शर्मा, राकेश देवेंद्रनाथ : (१३ जानेवारी १९४९– ). पहिले भारतीय अंतराळवीर. त्यांनी २ ते ११ एप्रिल १९८४ हा कालावधी असलेल्या सोयूझ टी ११ या रशिया-भारत संयुक्त अवकाश मोहिमेत दोन दोन रशियन अंतराळवीरांबरोबर भाग घेतला. अवकाशात सोयूझ टी – ११ हे अवकाशयान सॅल्यूत– ७ या अवकाशस्थानकाशी जोडले गेले. तेथे त्यांनी सोयूझ टी – १० मधील अंतराळवीरांबरोबर भारतीय भूप्रदेशाची व पृथ्वीच्या इतर भागाची १,००० पेक्षा जास्त छायाचित्रे घेतली. या मोहिमेचा एकूण कालावधी ४,३६५ तास ४८ मिनिटे होता. ते अवकाशात ७ दिवस २१ तास ४२ मिनिटे होते. 

राकेश शर्मा यांचा जन्म पतियाळा (पंजाब) येथे झाला. खडकवासला येथील ⇨ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत १९६६ साली ते छात्र म्हणून प्रविष्ट झाले. १९७१ च्या बांगलादेशाच्या मुक्तियुद्धाच्या वेळी मिग –२१ मधून त्यांनी २१ वेळी पाकिस्तानवर हल्ले केले. १९७४ पर्यंत ए स्काड्रन लीडर होते. १९७५ –८२ या दरम्यान त्यांनी चाचणी उड्डाणविषयक कार्य केले. १९८२ – ८४ या काळात ते रशियात अंतराळवीप्रशिक्षणार्थी होते. बंगलोरच्या एअरक्राफ्ट अँड सिस्टिम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटमधून त्यांनी वैमानिकांसाठी असलेला प्रायोगिक चाचणी अभ्यासक्रम पूर्ण केला.    

मिग व्हेरिएंट एचएस –७४८, कॅनबेरा, हंटर, कॅरिबू, इसकारा, किरण, अजित, मरुत व एचपीटी – ३२ आदी विविध प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांचा १,६०० तासांचा अनुभव त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.    

एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते सन्माननीय सदस्य असून इंडियन रॉकेट सोसायटीचे ते सदस्य आहेत. नवी दिल्ली येथील अवकाश खात्यात ते कार्यरत असून अशोक शक्र, ऑर्डर ऑफ लेनिन हा रशियाचा सर्वोच्च पुरस्कार, हिरो ऑफ सोव्हिएट युनियन व गोल्ड स्टार पदक आदी बहुमानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कुलकर्णी, सतीश वि.