ओबेर्थ, हेर्मान यूलिउस : (२५ जून १८८४—    ). जर्मन शास्त्रज्ञ. आंतरग्रहीय उड्डाणासाठी लागणाऱ्या रॉकेटांच्या विकासामध्ये त्यांनी मूलभूत कार्य केले आहे. त्यांचा जन्म त्याकाळच्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातील हर्मानश्टाट, र्ट्रन्सिसिल्व्हेनिया येथे झाला. १९१३ मध्ये त्यांनी म्यूनिक विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासास सुरुवात केली व त्याचबरोबर गणित आणि ज्योतिषशास्त्र या आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यासही चालू ठेवला. पहिल्या महायुद्धात ते ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यात दाखल झाले. एका लढाईत जखमी झाल्यावर त्यांची वैद्यकीय पथकात बदली झाली व तेथे त्यांनी अवकाशगमन – विज्ञानाचा अभ्यास पुढे चालू ठेवला. त्यावेळी त्यांनी वजनरहित अवस्थेच्या सदृशीकरणासाठी अनेक प्रयोग केले, तसेच दूर पल्ल्याच्या व पाणी आणि द्रवीभूत हवा यांचे अल्कोहॉलामधील मिश्रण हे इंधन असलेल्या एका रॉकेटाच्या अभिकल्प तयार केला होता. हा आराखडा त्यांनी १९१७ साली जर्मन युद्ध खात्याकडे पाठविला, तथापि तो नापसंत करण्यात आला. युद्धानंतरही त्यांनी या आराखड्याकडे जर्मन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न केला पण तो निष्फळ ठरला.

हेर्मान यूलिउस ओबेर्थ

त्यानंतर ओबेर्थ यांनी झिबेनबर्गेन, म्यूनिक, गॉटिंगेन, हायड्लबर्ग व क्लाऊझेबर्ग येथे विज्ञान व गणित या विषयांचा अभ्यास केला. युद्धकाळात तयार केलेल्या रॉकेटाच्या आराखड्यात अधिक सुधारणा करून व रॉकेटाची सैद्धांतिक तत्त्वे आणि अवकाश प्रवासाची शक्यता प्रतिपादन करणारा प्रबंध त्यांनी तयार केला. हा प्रबंध त्यांनी हायड्लबर्ग विद्यापीठास डॉक्टरेटसाठी सादर केला, तथापि तो नाकारण्यात आला. द्रव ऑक्सिजनाचा इंधन म्हणून उपयोग, अंतर्गत दाबाने इंधन टाक्यांची मजबुती, निलंबित (लोंबकळत्या) वजनांच्या आधारे दिशा नियंत्रण, प्रवेगाच्या प्रमाणात विद्युत् प्रवाह उत्पन्न करून त्याद्वारे वेग नियंत्रण व ॲमीटरद्वारे वेग दर्शविणे इ. अनेक सूचना त्यांनी त्यावेळी केल्या होत्या व त्या हल्लीच्या रॉकेटांत प्रचारातही येत आहेत. १९२३ मध्ये त्यांनी आपला प्रबंध Die Rakete zu den Planetenraumen (आंतरग्रहीय अवकाशातील रॉकेट) या शीर्षकाखाली स्वत:च खर्च करून प्रसिद्ध केला. या ग्रंथात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून जाण्यासाठी आवश्यक असणारा वेग रॉकेटाला कशा प्रकारे मिळू शकेल याचे गणितीय विवेचन त्यांनी केले होते. विली लाय, कार्ल आउगुस्ट, फोन लाफेर्ट इ. शास्त्रीय विषयांवर लोकप्रिय स्वरूपाचे लेखन करणाऱ्या लेखकांनी ओबेर्थ यांच्या ग्रंथाला लोकप्रियता मिळवून दिली.

