उडत्या तबकड्या : फार प्राचीन काळापासून कित्येक वस्तू अवकाशातून पृथ्वीकडे येताना, पृथ्वीभोवती फिरताना, तसेच अतिशय वेगाने उडत असताना लोकांना दिसल्याचे सांगण्यात येते. तथापि त्यासंबंधी विश्वासार्ह उल्लेख आढळून येत नाहीत. 

अशा वस्तू १८८५ मध्ये तुर्कस्तानात, १८८७ मध्ये नोव्हास्कोशात व एप्रिल १८९७ साली अमेरिकेमध्ये पुष्कळांना दिसल्याची नोंद आहे. १८९७ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोहून पूर्वेकडे सिगारच्या आकाराची एक वस्तू जात असलेली पाहिल्याचे अनेकांनी सांगितले. ही वस्तू शिकागो येथेही अनेकांनी पाहिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस चार्ल्‌स फोर्ट यांनी अशा तर्‍हेच्या अनधिकृत वृत्तांचा संग्रह ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. २४ जून १९४७ रोजी केनेथ आर्नल्ड नावाच्या एका व्यापाऱ्याला विमानातून प्रवास करीत असताना रेनिअर पर्वताजवळ काही तेजस्वी, बशांच्या आकाराच्या व साधारण विमानापेक्षा मोठ्या वस्तू प्रचंड वेगाने जाताना आढळल्या. या वस्तूंवरून सूर्यप्रकाश परावर्तित होत असल्यामुळे त्या धातूच्या असाव्यात असे त्यांना वाटले. ह्या गोष्टीला मोठी प्रसिद्धी मिळाली व थोड्याच काळात आकाशातून उडणाऱ्या अशा विविध आकारांच्या वस्तू पाहिल्याचे अनेक वृत्तांत प्रसिद्ध होऊ लागले. नॉर्वे, स्वीडन, रशिया इ. देशांतील अनेक लोकांनी अशा वस्तू १९४६ पासून पाहिल्याची नोंद आहे. १९५३ मध्ये कलकत्त्यास डमडम विमानतळाजवळ एक उडती तबकडी दिसल्याचे प्रसिद्ध झाले होते. 

काही वस्तू अनेक तास एकाच ठिकाणी स्थिर अवस्थेत फिरत असलेल्या दिसल्या, तर काही क्षणार्धात चमकून प्रचंड वेगाने नाहीशा झाल्या. काही वस्तू फुग्यांसारख्या, काही नळकांड्यांसारख्या तर काही सिगारच्या आकाराच्या, परंतु मुख्यत्वे त्या तबकडीच्या किंवा बशीच्या आकाराच्या होत्या. त्यांचा वेग व चटकन दिशा बदलण्याची क्षमता आश्चर्यकारक होती. रात्रीच्या वेळी दीप्तिमान अथवा हिरव्या ज्वालाकार स्वरूपाचे गोळे व त्यांमधून बाहेर पडणारी स्फुल्लिंगे इ. अनेक प्रकार दिसल्याचे प्रसिद्ध झालेले आहे. काही विमान चालकांनी प्रकाशित तबकड्या त्यांच्या विमानाजवळ आल्याचे व काहींनी त्यांचा पाठलाग केल्याचेही सांगितले. या वस्तूंना ‘अज्ञात उडत्या वस्तू’ (अनआयडेंटीफाइड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स UFO) असेही नाव रूढ झाले आहे. 

उडत्या तबकड्यासंबंधीच्या वृत्तांताची छाननी करण्याचे काम अमेरिकन सरकारने विमान दलाकडे सोपविले होते. विमान दलाने हा विषय ‘गुप्त’ (सिक्रेट) असल्याचे ठरविले आणि या वृत्तांतांची काळजीपूर्वक छाननी करून त्यांपैकी बहुतेक विश्लेषण करण्यास अगदीच विस्कळीत स्वरूपाचे आहेत व बाकीच्यांचे ज्ञात नैसर्गिक आविष्कारांच्या स्वरूपात स्पष्टीकरण करणे शक्य आहे, असे मत सांगितले. उडत्या तबकड्या राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे धोक्याच्या नसून त्या बाह्य अवकाशातून आलेल्या असाव्यात यासंबंधी कोणताही विश्वासार्ह निर्णायक पुरावा नाही, असेही विमान दलातर्फे प्रसिद्ध करण्यात आले. काही टीकाकारांनी या वस्तू बाह्य अवकाशातून आलेल्या असून त्यासंबंधीची माहिती प्रसिद्ध केल्यास केवळ जनतेत घबराट उत्पन्न होईल, म्हणूनच सरकार सत्यस्थिती दडपून टाकीत आहे, असाही आरोप केलेला आहे. 

