दर्गा शरीफ, अजमीर.

चिश्ती, ख्वाजा मुईनुद्दीन : (सु. ११४२ – १२३६). ‘चिश्तिया’ नावाच्या सूफी पंथाचे संस्थापक व प्रसिद्ध सूफी संत. संपूर्ण नाव मुईन अल्-दीन हसन चिश्ती. जन्म अरबस्तानात सेस्तान येथे. वयाच्या पंधराव्या वर्षी वडील वारल्यावर खोरासानमध्ये काही काळ भटकून ते बगदादला गेले. तेथे त्यांची नज्म अल्-दीन कुब्रा, सुऱ्हावर्दी, औहद अल्-दीन किरमानी इ. तत्कालीन प्रख्यात सूफी संतांशी गाठ पडली. ११९३ मध्ये ते दिल्लीस आले आणि नंतर थोड्याच अवधीत अजमीर येथे गेले. तेथेच ते शेवटपर्यंत होते. अजमीर येथे त्यांची कबर असून रजब महिन्याच्या एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत दर वर्षी त्या निमित्त मोठा उरूस भरतो. तेथे त्यांचा सुंदर दर्गा उभारला असून अकबर बादशाह (१५४२ – १६०५) तेथपर्यंत दर्शनासाठी पायी चालत गेल्याचे सांगतात. आजही भारत-पाकिस्तानातीलच नव्हे, तर ब्रह्मदेश, श्रीलंका, आफ्रिका इ. ठिकाणचे अनेक हिंदु-मुस्लीम या उरूसासाठी तेथे येतात.

 

सलीम चिश्ती हा सूफी संत अकबरकालीन असून त्याचा दर्गा फतेपुर सीक्री येथे आहे. तोही मोठी मान्यता पावलेला सूफी संत होता. इतरही अनेक चिश्ती संत वंदनीय मानले जातात.

ख्वाजा मुईनुद्दीन हे भारतातील पहिले सूफी संत म्हणून प्रसिद्धीस आले. घोरी राजवट स्थापन करण्यास त्यांनी खूप मदत केली होती. त्यांना ‘आफताब-इ मुल्क-इ हिंद’ (हिंदुस्थानचा सूर्य) असा किताब होता.

करंदीकर, म. अ.