ग्लिरीसीडिया सेपियम : (इं. मदर ऑफ कोको कुल-लेग्युमिनोजी). हा सु. २० मी. उंचीचा पानझडी वृक्ष मूळचा ग्वातेमालामधील (मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग) असून १९०० च्या सुमारास वेस्ट इंडिजमधून श्रीलंकेत आणला गेला व पुढे पंधरा वर्षांनी त्याच्या रोपांपासून मुंबईत झाडे लावली गेली. तो जलद वाढणारा असून फुले अत्यंत शोभिवंत दिसतात त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अथवा बागेत लावतात. अमेरिकेत त्याच्या सालीची पूड तांदूळ किंवा मका यात मिसळून दिली असता उंदीर मरतात असे आढळले. याचे शास्त्रीय नाव ग्लिरीसीडिया हे स्पॅनिश-अमेरिकी नाव ‘माता-रॅतोन’चे ‘मूषकनाशी’ या अर्थाचे भाषांतर आहे. याची पाने संयुक्त विषमदली, पिसासारखी असून दले १५–१७ असतात जानेवारीनंतर पाने गळतात व फुलांच्या मंजऱ्या पानांच्या बगलेत येऊ लागतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (व पॅपिलिऑनेटी उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. फुले गुलाबी, जांभळट किंवा निळसर अशी वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत दिसतात ती पतंगरूप [ अगस्त्यासारखी → अगस्ता ] असतात. शिंबा (शेंग) चपटी, लांब (१० – २० x १·८ सेंमी.) पण अरुंद असून तीत सु. दहा चपट्या बिया असतात. पानांपासून हिरवळीचे खत बनवितात. नवीन लागवड बिया व कलमे लावून करतात कॉफी व कोकोच्या झाडांना सावलीकरिता लावतात. पाने, साल व बिया विषारी असतात.
पहा : वनस्पति, विषारी.
महाजन, श्री. द.
“