विमाने, वाऱ्याने वर उडालेले कागदाचे तुकडे, पतंग, हवामान खात्याने संशोधनासाठी सोडलेले फुगे, पिसे इत्यादींसारख्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या वस्तूंवरून प्रकाश परावर्तित झाल्यामुळे बहुतेक तबकड्यांचे भास झालेले असणे शक्य आहे. काही वेळा गतिमान तंतुमेघावरून प्रकाश परावर्तित झाल्यामुळे वेगवान तबकड्यांचा आभास निर्माण झालेला असावा. रात्रीच्या वेळी कोणत्याही तेजस्वी ताऱ्यामुळे (उदा., व्याधामुळे) किंवा ग्रहामुळे (उदा., शुक्रामुळे) विशेषतः ते जवळजवळ क्षितिजावर असताना हवेच्या अनियमित थरांमधून त्याचा प्रकाश आल्यामुळे असे भास झालेले आहेत. अनेक वेळा मृगजळामुळेही या वस्तू दिसल्याचे आढळून आले आहे. विमानांचे दिवे, शोधक दिवे, हवामानखात्याच्या फुग्यांतील दिवे इ. उद्‌गमांपासून ढगांवर पडलेला प्रकाश परावर्तित झाल्यामुळे काही वस्तू दिसल्या असाव्यात. हिरवी छटा असलेल्या उल्कांमुळे हिरव्या रंगांचे गोळे दिसले असण्याची शक्यता आहे. तसेच गोळ्यांच्या स्वरूपाच्या तडितेमुळेही काही आभास झालेले असावेत. ⇨ आभासी सूर्य व इतर प्रकारची प्रभामंडले, हिमतुषाराच्या स्फटिकांमुळे परावर्तित होणारा सूर्यप्रकाश वा चंद्रप्रकाश तसेच धुके, धूसर इत्यादींमुळेही या वस्तू दिसल्याचा भास होणे व विमान चालकांना आपला पाठलाग झाल्याचा भ्रम होणे शक्य आहे. वातावरणातील अस्थिर थरांमुळे रडार तरंग पृथ्वीकडे वळणे तसेच त्यांचे प्रकीर्णन (विखुरणे) होणे शक्य असल्यामुळे रडारद्वारे अशा वस्तूंचे केलेले निरीक्षणही खात्रीलायक मानता येत नाही.

 काही व्यक्तींनी अशा उडत्या तबकड्यांतून प्रवास केल्याचे अथवा त्यातील एखाद्या व्यक्तीशी संभाषण केल्याच्या हकिगतीही सांगितलेल्या आहेत. परंतु यासंबंधी कोणताही निश्चित पुरावा त्यांना देता आलेला नाही. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी बऱ्याच लोकांनी उडत्या तबकड्या कशा दिसल्या याचे रसभरीत वर्णन केले आहे व नंतर वृत्तपत्रांत व मासिकांत लेख लिहून पैसे मिळवलेले आहेत. १९६८ मध्ये अशा असत्य कथनाचा एक महत्त्वाचा प्रकार उघडकीस आला. अवकाशातील एखाद्या ग्रहावरून पृथ्वीवर काही व्यक्ती येत असाव्यात, त्यांना पृथ्वीवरील मानवांशी मैत्रीचे संबंध जोडावयाचे असावेत वा त्यांना युद्ध करावयाचे असेल, त्यांना पृथ्वीवर वसाहत करावयाची असेल इ. अनेक प्रकारचे तर्क काही लेखकांनी मांडलेले आहेत. 

उडत्या तबकड्यांसंबंधी कोलोरॅडो विद्यापीठानेही एडवर्ड काँडन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. १९६९ मध्ये या समितीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात या वस्तूंना शास्त्रीय आधार नाही, त्या केवळ नैसर्गिक घटना असाव्यात व कित्येक तर बनवाबनवीच्या कपोलकल्पित गोष्टी असाव्यात असा अभिप्राय दिलेला आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्स या संस्थेने काँडन अहवालावर टीका केलेली असून या समितीने तपासलेल्या ११७ घटनांपैकी ३० टक्के घटनांसंबंधी काहीही उलगडा होऊ शकलेला नाही. त्यामुळे उडत्या तबकड्यांविषयी शास्त्रीय संशोधन पुढे चालू ठेवणे निश्चितच इष्ट ठरेल असे मत दिलेले आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे उडत्या तबकड्यांविषयी अभ्यास करण्यासाठी व सदस्य राष्ट्रांत माहितीची देवघेव करण्याकरिता आऊटर स्पेस ग्रुप व आऊटर स्पेस कमिटी अशा दोन समित्या स्थापन केलेल्या आहेत. 

संदर्भ : 1. Klass, P. J. UFOs Identified, New York, 1968.

           2. Scully, F. Behind the Flying Saucers, New York, 1950.

कानिटकर, बा. मो. भदे, व. ग.