ओहायओ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी उत्तर सरहद्दीवरील एक राज्य. क्षेत्रफळ १,०६,७६५ चौ. किमी., लोकसंख्या १,०६,५२,०१७ (१९७०). ३८० २७’ उ. ते ४१० ५७’ उ. आणि ८०० ३४ ’ प. ते ८४० ४९’ प. ओहायओच्या दक्षिणेस ओहायओ नदी व तिच्या पलीकडे वेस्ट व्हर्जिनिया व केंटकी राज्ये, पश्चिमेस इंडियाना राज्य, उत्तरेस मिशिगन राज्य व ईअरी सरोवर आणि पूर्वेस पेनसिल्व्हेनिया राज्य व ओहायओ नदी आणि तिच्या पलीकडे वेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. क्षेत्रफळाच्या द्दष्टीने पस्तिसावे परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेचे हे सातवे राज्य असून याची राजधानी कोलंबस आहे.
भूवर्णन : राज्याचे ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे साधारणपणे समांतर गेलेले तीन भौगोलिक पट्टे पडतात. पूर्वेला व आग्नेयीला १५५ ते ४३४ मी. उंचीचा डोंगराळ ॲलेगेनी पठारभाग आहे. मधला पट्टा सरासरी २४८ मी. उंचीचा ऊर्मिल प्रदेश असून, प्राचीन हिमनद्यांनी सपाट केल्यामुळे त्यात टेकड्या थोड्या आहेत. काही उंच टेकड्यांपैकी राज्यात सर्वोच्च (४८० मी. ) टेकडी कँबेल, नैर्ऋत्य कोपऱ्यात आहे. आग्नेय व दक्षिण सरहद्दींवरील ओहायओचा नदीकाठ सर्वांत सखल आहे. वायव्येचा पट्टा एकेकाळी ईअरी सरोवराच्या तळचा भाग असलेला उतरता मैदानी मुलूख आहे. पर्वतभागात निकस, मधल्या सपाट खोऱ्यात सुपीक आणि सरोवरांकाठी चुना व रेतीमिश्रीत गाळमातीची मृदा आढळते. राज्यात दगडी कोळशाचे साठे ८,००० कोटी टनांहून जास्त असून चुना व चिनी मातीचे उत्पादन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय राज्यात रेतीखडक, मीठ, पेट्रोलियम, ज्वलनवायू, जिप्सम आणि लोखंड सापडते. राज्याची अर्धी पूर्वसीमा व सबंध दक्षिणसीमा ओहायओ नदीने व्यापली असून, तिची सायोटो ही मुख्य उपनदी राज्याच्या मध्यभागातून उत्तर—दक्षिण वाहते.याशिवाय राज्याच्या पश्चिम भागाकडून दोन व पूर्व भागाकडून तीन उपनद्या ओहायओस मिळतात. मॉमी व सँडस्की या उत्तरवाहिनी नद्या ईअरी सरोवरास मिळतात. ओहायओतल्या ११० तळ्यांपैकी २७ नैसर्गिक असून बाकीची कालवे, साठवण व पूरनियंत्रणासाठी बनविलेली आहेत.राज्याला उत्तरेल सु. २५० किमी. लांबीचा ईअरी सरोवर किनारा लाभलेला आहे. राज्यातील हवामान सामान्यतः सौम्य असले, तरी हिवाळ्यात खूप थंडी व उन्हाळे बरेच गरम असणारे भाग राज्यात आहेत. ईअरी सरोवरामुळे त्याच्या काठचे तपमान आत्यंतिक नसते. दक्षिण भागात उन्हाळे काहीसे कडक असतात. पाऊस शेतीच्या जरूरीपुरता, आग्नेयीस जास्त, वायव्येत कमी पडतो.पावसाचा जोर मार्च ते जुलै अधिक असतो. किमान तपमान ०·६०, कमाल २४·२० व सरासरी ११·९० से. असून वार्षिक पर्जन्य ८६ सेंमी. आहे. राज्याच्या काही भागात संरक्षित वनप्रदेश असून समशीतोष्ण कटिबंधातील वनस्पती व प्राणी येथे आढळतात.
