चिमकेंट : रशियाच्या कझाकस्तान प्रजासत्ताकातील चिमकेंट ओब्लास्टची राजधानी. लोकसंख्या २,५६,००० (१९७१). हे ताश्कंदच्या उत्तरेस १२० किमी.वर तिएनशान पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी एका मरूद्यानात वसलेले आहे. याच्या आसपास ओलीतावर कापूस, फळे आणि धान्ये पिकवितात परंतु याचे महत्त्व येथील शिसे गाळण्याच्या भट्ट्यांमुळे व जवळपासच्या फॉस्फेट खनिजांपासून फॉस्फरस संयुगे बनविणाऱ्या रासायनिक कारखान्यामुळे रशियाचे एक मोठे औद्योगिक केंद्र म्हणून अधिक आहे. नैसर्गिक वायूच्या शक्तीवर येथील कारखाने चालतात. चीनच्या रेशीमरस्त्यावरील हे शहर कोकंदच्या खानाकडून १८६४ मध्ये रशियाकडे आले. येथे धातुकाम, कापूस पिंजणे, फळे टिकविणे, धान्य दळणे इ. उद्योग असून शिक्षक महाविद्यालय, बांधकाम व्यवसाय शाळा, संग्रहालय व जुने अवशेष आहेत.  

लिमये, दि. ह.