कॅरिब भाषासमूह : अमेरिकन इंडियन लोकांच्या भाषांपैकी कॅरिब आणि तिच्याशी संबंधित अशा बोलींचे कुल. कॅरिबियन समुद्राच्या लगतचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा भाग आणि लेसर अँटिलीस बेटे ह्या भागांतून ह्या सु. ७०-८० बोली बोलल्या जातात. त्यांचा बारकाईने अभ्यास अजून झालेला नाही. कॅरिब, भाक्शी, माकीरितारे, त्रियो ह्या त्यांपैकी काही प्रमुख बोली. (मात्र ३०,००० लोकसंख्या असलेली महत्त्वाची अशी जी `आयलंड कॅरिब’ नावाची शेली आहे, ती कॅरिब समूहातील नसून आरावाक समूहात मोडते ती बोलणारा समाज कॅरिब जेते आणि आरावाक जित हयांच्या बांशिक मिश्रणाने तयार झाला आहे). ज्यावेळी यूरोपीय लोकांचा कॅरिब लोकांशी संपर्क आला, त्यावेळी ते काही प्रमाणात नरमांसभक्षक होते. इंग्लिश भाषेत हा शब्द अजूनही `नरमांसभक्षक’ हया अर्थाने वापरतात.

संदर्भ : 1. Taylor, D. On the Affiliation of Island Carib”, International Journal of American Linguistics, 23-297-302, Bloomington (Indiana), 1957.

             2. Voegelin, C. F. Voegelin, F. M. “Languages of the World”, Anthropological Linguistics, 7:7, Bloomington (Indiana) Oct. 1965.

केळकर, अशोक रा.