इतिहास व राज्यव्यवस्था : ‘मातीचे ढिगारे बांधणारे ’ इतिहासपूर्व आदिवासी या भागात इ.स.पू. ४०० ते इ.स. ९१० च्या दरम्यान होऊन गेल्याचे पुरावे सापडतात. इतिहासकालातले ईअरी इंडियन, गोरा माणूस इकडे प्रथम येईपर्यंत विखरून गेले होते व शॉनी, मायामी, देवावेर, वायांदो, तस्कॅरोरा व काही सेनेका या जमातींचे लोक ओहायओत होते. १६६९-७० मध्ये हा प्रदेश फ्रेंच समन्वेषक ल साल याने प्रथम पाहिल्यानंतर १६८२ मध्ये त्याने ओहायओसह सबंध मिसिसिपी खोऱ्यावर फ्रान्सचा हक्क सांगितला. केसाळ चामड्याच्या व्यापारामुळे ब्रिटिशांशी फ्रेंचाचे झगडे सुरू झाले. ब्लेनवीलने १७४९ साली पंधराव्या लुईचा अंमल इकडे जाहीर केला पण त्याला न जुमानता ब्रिटिशांनी ओहायओ लँड कंपनीला व्यापारास प्रोत्साहन दिले. १७५३ पर्यंत फ्रेंचांनी ओहायओ खोऱ्यात लष्करी बंदोबस्त पक्का केला आणि फोर्ट डूकेनजवळ १७५४ मध्ये सेनापती वॉशिंग्टनला त्याच्या व्हर्जिनियन फौजेसह शरण येण्यास भाग पाडले. १७५५ साली त्याच ठिकाणी ब्रॅडक याचाही पुरा पाडाव झाला आणि ब्रिटिशांचे फ्रेंचांशी सप्तवर्षीय (१७५६ – ६३) युद्ध चालू झाले. १७६३च्या पॅरिस तहाने कॅनडा व मिसिसिपीच्या पूर्वेचा प्रदेश ब्रिटिशांना मिळून फ्रेंचांचे अमेरिकन साम्राज्याचे स्वप्न संपले. त्यानंतर जमिनीबाबत व व्यपारातील ब्रिटिशांच्या अप्रामाणिक धोरणामुळे, फ्रेंचांच्या चिथावणीने इंडियनांनी बंड करून पाँटिॲकच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांचे नऊ किल्ले सर केले आणि डिट्रॉइट व फोर्ट पिट (पूर्वीचा डूकेन) ही मजबूत ठाणी धोक्यात आणली. बंडखोर जमातीच्या बंदोबस्ताला १७६४ पर्यंत अवधी लागला. ओहायओ प्रदेशात वसाहत करण्यास मनाई करणाऱ्या १७६३ च्या जाहिरनाम्याने आणि १७७४ च्या क्वीबेक कायद्याने ब्रिटिशांच्या व्यापारी निर्बंधांबद्दल धुमसणारा वसाहतकऱ्यांचा असंतोष पेटला. स्वातंत्र्ययुद्धाच्या थोड्या अगोदर जॉन मरी याच्या पुढाकराने १,१०० वसाहतकऱ्यांनी पॉइंट प्लेझंट येथे शॉनी इंडियनांच्या एका मोठ्या सैन्याशी लढाई दिली. तेव्हापासून इंडियनांशी सुरू झालेला झगडा १७९४ मधील सेनापती वेनच्या विजयापर्यंत थांबला नाही. स्वातंत्र्ययुद्ध पूर्वेत सुरू झाले, तेव्हा ब्रिटिशांनी इंडियनांना चिथावून त्यांचा वसाहतकऱ्यांशी लढा चालू ठेवला. ब्रिटिशांची इलिनॉयमधील अनेक ठाणी क्लार्क याने जिंकली पण मोक्याचे ठिकाण डिट्रॉइट त्याला जिंकता आले नाही. पूर्वेतले युद्ध संपले, तरी १७८२ मध्ये शॉनी जमातीची गावे क्लार्कने उद्ध्वस्त करीपर्यंत वायव्य मुलूख अमेरिकेला मिळाला नाही. १७८३च्या पॅरिस तहानंतर इकडच्या सीमाप्रदेशाचा कारभार नव्या राज्यसंघाकडे आला. न्यूयॉर्क, व्हर्जिनिया, मॅसॅचूसेट्स व कनेक्टिकट राज्यांनी आपले ओहायओवरचे हक्क सोडून दिले आणि राष्ट्रसंसदेने वटहुकुमाने १७८७ मध्ये ओहायओ-प्रदेश-शासनाची व्यवस्था केली.या प्रदेशात ठिकठिकाणी वस्ती करण्याचे प्रयत्न १७७२ पासून होत होते.