गाव्‌ मींग : (सु. १३०५ — ?). मंगोल राजवटीतील एक प्रसिद्ध चिनी नाटककार. सुमारे १३४५ मध्ये पदवी संपादन केल्यावर त्याने जजीआंग आणि फूक्येन प्रांतांत सरकारी नोकरी केली. पुढे युआन (मंगोल) राजसत्तेविरुद्ध बंडाळी सुरू होताच त्याने अनेक विद्वानांप्रमाणे नोकरीचा त्याग केला व लेखनाकडे लक्ष वळविले.

त्याची फी-फा-ज्यी  ही प्रसिद्ध संगीतप्रधान नाट्यकृती. ‘फी-फा’ हे वाद्य आपल्याकडील लहान सतारीसारखे असते. चिनी साहित्यात ज्यास दक्षिणेकडील नाट्य-पुनरुज्‍जीवन म्हणतात, त्यातील पाच प्रमुख नाटकांपैकी फी-फा-ज्यी  हे सर्वश्रेष्ठ नाटक होय. या नाटकाचा विषय तसा नवीन नव्हता. राजदरबारातील ऐश्वर्यप्राप्तीनंतर आपल्या कुटुंबियांना विसरून गेलेल्या नायकाच्या पत्‍नीचे त्यागमय व कष्टपूर्ण जीवन त्यात रंगविले आहे. फी-फा हे वाद्य वाजवीत ती पतीच्या शोधात वणवण करते. पुढे त्याची भेट झाल्यावर तो सुरुवातीस तिचा धिक्कार करतो. या नाटकाचे सुखान्त पर्यवसान मात्र काहीसे कृत्रिम वाटते. तथापि तत्कालीन चीनमध्ये शोकपर्यवसायी नाटकांची प्रथा नसल्यामुळे ते संकेतजन्य ठरते. कालिदासाच्या शाकुंतल  नाटकातील संविधानकाशी प्रस्तुत नाट्यकथेचे साम्य दिसते. दक्षिणेकडील चिनी नाट्य-पुनरुज्‍जीवनास शाकुंतलासारख्या भारतीय नाटकांचा प्रभाव कारणीभूत आहे, असे एक मत आहे.

  जुंग, यान (इं.) जाधव, रा. ग. (म.)