चिली पाइन : (इं. मंकी पझल लॅ. ॲरॉकॅरिया ॲरॉकॅना, ॲ. इंब्रिकॅटा कुल-ॲरॉकॅरिएसी). हा उंच शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्ष मूळचा चिली, ब्राझील व ऑस्ट्रेलिया ह्या देशांतील असून याची लागवड जगातील अनेक थंड प्रदेशात केली आहे. चिलीमधील ॲराउको जिल्ह्यात चिली पाइनचा शोध प्रथम लागल्याने याचे लॅटिन वंशनाम ॲरॉकॅरिया पडले. भारतात याची लागवड उद्यानांतून केलेली आढळते. हिमालय व निलगिरी येथे विशेषेकरून हा दिसतो. याचा समावेश शंकुमंत वनस्पतींच्या गणात [→ कॉनिफेरेलीझ वनस्पती, प्रकटबीज] केला आहे. हा वृक्ष जास्तीत जास्त ४५ मी. पर्यंत उंच वाढतो व मुख्य खोडापासून मंडलाकार निघणाऱ्या फांद्या बऱ्याच लांब व आडव्या पसरतात हा वृक्ष भव्य आणि सदापर्णी असल्याने शोभा व सावली देतो. पाने गर्द हिरवी, लहान, ताठर, चपटी, तीक्ष्ण टोकदार व २·५-५सेंमी. लांब असतात. शंकू (सूचिपर्णी वृक्षाचा गोलसर त्रिकोणी प्रजोत्पादक अवयव) एकलिंगी असून अनेक सारख्या प्रजोत्पादक अवयवांचा मोठा, गोलाकार शंकू बनतो (२०–२२ X १८–२० सेंमी.). याचे लाकूड कठीण व टिकाऊ असते. स्त्री-शंकूतील प्रत्येक खवल्यांवरचे बी खाद्य असते द. अमेरिकेतील काही आदिवासी ते खातात. याच्या वंशातील एक दुसरी जाती नॉरफॉक आयलंड पाइन (ॲ. एक्सेल्सा ) ही कुंडीत वाढवून घरात शोभेकरिता ठेवतात.
बन्या-बन्या पाइन हे नाव ॲ. बिडविली या क्वीन्सलँडमधील (पण श्रीलंकेत प्रसार झालेल्या) ४५–६२ मी. उंच वृक्षाला दिले आहे. या जातीही भारतात बागेत लावलेल्या आढळतात दोन्ही जाती – मंकी पझल व बन्या-बन्या पाइन – कणखर असतात.
पहा : ॲरॉकॅरिया.
मुजुमदार, शां. ब.
“