चिद्विलासवाद : मराठी संत ज्ञानेश्वर यांच्या तत्त्वज्ञानास ‘चिद्विलासवाद’ असे नाव दिले जाते. चित् म्हणजे जाणीव अथवा चैतन्य. विश्वातील नाना पदार्थांच्या रूपाने एकच चैतन्य विनटलेले आहे, हा त्या तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती विचार आहे. ‘आत्मलीलावाद’, ‘स्फूर्तिवाद’, ‘स्फुरणवाद’ अशी आणखीही नावे ज्ञानेश्वरांच्या एतद्विषयक शब्दरचनेतून सुचण्यासारखी आहेत. ज्ञानेश्वरी, चांगदेवपासष्टी इ. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांत चिद्विलासवादाचा विचार विखुरलेला आहे पण अनुभवामृत अथवा अमृतानुभव या त्यांच्या ८०० ओव्यांच्या ग्रंथात परमतखंडनपूर्वक, पारंपरिक शास्त्रीय पद्धतीने चिद्विलासवादाची मांडणी त्यांनी केलेली आहे. हा स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानदेवांचा पूर्णोद्गार आहे. तो उद्गार अनुभवातून उमटला आहे. ते स्वतः आपल्या रचनेस ‘सिद्धानुवाद’ म्हणतात. त्याचा अर्थ ‘जे अनुभवाने सिद्ध झाले आहे, त्याचा अनुवाद’ असा होऊ शकेल.
चिद्विलासवाद हा मूलतः अद्वय-अनुभववाद आहे. सर्वत्र केवळ आत्मत्त्वाचे स्फुरण आहे अन्य काहीच नाही, असा हा सिद्धांत आहे. आत्मरूप स्वयंवेद्य, शब्दातीत आणि नित्य आहे. शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, द्रष्टा आणि दृश्य हे द्वैतमिषाने पतकरलेले भेद एकमेकांस गिळतात व त्यांतून आत्मसुखाचे सामरस्य निर्माण होते. सामरस्याचा हा आनंद अणु-अणूंत भरून राहिला आहे. व्यष्टिपिंडाने समष्टिपिंडाचा ग्रास केला, जीवत्व शिवत्वात मुरविले, म्हणजे केवळ अद्वयानंद उरतो. त्यावेळी अनुभवात ज्ञाता, ज्ञानविषय आणि ज्ञान अशी त्रिपुटी न राहता एकरस अमृत अनुभव शिल्लक राहतो. तीच एक वस्तू अथवा अंतिम तत्त्व होय. अशेष जग ही त्या एका वस्तूची प्रभा होय.
हे तत्त्वज्ञान अद्वैती असले, तरी ⇨ शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाहून ते फारच भिन्न किंबहुना विरोधी आहे, असे एक मत मुख्यतः पंडित बाळाचार्य खुपेरकर यांनी प्रतिपादिले आहे. याला मुख्य आधार म्हणजे अनुभवामृतात जागोजागी अज्ञानाचे अथवा अविद्येचे खंडन केले आहे, हे होय. शांकर अद्वैत मतात ब्रह्मच तेवढे सत्य आहे आणि जग मिथ्या असून ते अविद्येचे अथवा मायेचे कार्य आहे, असे मानलेले आहे. जगास अविद्याकार्य म्हणणे म्हणजे वंध्यापुत्रास गगनपुष्पाच्या माळा घातल्या असे म्हणण्यासारखे आहे, असे ज्ञानेश्वरांचे उद्गार आहेत, त्यांनी जगास मिथ्या मानले नाही. जग ही सद्वस्तूची प्रभा आहे, आत्म्याचे स्फुरण आहे, चैतन्याचा विलास आहे. शंकराचार्यांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थाचा निरास करते. ज्ञानेश्वरांचे अद्वैत हे द्वितीय पदार्थाच्या सामरस्याने निर्माण होते, असे ते लिहितात. हा फरक पडतो याचे कारण ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा वेगळी आहे. ते नाथपंथीय होते. नाथपंथीय तत्त्वज्ञान काश्मीरी शैवमताशी जुळणारे आहे [⟶ काश्मीर शैव संप्रदाय]. या अभिप्रायाने ते आपल्या मतास ‘शांभवाद्वयानंदवैभव’ असे नाव देतात. शंकराचार्यांच्या जगन्मिथ्यावादी अद्वैताहून हा अद्वयवाद निराळा आहे.
ज्ञानेश्वर हे प्रतिभावान पुरुष असल्यामुळे त्यांच्या विचारात काही नवेपणा असणार, हे उघड आहे. तसेच शं.दा. पेंडसे म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांचा विचार हा शांकर अद्वैत मताशी सर्वस्वी एकरूप नाही पण पं. खुपेरकर, न.र. फाटक इ. मंडळी सुचवितात त्याप्रमाणे तो विचार शांकर अद्वैताच्या विरोधीही नाही. शांकरमत सामावून घेऊन अद्वैतावर भक्ती व कर्म यांचे कलम चिद्विलासवादाने केलेले आहे. हे मत शं. वा. दांडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रभृतींनी मांडलेले आहे.
