चिनीभाषा : चिनीभाषा ही ⇨सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे.

चिनी ही बहुतांश चीनची भाषा असून तिच्यात अनेक पोटभेद आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा भेद उत्तरेकडील अर्ध्या भागात असून त्याला ‘मँडरीन चिनी’ हे नाव आहे. त्यातही अनेक बोली आहेत. यांगत्से नदीच्या मुखाभोवती ‘वू’ बोली बोलल्या जातात आणि त्यांपैकी ‘सुचाउ’ ही विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे किनाऱ्याच्या बाजूला बोलींची फार विविधता आढळते. या सर्व बोलींना ‘कूक्येन’ हे समूहवाचक नाव असून प्रत्येक बोली तिच्या प्रदेशातील महत्त्वाच्या शहराच्या नावाने ओळखली जाते. मध्यवर्ती प्रदेशात ‘हाक्का’ ही बोली असून तिच्या दक्षिणेकडील बोली ‘कँटनीज’ या नावाने ओळखल्या जातात.

साधारणपणे देण्यात येणारे वर्णन उत्तरेकडील प्रमाण बोलीचे असते. चिनी बोली परस्परांपासून इतक्या भिन्न आहेत, की दक्षिणेकडची चिनी आणि उत्तरेकडची चिनी या वस्तुतः अगदी भिन्न भाषा आहेत आणि हेच विधान इतर अनेक बोलींनाही लागू आहे. पण चिनी भाषेतील शब्द एकावयवी व विकारशुन्य असल्यामुळे आणि चिनीलिपी ही अर्थचित्रणात्मक असल्यामुळे या लिपीतील मजकूर कोणत्याही भागातील चिनी मनुष्य स्वतःच्या उच्चारानुसार वाचू शकतो. घोड्याचे चित्र पाहून ज्याप्रमाणे मराठी माणूस ‘घोडा’, फ्रेंच माणूस ‘शव्हाल’, इंग्रज ‘हॉर्स’, जर्मन ‘प्फेर्ट’, रशियन ‘लोशाद्’ याप्रमाणे त्याचे ध्वनिसंकेतांत रूपांतर करेल, तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे बोली वेगळ्या असूनही त्या सर्वांना हे एकच लेखन उपयोगी पडू शकते. ज्यांची भाषिक रचना चिनीप्रमाणेच आहे, अशा ॲनमाइटसारख्या बोलींनाही ही लिपी उपयुक्त ठरते आणि अशा प्रकारच्या बोली असणाऱ्या सर्व भाषिक समाजांतील व्यक्तींत तोंडी व्यवहार होणे अशक्य असले, तरी लेखी व्यवहार सहज होऊ शकतो.

ध्वनिविचार : चिनी भाषेची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : मूलभूत  स्वर अ, आ, इ, ए, उ, ऑ, व उ‍ॅ असे सात आहेत. उ‍ॅ हा स्वर ओठ गोलाकृती ठेऊन ‘इ’ या स्वराची उच्चारक्रिया केल्याने मिळतो.

याशिवाय आइ, आउ, इउ, एइ, उआ, उय, आउ, उ‍ॅआ हे स्वरसंयोग आहेत.

व्यंजने : स्फोटक : क, ख, त, थ, प, फ

             अर्धस्फोटक : च, छ, च, ज, झ.

             अनुनासिक : ङ, न, म.

             पार्श्विक : ल

             घर्षक : फ, श, स, स्स.

             अर्धस्वर : य, व.

चिनी भाषा ही एकावयवी शब्दांनी बनलेली आहे. हा शब्द सामान्यतः व्यंजन + स्वर अशा स्वरूपाचा असतो. शब्दान्ती न् किंवा ङ् ही अनुनासिके मात्र कित्येकदा आढळतात. एकावयवी शब्दान्ती संख्या अर्थातच अत्यंत मर्यादित असणार, पण ही उणीव शब्दावरील आघातांनी भरून काढलेली आहे. हे आघात चार आहेत, म्हणजे एकंदर शब्दसंख्या ध्वनींच्या संयोगाने मिळणाऱ्या शब्दांच्या चौपट बनते.

