ओसाडी : (हिं. अजगंधा गु. धोळी सादोडी क. नइतुलसी इं. गोट वीड, आपाग्रास लॅ. ॲजिरॅटम कॉनिझॉइडीस कुल-कंपॉझिटी). सु. ३०—६० सेंमी. उंचीची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी श्रीलंकेत, भारतात व उष्णकटिबंधात इतरत्र १,५५० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत तणाप्रमाणे सर्वत्र आढळते. खोड हिरवट, कधी जांभळट, केसाळ, उभे व शाखायुक्त पाने साधी, संमुख (समोरासमोर) किंवा फक्त वरची एकाआड एक, ५—७ × २·५—५ सेंमी., अंडाकृती, दातेरी, केसाळ फुलोरा अनेक स्तबकांचा गुलुच्छ [→ पुष्पबंध] टोकास नोव्हेंबर-मार्चमध्ये येतो. फुले लहान, एकाच प्रकारची, द्विलिंगी, नलिकाकृती. फिकट निळसर ते पांढरी, कुबट वासाची छदे रेषाकृती, टोकदार व रेषांकित पाच पिच्छ-संदले, खवल्यासारखी [→फूल] कृत्स्न फळे (शुष्क, आपोआप न फुटणारी, व बाह्य आवरणापासून अलग असलेले एकच बीज असणारी, फळे) बारीक व काळी.
या वनस्पतीचा फांट (काढा) अतिसार व शूल यांवर देतात. रस गुदभ्रंशावर उपयुक्त. पाने वांतिकारक. पाने व खोडाचे गरम पोटीस कुष्ठ व इतर त्वचारोगांवर लावतात गर्भाशयाच्या विकारांवर बाहेरून लावण्यास चांगले. पाने धनुर्वातरोधक व रक्तस्त्रावरोधक मुळांचा रस अश्मरी (खडा ) तयार होऊ नये यासाठी वापरतात. पाने व फुलांपासून०·०२ टक्के दुर्गंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते.
पहा :कंपॉझिटी.
जमदाडे, ज. वि.
“