ओरेष्कोव, एलिस : (२५ मे १८४१—१८ मे १९१०). पोलिश कादंबरीलेखिका. जन्म पोलंडच्या पश्चिम सरहद्दीवरील ग्रॉड्‍नॉ येथे. शिक्षण वॉर्स येथे. तिने लिहिलेल्या कादंबऱ्यांपैकी Meir Ezofowicz (१८७८) आणि Cham (१८८९, इं. शी. द बूअर) ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. स्त्रीशिक्षण, ज्यू लोकांवरील अन्याय, श्रीमंत उमरावांची गरिबांकडे बघण्यची वृत्ती हे तिच्या कादंबऱ्यांचे प्रमुख विषय. जडवादास विरोध व विविध प्रतीकांतून व्यक्त होणारी राष्ट्रवादाची भावना ही तिच्या कादंबऱ्यांची इतर वैशिष्ट्ये. तिने लघुकथालेखनही केले आहे. Przedze (१९०३) आणि Nowele i szkice (१९२१) हे तिचे कथासंग्रह. तिच्या अनेक कादंबऱ्यांची रशियन, जर्मन आणि स्वीडिश भाषांतून भाषांतरे झाली आहेत. १८७९ मध्ये तिने ‘पोलिश पब्‍लिशिंग हाउस अँड बुकशॉप’ ह्या संस्थेची स्थापना केली. पोलिशसाहित्यात कादंबरीकार म्हणून तिचे स्थान मोठे आहे. ग्रॉड्‍नॉ येथे ती मरण पावली.

जगताप, बापूराव