशन यांच्या आर्थिक मदतीने द्रव इंधनयुक्त

रॉकेट व घूर्णीय नियंत्रण [→ घूर्णी] यांसंबंधीचे प्रयोग न्यू मेस्किकोतील रोझवेलनजीकच्या एका वाळवंटात

चालू ठेवले. या प्रयोगांवर आधारलेला लिक्विड प्रॉपेलंट रॉकेट डेव्हलपमेंट  हा निबंध १९३६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांचा रॉकेट डेव्हलपमेंट : लिक्विड फ्यूएल रॉकेट रिसर्च १९२९४१  हा प्रबंध त्यांच्या मृत्यूनंतर १९४८ मध्ये प्रसिद्ध झाला. निर्वातात तसेच हवेतही रॉकेट कार्य करू शकते असे त्यांनी दाखवून दिले. अनेक टप्प्यांच्या रॉकेटाच्या साहाय्याने चंद्रावर पोहोचता येईल असा सिद्धांतही त्यांनी मांडला होता.

दुसऱ्या महायुद्धकाळात अमेरिकन नौदलाने गॉडर्ड यांची रॉकेट मोटर व विमान उड्डाणासाठी जेटचा उपयोग करणारी साधने यांसंबंधी संशोधन करण्यासाठी नेमणूक केली आणि त्याकरिता त्यांची प्रयोगशाळा

ॲन्नापोलिस येथे हलविण्यात आली. मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच संशोधन केले.

रॉबर्ट हचिंग्झ गॉडर्ड

  

   

गॉडर्ड यांनी सु. १५० पेटंटे मिळविली. त्यांत घूर्णीमार्गदर्शित साधनाने स्थिर केलेल्या स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक) वेगाने जाणाऱ्या, उड्डाणातच पुन्हा रेटा मिळविणाऱ्या व अतिशय उंचीवर जाऊ शकणाऱ्या द्रव इंधनयुक्त रॉकेटाचा समावेश आहे. जर्मनीच्या नाझी सरकारने गॉडर्ड यांच्या पेटंटाचा व्ही-२ रॉकेटाच्या विकासासाठी उपयोग केला व अमेरिकेनेही आपल्या अवकाश कार्यक्रमात या पेटंटांचा उपयोग केला आहे. १९६२ मध्ये ग्रीनबेल्ट येथील रॉकेट उड्डाण तळाला ‘गॉडर्ड स्पेस फ्लाइट सेंटर’ असे नाव देण्यात आले. लष्करी कामासाठी रॉकेटांचा वापर करण्यास गॉडर्ड यांचा विरोध होता. मानवाचे विश्वासंबंधीचे ज्ञान विस्तृत करण्यास रॉकेटाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल अशी त्यांची खात्री होती. ते बाल्टिमोर येथे मृत्यू पावले.

पहा : अवकाशविज्ञान रॉकेट.

भदे, व. ग.