चित्ता

चित्ता : सिंह, वाघ, बिबळ्या इ. प्राण्यांप्रमाणेच चित्ता हा मार्जारकुलातील (फेलिडी) एक प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव सिनोनिक्स जुबेटस  आहे. आफ्रिकेचा बहुतेक भाग आणि भारतात तो आढळतो. भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडींमधून तो भारतात आला आणि उत्तर व मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि पायथ्याच्या टेकड्यांत तो स्थायिक झाला. तेथून तो दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पसरला. चित्ता दाट गवताळ रानात राहतो, पण सपाट उघडा प्रदेश त्याला जास्त आवडतो.

शीर्षासह याच्या शरीराची लांबी १·४-१·५ मी., शेपटीची लांबी ०·६–०·७५ मी., खांद्यापाशी उंची सु. १ मी. आणि वजन सामान्यतः ५०–६५ किग्रॅ.असते. शरीराच्या वरच्या भागाचा रंग पिंगट किंवा फिक्कट पिवळा आणि खालच्या भागाचा पांढरा असतो. सगळ्या अंगावर दाट काळे ठिपके असतात. त्याप्रमाणेच प्रत्येक बाजूला डोळ्यापासून निघून तोंडापर्यंत गेलेला एक काळा पट्टा असतो. चित्त्याचे पाय बरेच लांब असतात डोके लहान व वाटोळे असते कान लहान असतात डोळ्यातील बाहुली वाटोळी असते. पायावरील नख्या बोथट, किंचित वाकड्या व अंशतः प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणाऱ्या) असतात त्यांच्यावर आवरण नसल्यामुळे त्या उघड्या असतात.

चित्त्याचे मुख्य भक्ष्य कुरंग आणि इतर लहान हरणे हे होय. परंतु सशांएवढे लहान सस्तन प्राणी आणि पक्षीही तो खातो. चित्ता वासावरून शिकार करीत नाही, तर सावज प्रत्यक्ष पाहून त्याचा पाठलाग करून त्याची शिकार करतो. सामान्यतः दिवसाउजेडीच तो शिकार करतो, पण चांदण्या रात्रीही तो शिकारीकरिता बाहेर पडतो असे म्हणतात. याची शिकार करण्याची रीत काहीशी मांजरासारखी, तर काहीशी कुत्र्यासारखी असते. भक्ष्याचा पाठलाग करताना याचा वेग ताशी सु. ७२ किमी. असतो आणि तो ३६६ मी. अंतरापर्यंत टिकून राहतो. या असामान्य वेगाचे मुख्य कारण म्हणजे हरणांसारखे अतिशय चपळ प्राणी त्याला पकडावयाचे असतात.

भारतात अनेक शतके शिकारी लोकांनी चित्ता माणसाळवून, पाळून त्याला शिकार करण्याचे शिक्षण देऊन शिकारीकरिता त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. शिकारी लोक शिकारीच्या वेळी पाळीव चित्त्यांना त्यांचे डोळे बांधून बरोबर नेतात. एखादा हरणांचा कळप दुरून येताना दिसला की, चित्त्याचे डोळे सोडतात व त्याला तो कळप दाखवितात. अतिशय वेगाने धावून चित्ता आपली शिकार पकडतो. याचा मोबदला म्हणून सावजाचे रक्त एका थाळीत गोळा करून ते चित्त्याला देतात.

याच्या प्रजोत्पादनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. गर्भावधी ८४–९५ दिवसांचा असतो. मादीला एका खेपेला २–४ पिल्ले होतात.

चित्ता भारतातून हल्ली पूर्णपणे नामशेष झाला आहे, असा समज आहे.

कानिटकर, बा. मो.