केवलाद्वैत मतात खुद्द शंकराचार्यांपासून मधुसूदन सरस्वतींपर्यंतच्या धुरंधरांनी अंतिम दृष्टीतून अविद्येचे खंडन केलेले आहे. ब्रह्मानुभवाच्या अपेक्षेने ज्ञान, अज्ञान, बंध, मोक्ष इ. सर्व अर्थविधा निरर्थक आहेत, हे म्हणणे शांकर वेदान्तास सहज मान्य होण्यासारखे आहे. पण विचार समजावून देताना दर खेपेला अंतिम भूमिका घेणे सोईचे नसते. ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ या वाक्यास पायाभूत मानणाऱ्या ⇨केवलाद्वैतवादी वेदान्तास विश्व हा चैतन्याचा विलास आहे, हे स्वीकारण्यात कठीण ते काय आहे? पण माणसास जगाचा ज्या रीतीने प्रत्यय येतो, त्यास चैतन्यविलास कसे म्हणावे? तो जडात्मक असतो. म्हणून त्यास मिथ्या म्हणावयाचे. त्या मिथ्या जगाची उपपत्ती देता यावी म्हणून मायेची वा अविद्येची कल्पना करावयाची. विचारव्यवस्थेची ही एक रीत आहे.
अनुभवामृतातील प्रमुख दृष्टिकोन अंतिम तत्वाचा आहे. अज्ञान खंडन व चिद्विलास किंवा आत्मलीला असे अंतिम दृष्टीचे दोन भाग आहेत. मायावादाची मध्यम दृष्टी अलीकडची पायरी म्हणूनच येथे आली आहे. अज्ञानखंडन हा अंतिम दृष्टिकोनातील पहिला महत्त्वाचा भाग असून त्याच्या आधारावरच चिद्विलासवाद हा दुसरा भाग उभारलेला आहे. अज्ञानखंडनाच्या बाबतीत ही अंतिम दृष्टी शांकर मताशी पूर्ण जुळणारी आहे परंतु चिद्विलासाची उपपत्ती शांकर वेदान्तात कोठेही स्पष्ट स्वरूपात आलेली नाही. हा एक नवा विचार ज्ञानेश्वरांनी मांडला. हा विचार ⇨योगवासिष्टात व काश्मीर शैव दर्शनात आला आहे तथापि त्याची तर्कशुद्ध मांडणी ज्ञानेश्वरांनीच मुख्यतः केली आहे. अनुभवामृताचे सातवे प्रकरण अज्ञानखंडनाच्या आधारे चिद्विलासवाद मांडते. अनुभवामृत या ग्रंथाचा हाच मध्यवर्ती सिद्धांत आहे. चिद्विलासवादावर पुष्कळच अनुकूल-प्रतिकूल चर्चा झाली आहे. ज्ञानेश्वर मायावाद स्वीकारतात व ते तो अमान्य करतात, असे दोन पक्ष विद्वानांत आहेत. यामुळे हा वाद संपत नाही. मायावाद ही मध्यम दृष्टी व मायाखंडन ही अंतिम दृष्टी होय, असे मानले म्हणजे ज्ञानेश्वर मायावादी आहेत की नाहीत, असा वाद करण्याचे कारण उरत नाही.
भारतीय तत्त्वज्ञानात कर्म, ज्ञान व वैराग्य ह्या योगांचा भक्तीत अंतर्भाव करून ती अंतिम निष्ठा म्हणून सुसंगत रीतीने मांडण्याचे श्रेय ज्ञानेश्वरांकडे जाते. त्यांनी हे सर्व भक्तीचे अंतर्गत अंश आहेत, ही गोष्ट वैचारिक संगती दाखवून प्रथम मांडली. भक्ती व कर्म यांचे समर्थन विश्व सत्य मानणारा चिद्विलासवादच करू शकतो, असे भाष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले आहे.
या व्यवस्थेत जगत्, जगदीश्वर, भक्त इ. गोष्टी मिथ्या या सदरात पडल्यामुळे भक्तीस थोडी गौणता येते हे खरे. जगन्मिथ्यावादामुळे वैयक्तिक वा सामाजिक कर्मासंबंधी पुरेसा उत्साह निर्माण न होण्याचीही शक्यता आहे. भक्तीचा उत्कर्ष साधावा, कर्मयोगास बळ मिळावे, यांसाठी ज्ञानेश्वरांनी जगास मिथ्या न म्हणता आत्म्याचे स्फुरण मानले. हा विचार शांकर मताशी अविरोधी असला, तरी स्पष्टपणे तेथे तो तसा आला नाही. योगवासिष्ठात व काश्मीर शैव दर्शनात तो आला आहे. परंतु अनेक उत्तम दृष्टांतांच्या साहाय्याने त्याची तर्कशुद्ध मांडणी ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केली आहे, रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याचा स्थायीभावही चिद्विलासवाद आहे, असे म्हणता येईल.
ज्ञानेश्वरांचे चिद्विलासवादी तत्वज्ञान संगृहीत असलेल्या अनुभवामृत ह्या ग्रंथावर संस्कृतमध्ये सहजानंदी टीका तसेच प्रल्हादबोवा बडवेकृत समश्लोकी व जीवन्मुक्तयतिकृत पदबोधिनी ह्या व्याख्या उपलब्ध आहेत. मराठीतही ह्या ग्रंथावर अनेक विवरणात्मक टीका आहेत.
पहा : ज्ञानेश्वर.
संदर्भ : १. गोखले, वा.दा. संपा. अनुभवामृत, पुणे, १९६८.
२. खुपेरकर, बाळाचार्य माधवाचार्य, श्रीज्ञानेश्वर वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास, पुणे, १९६० .
३. सरदार, गं. बा. संपा. महाराष्ट्र जीवन, भाग-१, प्रकरण-४·२, पुणे, १९६०.
दीक्षित, श्री. ह.