माध्यमिक शाळांतून गणित व भौतिकी शिकविण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा ते जून १९२३ मध्ये उत्तीर्ण झाले व नंतर शेसबुर्ख (१९२३–२४) आणि मेडियाश (१९२४—३८) येथील शाळांत त्यांनी अध्यापन केले. १९२९ साली  Wege zur Raumschiffahrt (अवकाश प्रवासाचा मार्ग) या ओबेर्थ यांच्या ग्रंथाला फ्रान्सच्या ज्योतिषशास्त्रीय संस्थेचे १०,००० फ्रँकचे रॉबेअर एस्नॉल्ट पेल्टियर आंद्रे हिर्श पारितोषिक मिळाले. त्यामुळे द्रवपरिचालित (द्रव इंधनावर चालणाऱ्या) रॉकेट मोटरींसंबंधी संशोधन करण्यास त्यांना मोठी आर्थिक मदत झाली. या ग्रंथात त्यांनी विद्युत् परिचालन व आयन रॉकेटांसंबंधी [→रॉकेट] विवेचन केलेले होते. अमेरिकेतील गॉडर्ड यांच्या कार्याबद्दल १९२२ पर्यंत व रशियातील त्सिओलकोव्हस्की यांच्या कार्याबद्दल १९२५ पर्यंत ओबेर्थ यांना कल्पना नव्हती. १९३२ मध्ये फ्रिट्स लांगे यांनी दिग्दर्शित केलेल्या Frau im Mond (चंद्रावरील स्त्री ) या चित्रपटासाठी रॉकेटची प्रतिकृती तयार करण्यासाठी ओबेर्थ यांनी मदत केली. त्या वेळी झालेल्या स्फोटामुळे त्यांचा डावा डोळा निकामी झाला.

व्हिएन्ना येथील तांत्रिक विद्यापीठात काही गुप्त संशोधनासाठी त्यांना १९३८साली बोलावण्यात आले. हे संशोधन व्ही-२ रॉकेटाच्या प्राथमिक अवस्थेसंबंधी होते. १९४० मध्ये त्यांना ड्रेस्डेन येथील तांत्रिक विद्यापीठात संशोधनासाठी बोलावण्यात आले. त्याच वर्षी त्यांना जर्मन नागरिकत्व मिळाले. १९४१ साली ते पेनेम्यूंडे येथील रॉकेट संशोधन केंद्रात गेले. तेथे त्यांनी व्ही-२ रॉकेटाच्या इंधन पंपासंबंधी संशोधन केले, तथापि त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा तेथे फारसा उपयोग करून घेण्यात आला नाही. १९४३ मध्ये घनपरिचालकयुक्त विमान विरोधी रॉकेटांच्या विकासासाठी त्यांना राइन्सडॉर्फ येथे पाठविण्यात आले.

जर्मनीचा पराभव झाल्यानंतर ते ऑगस्ट १९४५ पर्यंत अमेरिकन सेनेच्या कैदेत होते. १९४८ पर्यंत खाजगी शिक्षकाचे काम केल्यानंतर एक वर्ष ते स्वित्झर्लंडमध्ये राहिले. नंतर त्यांनी इटलीमध्ये नौदलासाठी घनपरिचालकयुक्त विमानविरोधी रॉकेटासंबंधी १९५०—५३ या काळात संशोधन केले. १९५५ साली ते अमेरिकेतील हंटस् व्हिल, अलॅबॅमा येथील रेडस्टोन आर्सेनलमध्ये मार्गनियंत्रित क्षेपणास्त्रांसंबंधी संशोधन करण्यासाठी गेले. तेथे जून १९५६ पर्यंत काम केल्यानंतर त्यांनी दोन वर्षे आर्मी बॅलिस्टिक मिसाइल एजन्सीमध्ये संशोधन केले. १९५८ मध्ये ते जर्मनीला परत गेले.

त्यांनी १९५४ साली लिहिलेल्या Menshen im Weltraum (अवकाशात मानवाचे गमन) या ग्रंथात  अवकाश उड्डाणासंबंधीच्या पुढील काही योजनांचे विवेचन केले. त्यांना अमेरिकन ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटीचा अवकाश उड्डाण पुरस्कार (१९५५) व अमेरिकन रॉकेट सोसायटीचा पेंड्रे पुरस्कार (१९५६) हे बहुमान मिळाले. जर्मन ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटीने १९५० मध्ये अवकाशगमनविज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील कार्याकरिता हेर्मान ओबेर्थ पदक सुरू केले आहे.

भदे, व. ग.