१७८९ मध्ये फोर्ट वॉशिंग्टनची स्थापना होऊन त्याला सिनसिनॅटी नाव मिळाले. दरम्यान इंडियनांचे हल्ले चालूच होते. सेनापती हार्मर व सेंट क्लेअर यांच्या मोहिमा अयशस्वी झाल्यानंतर सेनापती हार्मर व सेंट क्लेअर यांच्या मोहिमा अयशस्वी झाल्यानंतर सेनापती वेन याला लागोपाठ दोन विजय मिळाल्यावर १७९५च्या ग्रीनव्हिल तहाने ओहायओ प्रदेशात वसाहत निर्वेध झाली. १८०३ मध्ये जुन्या ‘वायव्ये’ पैकी सर्वप्रथम ओहायओला राज्यदर्जा मिळाला, तरी इंडियनांची समस्या पुरी सुटली नव्हती १८११ मध्ये शेजारच्या इंडियाना प्रदेशाचा राज्यपाल हॅरिसन याने टिपिकॅनूच्या लढाईत शॉनींचा पाडाव केल्यावरही इंडियनांच्या धाडी चालू राहिल्या. त्यांना ब्रिटिशांची फूस असावी हा संशय बळावल्यानेच ब्रिटिशांशी १८१२ च्या युद्धाला तोंड लागले. ओहायओच्या नागरी दलाने डिट्रॉइट घालवले, पण हॅरिसनने फोर्ट मेग्झ लढवला आणि नौदलाच्या पेरीने ईअरी सरोवराची लढाई जिंकल्यावर, टेम्सच्या लढाईत ब्रिटिशांचा व इंडियनांचा पराभव करून हॅरिसनने वायव्य मुलुखावर अमेरिकेची पकड कायम केली आणि तहाच्या वाटाघाटीत अमेरिकेची बाजू बळकट केली. १८३५ साली ओहायओ आणि मिशिगन राज्यांच्या दरम्यान ईअरी सरोवराच्या दक्षिणेकडील १,०४० चौ. किमी. भूमीसाठी ‘टोलीडो युद्ध’ जुंपले. पण १८१७ मध्ये राष्ट्रसंसदेने वादग्रस्त मुलूख ओहायओला देऊन मिशिगनला भरपाईदाखल त्या राज्याचे वरचे द्वीपकल्प दिले. ओहायओ हे
‘वायव्य वटहुकुमा’ अन्वये गुलामीला बंदी असणारे राज्य होतेच, यादवी युद्धाअगोदर ते गुलामी विरोधाचे एक भक्कम ठाणे बनले व दक्षिणेतून पळून येणाऱ्या गुलामांना कॅनडात निसटून जाण्यासाठी मदत करणाऱ्या भूमिगत रेल्वेयोजनेत अनेक नागरिक सहभागी झाले. यादवी युद्धात दक्षिणेच्या बंडखोर पक्षीय मॉर्गनच्या घोडदळाने केंटकीतून इंडियानामार्गे ओहायओत धाडसी छापा घातला तथापि त्याला ओहायओ नदीवरच बफिंग्टन बेटाच्या लढाईत रोखण्यात आले व नंतर कैद करून कोलंबस येथे ठेवण्यात आले पण तेथून निसटून तो परत दक्षिणेत गेला. यादवी युद्धात ओहायओने ३,४६,००० सैनिक आणि ग्रँट, शेरमन व शेरिडन हे तीन विजयी सेनापती दिले.
विसाव्या शतकात राज्याच्या व राष्ट्राच्या औद्योगिक विकासात अनेक ओहायओकर सहभागी झाले. विमानाचा शोध लावणारे राइट बंधू, अजूनही डेटन येथे कारखाने चालू असलेल्या ‘रोकड हिशेब यंत्रा’चा संशोधक रिटर, प्रचंड प्रमाणावर खनिज तेलाची शुद्धी व वितरण करणारा रॉकफेलर, ॲक्रन येथे रबरधंदा सुरू करणारे गुडरिच व फायरस्टोन, जनरेटर,बॅटरी व सेल्फस्टार्टर्स या महत्त्वाच्या भागांनी आजची मोटारगाडी शक्य करणारे विर्लड व केटरिंग, काच फुगवण्याचे कारखानदारी तंत्र शोधून असंख्य विजेचे दिवे व बाटल्याबरण्यांचे उत्पादन शक्य करणारा ओएन हे त्यांच्यापैकी ठळक होते.
राज्याने देशाला एकूण सात राष्ट्राध्यक्ष दिले गारफील्ड, ग्रँट, हॅरिसन, हेज, मॅकिन्ले, टॅफ्ट व हार्डिंग. ओहायओची अंतर्गत शासनव्यवस्था बव्हंशी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांसारखीच आहे. राज्यातून देशाच्या सीनेटवर दोन व प्रतिनिधिगृहावर २३ सदस्य निर्वाचित होतात. सचिव व राज्यपाल चारवर्षांकरिताआणि लेखापालव महाधिवक्ता दोन दोन वर्षांकरिता निवडले जातात. विधिमंडळ द्विसदनी असून ३३ सदस्यांचे सीनेट व ९९ सदस्यांचे प्रतिनिधिमंडळ आहे. शासनव्यवस्थेसाठी राज्याची ८८ काउंटीमध्ये विभागणी केली आहे.
आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्यात राष्ट्रीय व राज्य वनविभाग १९७२ मध्ये एकूण सु. सव्वालक्ष हेक्टरांहून थोडा अधिक असला, तरी राज्यातील प्रमुख व्यवसाय कृषी हाच आहे. कृषी-उत्पादन मुख्यत्वे दूधदुभते, मका व मांसासाठी पोसलेली गुरे यांपासून मिळते याशिवाय घासचारा, गहू, सोयाबीन, ओट, राय, बटाटे, फळफळावळ, भाज्या, अंडी व कोंबड्या यांपासूनही राज्याला उत्पन्न मिळते. १९७१– ७२ मध्ये राज्यात २२·४ लक्ष गुरे, ६·७ लक्ष मेंढ्या, २६·१ लक्ष डुकरे व १३५·३ लक्ष कोंबड्या होत्या. घाऊक व किरकोळ व्यापारात १८ %लोक व कारखानदारीत ३६·६% लोक असून औद्योगिक उत्पादनात देशात राज्याचा दुसरा क्रमांक आहे.मुख्य उत्पादन बिगरविजेची व विजेची यंत्रसामग्री, मोटरवाहने, विमाने व सुटे भाग, शुद्ध पोलाद व इतर धातू, आकार दिलेले धातूंचे जिन्नस, हत्यारे, रसायने, साबू, रंग, टायर व इतर रबरी माल, दगड, चिनी माती व काचेचा माल, तेलशुद्धी आणि अन्नपदार्थांवर प्रक्रिया इ. असून खनिज उत्पादन कोळसा, दगड, सिमेंट व चुना यांचे आहे. ईअरी सरोवरावरील टोलीडो व क्लीव्हलँड बंदरे सेंट लॉरेन्स सागरमार्गामुळे सागरी बंदराइतकीच महत्त्वाची आहेत. यांशिवाय इतरही सहा बंदरे आहेत. ओहायओ नदी मालवाहतुकीचा मोठा जलमार्ग असून मॉमी, सँडस्की व कायहोगा या उत्तरेकडील नद्यांतूनही मालवाहतूक चालते. १९७२ मध्ये राज्यात लोहमार्ग १८,३४४ किमी. व रस्ते १,७४,७८४ किमी. होते. १९६७ मध्ये ४४५ विमानतळ, १३१ नभोवणी व ३२ दूरचित्रवाणी केंद्रे, ९८ दैनिके व २६५ इतर नियतकालिके होती. लोकवस्तीत ७५·३ % (१९७०) शहरी असून राज्यात निग्रोंचे प्रमाण ९·९ % होते. क्लीव्हलँड, सिनसिनॅटी, राजधानी कोलंबस, जागतिक रबर उद्योगकेंद्र ॲक्रन, टोलीडो व डेटन ही येथील महत्त्वाची शहरे होत. राज्यात विद्यापीठे १२ व महाविद्यालये साठचे वर आहेत. शालेय शिक्षण ६ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना सक्तीचे आहे. १९७१– ७२ मध्ये ‘ पब्लिक स्कूल्स ’ मध्ये २४,३२,६४० विद्यार्थी, प्राथमिक शाळांत ५१,८१९ शिक्षक व १४,९७,४८९ विद्यार्थी, माध्यमिक शाळांत ४३,५०३ शिक्षक व ९,३५,१५१ विद्यार्थी होते. विद्यापीठे व महाविद्यालये मिळून ११८ संस्थांत राहून शिकणारे १९७१मध्ये ३,८३,००० विद्यार्थी होते.
१९७१ मध्ये अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशनकडे नोंदलेली २६८ रुग्णालये होती व त्यांत ८०,३०१ खाटा होत्या. २४,८१८ मनोरुग्णांची शासकीय मनोरुग्णालयात सोय झालेली होती.
प्रौढ सुधारणसंस्थांत १९७२ मध्ये सु. ९,००० लोक होते. १९३० पासून खुनासाठी मृत्युदंड झालेल्यांची संख्या १७० होती व १९६३ नंतर कोणासही मृत्युदंड झालेला नाही.
राज्यात कोणत्याही बाबतीत वंश, वर्ण, धर्म इत्यादींबाबत भेदाभेद करण्यास कायद्याने मनाई आहे. डेटन येथील राइट पॅटर्सन वायुसेना ठाणे जगातील सर्वांत मोठे विमानचाचणी क्षेत्र समजले जाते. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला व क्रीडा या बाबतीत ओहायओचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांशी सामान्यतः साधर्म्य आहे.
ओक, शा. नि.
“