हे आघात तीव्रतादर्शक नसून स्वरातील घोषत्त्वाशी संबंधित आहेत. घोषाचे वैशिष्ट्य स्वरनलिकांच्या कंपनाची गती हे असते. ती वाढविता येते, सावकाश किंवा एकदम खाली नेता येते किंवा आहे तशीच ठेवता येते. या गतीला ‘रोह’ हे नाव असून ती वाढविता येणारी असल्यास ‘आरोह’ सावकाश खाली जाणारी असल्यास ‘अवरोह’, एकदम खाली जाणारी असल्यास ‘अधोरोह’ आणि न बदलणारी असल्यास ‘समरोह’ या नावांनी ओळखली जाते. या चारही रोहांचा उपयोग चिनी भाषेत आढळतो. समरोह, आरोह, अवरोह व अधोरोह हे लिप्यंतरात शब्दापुढे १, २, ३, ४, हे आकडे लिहून दाखविता येतात. उदा. मा ‘बेडूक’, मा ‘सण’ (ज्यूट)’ मा३ ‘घोडा’, मा ‘कोलंबी’.

वस्तुतः रोहतत्त्व कमी अधिक प्रमाणात सर्वच भाषा वापरतात. मराठीत ‘तो आला’ हे विधान व ‘तो आला?’ हा प्रश्न यांच्यातील फरक रोहतत्त्वाचा वापर केल्यानेच स्पष्ट होतो. पण चिनी भाषेत प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट रोह असतो आणि रोहानेच एरवी ध्वनिदृष्ट्या पूर्ण साम्य असलेल्या शब्दांचा अर्थ निश्चित होतो. म्हणजेच स्वर किंवा व्यंजन यांच्याप्रमाणेच प्रत्येक शब्दाचा रोह हा त्याचा अविभाज्य घटक असतो.

शब्दांचे वर्गीकरण : वस्तुतः आपण ज्यांना व्याकरणदृष्ट्या वर्ग असे म्हणतो, ते भेद चिनी शब्दांत आढळत नाहीत. संबंधदर्शक शब्दाप्रमाणे वापरली जाणारी ती क्रियापदे आणि शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापरली जाणारी ती नामे, असा एक भेद मानण्याचा प्रघात आहे. आधुनिक व्याकरणकार यात दोन भेदांना मान्यता देतात.

प्राचीन चिनीप्रमाणे आधुनिक चिनीतही नाम व क्रियापद यांत कोणताही भेद नाही. कारण एकच शब्द कधी नामाचे, तर कधी क्रियापदाचे कार्य करतो. पण प्रत्येक शब्द स्वाभाविकपणे वस्तुदर्शक आणि क्रियादर्शकही असतो, असा याचा अर्थ नव्हे. आपल्याला केवळ नामासारखे वाटणारे प्राणिवाचक, वस्तुवाचक, शरीरावयववाचक शब्दही क्रियादर्शक वाटतील, अशा प्रकारे वापरता येतात आणि आपल्याला क्रियावाचक वाटणारे शब्दही वस्तुवाचक अर्थ व्यक्त करू शकतात. हे सर्व करताना आपल्यासमोर भाषांतरित रूपात आपल्या बोलीत असणारे त्या शब्दाचे ‘रूप’ असते. पण अशी रूप ही कल्पना चिनी भाषेत मुळातच नाही.

सर्व वस्तुवाचक शब्द क्रियावाचकासारखे वापरता येतील असे नाही. निउ ‘स्त्री’ हा केवळ वस्तुवाचक आहे, तर जेन् ‘पुरुष’ हा क्रियावाचकाप्रमाणे वापरता येतो. मा ‘घोडा’ हा केवळ वस्तुवाचक आढळतो. तर न्येओउ ‘बैल’ व लांग् ‘लांडगा’ हे उभयवाचक आहेत. त्यांचे अर्थ ‘बैलाप्रमाणे चालणे’ अथवा ‘मूर्खपणाने वागणे’ आणि ‘लांगड्याप्रमाणे वागणे’ किंवा ‘फसवणे’ असे होऊ शकतात.

