कॅरकल : मांसभक्षक सस्तन प्राण्याच्या फेलिडी कुलातला हा प्राणी असल्यामुळे त्याच कुलातील सिंह, वाघ, बिबळ्या, रानमांजर, लिंक्स इ. प्राण्यांचा हा जवळचा नातेवाईक आहे. याचे शास्त्रीय नाव फेलिक्स कॅरकल असे आहे.
भारतात कच्छमध्ये आणि पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश यांतील रुक्ष भागात तो आढळतो त्याचप्रमाणे आफ्रिकेचा बहुतेक भाग, मेसोपोटेमिया, अरबस्तान, इराण, बलुचिस्तान आणि सिंधमध्येही तो सापडतो. कच्छच्या उत्तर आणि वायव्य भागांतील डोंगरात कॅरकल विपुल आहेत असे म्हणतात निर्जन प्रदेश आणि झुडपांच्या जंगलात राहणारा हा प्राणी आहे. शरीराची लांबी ६० सेमी. पेक्षा थोडी जास्त आणि शेपटाची सु. २३ सेंमी. असते डोके रुंद असते कान लांब, उभे, काहीसे तिकोनी व टोकदार असून टोकांवर केंसाचे झुबके असतात. अंगावरचे केस लिंक्सच्याइतके नसले तरी दाट व मऊ असतात. वरच्या बाजूचा रंग लालसर करडा असून खालच्या बाजूकडे तो फिक्कट होत जातो खालची बाजू पिवळसर किंवा पांढरी असते खालच्या बाजूवर आणि कधीकधी पाठीवर अस्पष्ट ठिपके असतात. पुष्कळ बाबतींंमध्ये ⇨लिंक्सशी याचे साम्य असले, तरी याचा बांधा लिंक्सपेक्षा लहान असतो. याचे पाय लिंक्सप्रमाणेच लांब आणि मजबूत असतात. याचे शेपूट जास्त लांब असते चेहऱ्याभोवती लिंक्सप्रमाणे केसांची झालर नसते.
हा एक असामान्य प्राणी आहे. झुंकाडी देऊन नाहीसा होण्यात तो तरबेज आहे. याच्या सवयी, रानातील एकंदर वागणूक इत्यादींविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हरणे, मृग, ससे, पक्षी इ. प्राण्यांवर हा उपजीविका करतो. हा अतिशय चपळ असल्यामुळे पक्षी जमिनीवरून उडून जाण्याच्या आतच तो त्यांना पकडू शकतो.
हा प्राणी सहज माणसाळणारा आहे. चित्त्याप्रमाणेच याला शिकार करण्यासाठी शिकवून तयार करतात आणि हरणे, ससे, कोल्हे, पक्षी इत्यादींच्या शिकारीकरिता त्याचा उपयोग करतात.
याच्या प्रजोत्पादनाविषयी निश्चित अशी काहीच माहिती नाही. मादीला एके वेळी दोन ते चार पिल्ले होतात.
भट, नलिनी
“