गुणवाचक शब्द क्रियापदे असतात. पांढरा म्हणजे पांढरा हो-कर-चांगला म्हणजे चांगला-हो-इत्यादी.

हे सर्व शब्द कोणताही विकार न होता केवळ वाक्यरचनेच्या संदर्भात विशिष्ट कार्य (नाम, क्रियापद इ.) करीत असल्यामुळे, चिनी भाषेत व्याकरणदृष्ट्या शब्दांचे वर्गीकरण करणे अप्रस्तुत आहे, हे सिद्ध होते.

  

परंतु शब्दांचे परस्परसंबंध हा वर्गीकरणाचा प्रकार होऊ शकतो. हे संबंध निश्चयवाचक व दिग्दर्शक असे दोन प्रकारचे असून ते क्रमनिष्ठ आहेत. निश्चयवाचक निश्चित होणाऱ्या शब्दापूर्वी येतो, तर दिग्दर्शक नंतर येतो. हे दोनच प्रकार असण्याचे कारण हे की भाषा ही रेषात्मक असल्यामुळे एखादा शब्द कोणत्या तरी शब्दापूर्वी येईल वा नंतर येईल. एखादा शब्द क्रियापद किंवा नाम म्हणून कार्य करतो अशी जी आपली भावना होते ती आपल्या भाषेच्या व्याकरणाच्या प्रभावातून आपण सुटू शकत नसल्यामुळे होते. मात्र शब्दाची वस्तुवाचकता, गुणवाचकता, क्रियावाचकता इत्यादींसाठी नाम, विशेषण, क्रियापद इ. संज्ञा सोयीच्या असल्यामुळे, चिनी भाषेचे विकाररहित शब्द वापरण्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेऊन त्यांचा उपयोग करणे योग्य ठरेल.


वरील कारणामुळेच लिंग, वचन, काळ, अर्थ इ. कल्पनाही या भाषेत येऊ शकत नाहीत. म्हणून व्याकरणाचे इतर काही नियम न देता नमुन्यादाखल काही शब्द व वाक्ये देणे योग्य होईल :

‘एक’ – ति -इ ‘पहिला’

एर्ह ‘दोन’, ल्याङ, ‘दोन (जोडी)’  – ति -एर्ह ‘दुसरा’

सान ‘तीन’  -ति-सान ‘तिसरा’

स्सु ‘चार’ – ति – स्सु ‘चौथा’

वु ‘पाच’- ति– वु ‘पाचवा’

वो ‘मी’ : वो मेन ‘आम्ही’

नी ‘तू’ : नी-मेन ‘तुम्ही’

था ‘तो – ती – ते’ : था – मेन ‘ते -त्या- ती’

वो – मेन – ति ‘आमचा’

नी – मेन ति- ‘तुमचा’

था१ – ति ‘त्याचा’

वोयाओ माइ(मी इच्छा- अस- विक-) ‘मला विकायचं आहे’.

वो याओ माइ (मी इच्छा – अस – खरीद –) ‘मला विकत घ्यायचं आहे’.

वो पु याओ (मी न इच्छा – अस– ) ‘मला नको’.

था लाइ ल्याओ (तो ये – समाप्त) ‘तो आला’.

काओ – सु था (सांग – तो ) ‘त्याला सांग’.

था मेइ लाइ (तो न ये – ) ‘तो येणार नाही’.

नी – मेन मिङ- पाइ मो (तुम्ही समज – का) ‘तुम्हाला समजतं का?’

चुङ – कुओ ‘चीन’

हु्आ ‘बोलण’

नी हुइ४ शुओ१ चुङ – कुओ हुआ मो (तुम्ही शक्य बोल – चीन बोलणं का) ‘तुम्हाला चिनी भाषा बोलता येते का?’

संदर्भ : 1. Encyclopedie Francaise, Tome I, Paris, 1937.

           2. Whymant, A. N. J. Colloquial Chinese, London, 1942.

कालेलकर, ना. गो.